मुंबईः प्रकाशाचा सण दिवाळी हा संपत्ती, समृद्धी आणि जीवनांतील वाढीच्या कामनेचा उत्सव आहे. अंधारावर ज्ञानाच्या आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा हा शुभ प्रसंग असतो. शेअर बाजारांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच गुंतवणूकदार तसेच सर्व व्यवसाय मालक दरवर्षी दिवाळीला होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंग सत्राची आतुरतेने वाट पाहत असतात.
यंदा मुंबई तसेच राष्ट्रीय अर्थात बीएसई आणि एनएसई अशा दोन्ही शेअर बाजारांनी दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त होणारे मुहूर्ताच्या व्यवहारांचे एक तासाचे सत्र हे मंगळवार, २१ ऑक्टोबरला आयोजित करण्याचे ठरविले आहे. तथापि परंपरेप्रमाणे सायंकाळी होणारे हे व्यवहार यंदा दुपारी १:४५ वाजल्यापासून, २:४५ वाजेपर्यंत आयोजित केले जातील, असे दोन्ही शेअर बाजारांनी वेगवेगळ्या परिपत्रकांद्वारे स्पष्ट केले. पंचांग आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी या विशेष सत्राची वेळ बदलत असते. तरी सामान्यतः हे सत्र संध्याकाळी आयोजित केले जाते, मात्र यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरेल. गेल्या वर्षी, विशेष मुहूर्त व्यवहाराचे सत्र हे शुक्रवार, १ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत योजले गेले होते.
नवीन विक्रम संवत्सर २०८२ अर्थात दिवाळीपासून सुरू होणारे हिंदू कॅलेंडर वर्षाच्या स्वागताचे हे विशेष व्यवहार सत्र असते. नव्या संवत्सराची सुरुवात म्हणूनच शुभ ‘मुहूर्त’ या अर्थाने हा प्रतीकात्मक व्यापार हा भागधारकांसाठी समृद्धी आणि आर्थिक वाढीचे वाहक ठरतात, अशी बाजारात पूर्वापार धारणा आहे. दिवाळीचे दिवस असल्याने नियमित व्यापारासाठी बाजार बंद राहतील, परंतु या विशेष व्यापार सत्रासाठी ते एक तासासाठी खुले असतील.
बाजार विश्लेषकांनी नमूद केले की नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवाळी हा एक शुभ प्रसंग मानला जातो आणि अनेक गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की मुहूर्त व्यापार सत्रात सहभागी होणे वर्षभर समृद्धी आणते.
तथापि, फक्त एक तासापुरते व्यवहार मर्यादित असल्याने, बाजारात अनेकदा वाढत्या अस्थिरतेचे दर्शन घडते. विश्लेषकांनी असेही म्हटले आहे की या सत्राचे महत्त्व तात्काळ नफ्यापेक्षा त्याच्या प्रतीकात्मक मूल्यात जास्त आहे. शेअर बाजारांनी जारी केलेल्या स्वतंत्र परिपत्रकांनुसार, इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरिंग (एसएलबी) सारख्या विविध विभागांमध्ये एकाच वेळेत ट्रेडिंग होईल.