कौस्तुभ जोशी, अर्थ विश्लेषक
गेल्या महिन्याभराच्या काळात भारतातील शेअर बाजारांमध्ये सर्वाधिक गाजलेला शब्द कोणता ? याचा आढावा घेतला तर सेंसेक्स, निफ्टी, लार्ज कॅप, मिड कॅप, फॉरेन इन्वेस्टर, रिझर्व बँक ऑफ इंडिया, मॉनिटरी पॉलिसी या सर्वाधिक या शब्दांपेक्षा चर्चिला गेलेला आणि भविष्यातील गुंतवणूकदारांना मोहात पाडेल असा शब्द म्हणजे ‘आयपीओ अलॉटमेंट झाली का ?’
भारतीय शेअर बाजारातील कोविडोत्तर काळातला ‘बुलरन’ चा टप्पा आपण अनुभवत आहोत. २०२१ या वर्षात बाजाराने दिलेल्या थम्स अप नंतर २०२२ आणि २०२३ च्या सुरुवातीला बसलेले धक्के वगळता बाजारांनी सतत ‘झेपावे उत्तरेकडे’ असाच अनुभव गुंतवणूकदारांना दिला आहे. परिणामी शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात लिस्टिंग झालेल्या टाटा टेक्नॉलॉजी आणि अन्य दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिल्यामुळे आयपीओ हे अल्पावधीत पैसे कमावण्याचे साधन आहे असा गैरसमज होऊन बसला आहे.
‘लिस्टिंग गेन’म्हणजे काय ? आयपीओ मधून पैसे कसे मिळतात ?
एखाद्या कंपनीच्या पब्लिक इश्यू मध्ये आपण शेअर्सना बोली लावल्यावर जर आपल्याला शेअर्स मिळाले तर कंपनीच्या नियमानुसार जेव्हा शेअर्सची नोंदणी एन एस इ किंवा बी एस सी वर होते त्यादिवशी गुंतवणूकदारांना शेअर्स विकण्याचा पर्याय असतो याला ‘लिस्टिंग गेन’ असे म्हणतात.
हेही वाचा : Money Mantra : कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्यांसाठी आरबीआयचा ‘हा’ नियम ठरणार फायदेशीर
एका उदाहरणाने मुद्दा समजून घेऊया : टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीचा पब्लिक इश्यू बाजारात आला होता. पाचशे रुपये किमतीने कंपनीने शेअर्स गुंतवणूकदारांना लॉटरी पद्धतीने दिले, त्यानंतर रीतसर शेअरची नोंदणी दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर करण्यात आली व ज्या दिवशी ही नोंदणी पूर्ण झाली त्या दिवशीच्या सत्रात पाचशे रुपयाला मिळालेला हा एक शेअर पंधराशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. याचवेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्याला आयपीओ मध्ये मिळालेले शेअर्स विकले तर त्याला झालेला फायदा ‘लिस्टिंग गेन’ म्हणून ओळखला जातो. आयपीओ मध्ये शेअर लागले आणि काही दिवस थांबून गुंतवणूकदारांनी ते विकले किंवा दीर्घकाळासाठी ते शेअर्स ठेवून विकले तर त्याला लिस्टिंग गेम म्हणता येत नाही.
आयपीओ मध्ये मिळालेले शेअर्स पहिल्याच दिवशी विकले तर टॅक्स लागतो का ? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे !
तुम्ही शेअर्स लिस्ट झाल्यापासून किती दिवसाच्या अंतराने विकता आहात त्या कालावधीनुसार त्यावर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेम टॅक्स भरावा लागतो.
आयपीओ आणते म्हणजे कंपनी नेमके काय करते ?
एका कंपनीचे कॅपिटल भांडवल दहा कोटी असेल तर दहा रुपये किमतीच्या शेअर्समध्ये त्याचे विभाजन होते. म्हणजेच दहा कोटी भागिले १० रुपये अर्थात एक कोटी शेअर्स कंपनीच्या बॅलन्स शीटवर असतात. पब्लिक इश्यू आणला जातो त्यावेळी याच शेअर्सपैकी काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिले जातात. म्हणजेच कंपनी नव्याने भांडवल उभारत नाही.
काही कंपन्या पब्लिक इश्यू आणताना कंपनीतील सध्याच्या गुंतवणूकदारांना त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेण्याचा मार्ग उपलब्ध करून देतात.
काही कंपन्या पब्लिक इश्यू आणताना नवीन भांडवलाची उभारणी करतात म्हणजेच फ्रेश इक्विटी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिले जातात.
पब्लिक इश्यू मागील नेमका उद्देश कोणता ?
प्रत्येक पब्लिक इश्यू आणणार असलेल्या कंपनीला आपले वित्तीय व्यवहार उत्तमच आहेत असे दाखवावे लागते. तरच गुंतवणूकदार त्यात पैसे गुंतवतील आणि म्हणूनच या पब्लिक इश्यूमधून जमा केलेले पैसे कंपनी नेमके कशासाठी वापरणार आहे ? याचा विचार व्हायला हवा. कंपनीवर कर्जाचा डोलारा असेल आणि ते कर्ज फेडण्यासाठीच सगळे पैसे वापरले जात असतील आणि कंपनीचे बिझनेस मॉडेल अगदी सर्वसामान्य दर्जाचे असेल तर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवताना पुन्हा विचार करावा.
कंपनीचे बिझनेस मॉडेल ओळखा
कंपनीला कोणत्या मार्गातून नफा मिळतो आहे ? कंपनीच्या व्यवसायाचे मार्ग कुठले? कंपनीच्या तयार होणाऱ्या वस्तूंचा बाजारपेठेतील खप किती आहे ? कंपनीचा व्यवसाय फक्त एकाच ठिकाणी एकाच बाजारपेठेवर अवलंबून असेल म्हणजेच केंद्रित असेल तर ते धोकादायक असते. याउलट कंपनीचा व्यवसाय विविध ठिकाणाहून होत असेल तर ते चांगले लक्षण आहे. काही वेळा कंपन्यांचा व्यवसाय हा सरकारच्या धोरणांशी निगडित असतो. सरकारी धोरण बदलले तर कंपनीचा व्यवसाय धोक्यात येईल अशी शक्यता वाटल्यास अशा कंपन्यांचा नीट अभ्यास करायला हवा.
हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण- फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचिप फंड
क्रेडिट रेटिंग आवर्जून बघा
आयपीओ बाजारात आणताना खाजगी क्रेडिट रेटिंग कंपन्यांकडून आयपीओ ग्रेडिंग केले जाते. कमी ग्रेडिंग असलेल्या किंवा धोकादायक अर्थात डिफॉल्ट या ग्रेडच्या जवळ जाणारे आयपीओ धोकादायकच असतात हे विसरू नये.
प्रॉस्पेक्टस वाचणे आवश्यक
प्रत्येक कंपन्यांच्या आयपीओच्या वेळेला आपले जोखीम विषयक सर्व दस्तऐवज कंपन्या प्रॉस्पेक्टस मध्ये छापतात. कंपनी आणि फंड मॅनेजरच्या वेबसाईटवर हे प्रॉस्पेक्टस उपलब्ध असते. कंपनीच्या अ ते ज्ञ अशा सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला त्यातून मिळते किमान पक्षी त्यातील ठळक बाबी वाचायलाच हव्यात.
आयपीओ मध्ये किती कालावधीसाठी पैसे कमवण्यासाठी आपण गुंतवणूक करतो आहोत हे आधीच ठरवून घ्यावे म्हणजे एक्झिट पर्याय सुद्धा मनातून ठरवून मगच आयपीओ चा विचार करावा.