-डॉ.आशीष थत्ते
मी जे आज तुम्हाला सांगणार आहे, तो घोटाळा नसून पुढे होणाऱ्या एखाद्या घोटाळ्याची चाहूल आहे. सध्या अचानक सोमालियातील चाच्यांची जास्तच चर्चा होत आहे. सोमालियामध्ये हरारढेरे नावाचे गाव आहे. एखादा दिवस जर इथे खूप महागड्या गाड्या किंवा श्रीमंत लोक दिसायला लागले म्हणजे खूप दूरवर कुठे तरी गुन्हा घडणार आहे याची कुणकुण स्थानिकांना लागते. याचे कारण सोमालिया हा समुद्री चाच्यांसाठी प्रसिद्ध देश आहे आणि हरारढेरे येथे चाच्यांचे चक्क ‘स्टॉक मार्केट’ अर्थात भांडवली बाजार आहे. होय तुम्ही नीट वाचले आहे जगातील एक आणि एकमेव पायरेट्स म्हणजे समुद्री चाच्यांचा भांडवली बाजार हरारढेरे नावाच्या समुद्रकिनारी वसलेला आहे.

जगातील गरीब देशांमध्ये आणि तरीही सुंदर समुद्र किनारा लाभलेल्या या देशात समुद्रात लूटमार करणे अगदी सामान्य आहे. याचे कारण येथील गरिबी आणि कमकुवत कायदे. वर्ष २००५ च्या सुरुवातीला सोमालियन नागरिक आणि समुद्री चाच्या मोहम्मद अब्दी हसन याने स्थानिक तरुणांच्या मदतीने आपली टोळी बनवली. प्रत्येक देश हल्ली आपल्या जहाजांवर लक्ष ठेवून असतो तरीही समुद्री लुटीचे प्रकार सोमालियाजवळ आणि हिंदी महासागरात सामान्य आहेत. त्याने वर्ष २००९ मध्ये आपला भांडवली बाजार उघडला आणि ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या म्हणण्यानुसार सुमारे ७२ टोळ्या इथे नोंदणीकृत आहेत.

आणखी वाचा-गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू

प्रत्येक टोळीला आपली लूट साध्य करायला साधने आणि पैसे लागतात. जेव्हा ते एखादे जहाज हेरतात तेव्हा ‘स्टॉक मार्केट’मध्ये येतात आणि येथील गुंतवणूकदार शस्त्रे, पैसे किंवा अन्नसुद्धा गुंतवणूक करतात. मग टोळी तिथे जाऊन जहाज लुटून येते आणि ओलीस धरलेल्या माणसांची किंमत मिळाल्यावर गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करते. काहींना नफ्याचा हिस्सा आणि जर कुठल्या बंदरावर जहाजाला ठेवावे लागले तर त्या बंदराचे तेवढ्या दिवसांचे भाडे देखील देण्यात येते. टोळीला जहाजावरील मालात काही रस नसतो पण त्यांना ओलीस धरलेल्या माणसांकडून आणि त्या जहाजाच्या मालकाकडून खंडणीची अपेक्षा असते. नु

कत्याच झालेल्या एक कारवाईत भारतीय नौदलाने समुद्रीचाच्यांना अपहरण केलेल्या जहाजावरुन सोडवले. हे जहाज इराणचे होते आणि ते सोमालिया जवळून जात होते. गेल्या काही दिवसांमध्ये या घटनांमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसेल. याचा काही संबंध ‘स्टॉक मार्केट’शी असेल असे नाही पण नसेल असेही नाही. असे म्हणतात की, या पैशातून हरारढेरे येथे काही शाळा आणि इस्पितळे सुद्धा बांधण्यात आली आहेत. अजून पन्नास एक वर्षात अमेरिकेसारख्या एखाद्या देशाने हरारढेरे येथे ड्रोनने हल्ला वगैरे केला तर फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका. ज्यांना सोमालियातील चाच्यांचे जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांनी पायरेट्स ऑफ सोमालिया हा २०१७ मध्ये आलेला चित्रपट नक्की पाहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चला मग एखादी समुद्री सहल सोमालियातील रम्य गाव हरारढेरे येथे काढण्यास काही हरकत नसावी. मात्र ती फक्त स्वतःच्या जबाबदारीवर!