प्रवीण देशपांडे

करदात्याला मिळणाऱ्या नियमित उत्पन्नावर करदाता कर भरतो. पगार, व्याज, लाभांश सारख्या उत्पन्नावर उद्गम कर (टी.डी.एस.) देखील कापला जातो. करदात्याने त्याच्या मालकीची भांडवली संपत्ती विकल्यास त्याला भांडवली नफा किंवा तोटा होऊ शकतो. या भांडवली संपत्तीमध्ये जमीन, घर, सोने, शेअर्स, म्युचुअल फंडातील युनिट्स, वगैरेंचा समावेश होतो. बऱ्याच बाबतीत भांडवली संपत्तीची विक्री काही विशिष्ट कारणास्तव केली जाते उदा. नवीन घर घेण्यासाठी, शिक्षणासाठी, वगैरे. करदात्याला अशा भांडवली संपत्तीच्या (ठराविक शेत जमीन वगळून) विक्रीतून होणारा भांडवली नफा हा करपात्र आहे. प्राप्तिकर कायद्यात करदात्याला भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी काही तरतुदी आहेत जेणे करून करदाता आपले करदाइत्व कमी करू शकतो किंवा पूर्णपणे वाचवू शकतो.

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

प्राप्तिकर कायद्यात भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी तरतुदी खालील प्रमाणे :

घरविक्रीवर झालेला भांडवली नफा : घर ही “भांडवली संपत्ती” असल्यामुळे त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा करपात्र आहे. घर खरेदी केल्यानंतर किंवा बांधल्यानंतर ते किती महिन्यांनी विकले किंवा हस्तांतरित केले यावर त्याच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्याची करपात्रता अवलंबून असते. यासाठी भांडवली संपत्ती अल्पमुदतीची आहे की दीर्घमुदतीची हे तपासून पाहिले पाहिजे. घर आणि स्थावर मालमत्ता ही खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केली असल्यास ती संपत्ती दीर्घमुदतीची होते अन्यथा ती अल्पमुदतीची होते. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात कोणत्याही तरतुदी नाहीत परंतु दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी अनेक तरतुदी आहेत. करदात्याला दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाल्यास तो कलम ५४ नुसार नवीन घरात पैसे गुंतवू शकतो. दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास त्यावर संपूर्ण वजावट मिळून कर भरावा लागत नाही. भांडवली नफ्यापेक्षा कमी गुंतवणूक नवीन घरात केल्यास नवीन घरातील गुंतवणुकीएवढीच वजावट मिळून बाकी रक्कम करपात्र असते.

हेही वाचा : Money Mantra : बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय?

यासाठी त्याला काही अटींचे पालन करावे लागते. या कलमानुसार ही गुंतवणूक मूळ संपत्ती विक्री केल्या तारखेपूर्वी एका वर्षाच्या आत किंवा विक्री केल्या तारखेपासून २ वर्षात (खरेदी केल्यास) किंवा ३ वर्षात (बांधल्यास) करणे बंधनकारक आहे. या कलमानुसार मिळणारी सवलत फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यु.एफ.) करदात्यांनाच मिळते. ज्या आर्थिक वर्षात मूळ संपत्ती विकली त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन घरात गुंतवणूक न केल्यास, भांडवली नफ्याएवढी रक्कम कॅपिटल गेन स्कीमच्या अंतर्गत बँकेत जमा करावी लागते. या खात्यात पैसे मुदतीत जमा न केल्यास वजावट मिळत नाही. निव्वळ विक्री रक्कम पुढील २ वर्षात (खरेदी केल्यास) किंवा ३ वर्षात (बांधल्यास) नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी न वापरल्यास तीन वर्षानंतर भांडवली नफ्याची रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते. कॅपिटल गेन स्कीमच्या अंतर्गत उघडलेल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागते.

हेही वाचा : Money Mantra: ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळवून देणारी योजना

या कलमानुसार फक्त एकाच नवीन घरात आणि भारतातच गुंतवणूक करता येते. याला एक अपवाद आहे, मूळ संपत्तीच्या विक्रीवरचा भांडवली नफा जर २ कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर करदात्याने एका ऐवजी दोन घरात गुंतवणूक केल्यास ती ग्राह्य धरली जाते. ही सवलत करदात्याने एकदा घेतल्यास पुन्हा त्याच्या जीवनकाळात परत घेता येत नाही.

