प्रतिशब्दः मूल्यांकन – Valuation : सेन्सेक्स-निफ्टीची घसरण मालिका सलग सहा दिवस सुरू आहे. गत सहा महिन्यांतील सर्वात बेचैन क्षण सरलेल्या आठवड्यात दलाल स्ट्रीटने अनुभवले. आपल्या बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय काही केल्या अडखळताना दिसत नाही. यातून रुपयाचे दणकून आपटणे सुरू आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्याने नव्वदी गाठणे आता फार दूर नाही, असेही विश्लेषक म्हणू लागलेत. एकंदर बाजारात भीतीची लहर प्रबळ असताना, सेन्सेक्सचे लोभस शतसहस्त्रकी शिखर नजीक असल्याचा आशावादी सूरही जोरकस आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी हे असे होतच असते. तरी न भूतो असा सहा अंकी स्तर निर्देशांक गाठेल असे सांगणारे हे आडाखे आणि त्यातून छोट्या गुंतवणूकदारांनी गाठीशी बांधावयाच्या गोष्टी ‘प्रतिशब्द’मधून एकसूत्रपणे लक्षात घेऊया.
भारतीय बाजाराच्या मूल्यनिर्मितीवर पूर्वापार भरवसा असलेले विख्यात अमेरिकी गुंतवणूकदार मार्क मोबियस यांनी गेल्या आठवड्यात वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, सेन्सेक्स १,००,००० अंशांच्या पातळीवर जाण्याबद्दल भाष्य केले. त्या आधी मॉर्गन स्टॅन्ले या जागतिक दलाली पेढीने वर्षभरात/ एप्रिल-जून २०२६ दरम्यान सेन्सेक्सची १ लाखाची मात्रा दृष्टिपथात असल्याचे म्हटले आहे. गुंतवणूकगुरू म्हणून कीर्ती असलेले मोतीलाल ओस्वाल समूहाचे सह-संस्थापक रामदेव अगरवाल यांनी २०३० पर्यंत सेन्सेक्स दीड लाख, तर २०३५ पर्यंत ३ लाखांचा स्तर दाखवेल, असे निःसंदिग्धपणे म्हटले आहे.
एक लाख हा आकडा जादूई परिणाम साधणारा असला तरी, सेन्सेक्सने लाखावर जाणे तितकेसे नवलाचेही नाही. अलिकडच्या वर्षातील त्याची चाल पाहता असे सहजपणे म्हणता येईल. डिसेंबर २००७ अखेर २०,००० चा टप्पा गाठणारा सेन्सेक्स, डिसेंबर २०१८ अखेर ३६,००० वर गेला. अर्थात ११ वर्षांत त्यात ९० टक्के वाढ झाली. या निर्देशांकाचा दीर्घकालीन वाढीचा दर हा असाच राहिला आहे. किंबहुना गेल्याच वर्षी २३ सप्टेंबर २०२४ रोजी याच निर्देशांकाने ८४,८६२ असा सार्वकालिक उच्चांकी स्तर गाठला आहे. यंदाच्या सप्टेंबरच्या मध्यापर्यंत या अत्युच्च स्तरापासून तो अवघ्या ५ टक्क्यांच्या अंतरावर होता. त्यामुळे लाखाचा स्तर गाठण्यासाठी आणखी २४-२५ टक्क्यांची बेगमी काही महिन्यांमध्ये होणे अशक्य नाही. जगात इतर उभरत्या बाजारांमधील तेजीच्या चालीशी आपण चालू वर्षात बरोबरी साधू शकलेलो नाही. हे अंडरपरफॉर्मन्स फार काळ सुरू राहणार नाही, असाच सूर मोबियस, अगरवाल या सारख्या प्रतिष्ठितांनी देखील त्यांच्या भविष्यवेधांतून आळवला आहे.