या कलमानुसार खरेदी केलेले किंवा बांधलेले नवीन घर तीन वर्षात न विकण्याची अट आहे. काही कारणाने हे नवीन घर खरेदी केल्यापासून किंवा बांधल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास पूर्वी (मूळ संपत्ती विकतांना) घेतलेली वजावट रद्द होते. नवीन घराच्या विक्रीवरील भांडवली नफा गणतांना पूर्वी घेतलेली भांडवली नफ्याची वजावट (मूळ संपत्तीच्या विक्रीवर) खरेदी किमतीतून वजा होते आणि त्यानुसार गणलेल्या दीर्घ किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागतो. आर्थिक नियोजन करताना या तरतुदीचा विचार न केल्यास जास्त कर भरावा लागू शकतो. भांडवली नफ्याची रक्कम मागील एक वर्षात किंवा पुढील २ वर्षात (खरेदी केल्यास) किंवा ३ वर्षात (बांधल्यास) नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी न वापरल्यास तीन वर्षानंतर ती रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते.

१ एप्रिल, २०२३ नंतर या कलमानुसार १० कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतविता येत नाही. करदात्याला १० कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली नफा झाल्यास आणि नवीन घरात १० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास १० कोटी रुपयांच्या वरती रकमेवर कर भरावा लागेल.

हेही वाचा : Money Mantra: नवविवाहितांसाठी फायनान्शिअल प्लॅनिंग #couplegoals – 2

शेत जमिनीवर झालेला भांडवली नफा : शेत जमीन खेड्यात असेल तर ती भांडवली संपत्ती म्हणून समजली जात नाही. त्यामुळे त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा करपात्र नाही. शेत जमीन शहरी भागात असेल तर त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा करपात्र आहे. प्राप्तिकर कायद्याच्या भांडवली नफ्यावरील करबचतीच्या गुंतवणुका या फक्त दीर्घमुदतीच्या संपत्तीसाठीच लागू होतात. परंतु कलम ५४ बी नुसार शेत जमीन विकून त्यावर होणाऱ्या अल्प किंवा दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी दुसरी शेत जमीन खरेदी केल्यास कर वाचू शकतो. ही शेत जमीन भारतातच असणे बंधनकारक आहे. या कलमानुसार मिळणारी सवलत फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यु.एफ.) करदात्यांनाच मिळते. शेत जमीन मागील किमान दोन वर्ष करदात्याने किंवा त्याच्या पालकांनी किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाने (एच.यु.एफ.) शेती साठी वापरली असेल तरच या कलमानुसार सवलत मिळू शकते. मूळ शेत जमीन विक्रीतून झालेली भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन शेत जमिनीत गुंतविल्यास त्यावर संपूर्ण वजावट मिळून कर भरावा लागत नाही. भांडवली नफ्यापेक्षा कमी गुंतवणूक नवीन शेत जमिनीत केल्यास नवीन शेत जमिनीतील गुंतवणुकीएवढीच वजावट मिळून बाकी रक्कम करपात्र असेल. ही नवीन शेत जमिनीत गुंतवणूक मूळ शेत जमीन विक्रीच्या २ वर्षांच्या आत करावी लागते. ज्या आर्थिक वर्षात मूळ शेत जमीन विकली त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन शेत जमिनीत गुंतवणूक न केल्यास, भांडवली नफ्याएवढी रक्कम कॅपिटल गेन स्कीमच्या अंतर्गत बँकेत जमा करावी लागते. या खात्यातील नियम वर सांगितल्याप्रमाणे आहेत. नवीन शेत जमीन ३ वर्षे विकता येत नाही. काही कारणाने ही नवीन शेत जमीन खरेदी केल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास पूर्वी (मूळ जमीन विकतांना) घेतलेली वजावट रद्द होते.

पुढील भागात स्थावर मालमत्ता आणि इतर संपत्तीच्या म्हणजेच सोने, शेअर्स, म्युचुअल फंडातील युनिट्सच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी काय तरतुदी आहेत ते बघू.