भारतीय बाजाराचे हे अंडरपरफॉर्मन्स अर्थात रेंगाळलेली चाल कशामुळे, हे देखील लक्षात घेतले जावे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची अपूर्व विक्षिप्त धोरणदिशा आपल्या बाजाराचा घात करत आहे. अगदी युद्ध आणि तत्सम भू-राजकीय ताणही आपण पचविले. पण ट्रम्प यांचे आयातशुल्क, त्यानंतर व्हिसा शुल्कवाढीने प्रथम आपल्या सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांना आणि आता औषध कंपन्यांना लक्ष्य करणारे त्यांचे धोरण यांनी बाजाराच्या जिव्हारी घाव घातला आहे. दुसरीकडे ट्रम्प यांचे व्हिसा धोरण भारतासाठी इष्टापत्तीच ठरेल, असाही विश्लेषकांचा होरा आहे. हजारो भारतीय तंत्र-व्यावसायिक आणि आयटी प्रतिभा देशातच ठेऊन आणि स्थानिक तंत्रज्ञान केंद्रांना चालना देणारा फायदा देशाला यातून मिळविता येऊ शकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे २७ ऑगस्टच्या आयातशुल्क दुप्पट करून ५० टक्क्यांवर नेणाऱ्या फर्मानाचे जसे झाले, तसेच ताजा १९ सप्टेंबरचा दणकाही बाजारासाठी काही काळात सामान्यच बनेल.
ट्रम्प यांचे अतर्क्य वर्तन आणि त्या परिणामी बाजारात दिसणारी अस्थिरता ही अल्पावधीचीच, हा आता आपल्यासाठी सामान्य नियम बनला आहे. पण दीर्घावधीतील त्याचे परिणाम भरून निघावेत हे काम अर्थव्यवस्थेच्या आणि मुख्य म्हणजे कंपन्यांच्या मिळकत कामगिरीतून दिसून यायला हवे. ट्रम्प तडाख्याने बाजारात झालेल्या पडझडीने अनेक कंपन्यांच्या समभागांचे चढे मूल्यांकन (Valuation) ताळ्यावर आले. मुंबई शेअर बाजारातील अव्वल ५०० कंपन्यांचेच पाहा. यातील जवळपास ७० टक्के कंपन्यांचे समभाग हे त्यांच्या उच्चांकी स्तरावरून आज २० टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत. जेमतेम ५ ते ७ टक्के वाढीची उत्पन्न कामगिरी असणाऱ्या कंपन्यांच्या समभागांना इतकी किंमत मिळणे हे धोक्याचेच होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या धोरणाने घातलेली भीती नसती, तरी बाजाराच्या गतिचक्रात हे समभाग आपटणे स्वाभाविकच ठरले असते.
म्हणूनच भीती-लोभाचे संतुलन समजून घेताना, सेन्सेक्सने २०२५-२६ अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या जूनपर्यंत लाखांपुढील मजल गाठावयाची तर नेमके काय घडायला हवे, हेही लक्षात घेतले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जागतिक अर्थसत्ता अमेरिकेसह, जगाच्या अर्थव्यवस्थेबाबत भविष्यचित्र हे अनुत्साही, किंबहुना भीतीदायी आहे. हे पाहता, अनेक दिग्गजांनी सोन्याच्या गुंतवणुकीचा आश्रय घेणे पसंत केले आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांच आज सोन्याच्या सर्वात मोठ्या खरेदीदार आहेत. अशा भीतीच्या वातावरणांत भारताच्या अर्थव्यवस्थेचे वेगळेपण काय? असे काय घडले तर जगभरातील व देशी गुंतवणूकदारांना आश्वस्त वाटेल? गुंतवणूकदार वर्गाचे म्हणाल तर प्रश्नांचे त्यांच्यालेखी उत्तर स्पष्टच आहे. पुढील सहा-नऊ महिन्यांत सेन्सेक्स लाखांपुढे सरकायचा याचा अर्थ, कंपन्यांची महसुली वाढ ही चालू आर्थिक वर्षासाठी अंदाजित ८ ते १० टक्क्यांच्या तुलनेत, पुढील आर्थिक वर्षात १९ ते २० टक्के दराने होत आहे, हे सुस्पष्टपणे आकड्यांतून दिसायला हवे. अशी सुस्पष्टता कोणत्या विशिष्ट कंपनीबाबत दिसत असेल, त्या कंपनीत निःशंकपणे खरेदी नक्कीच करता येईल. सारांशात, निर्देशांकाचा स्तर पाहून नव्हे तर मूल्यांकन न्यायोचित ठरविणारी मिळकत कामगिरीबाबत दृश्यमानता हा समभाग खरेदी निवडीचा प्रमुख निकष बनावा.
ई-मेलः sachin.rohekar@expressindia.com