News Flash

अभ्यासक्रमाचे ‘कौशल्य’

१५ जुलै या युवा कौशल्यविकास प्रशिक्षण दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयांतील प्राचार्याशी संवाद साधला.

भारतातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे यासाठी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्यविकास योजनेची मुहूर्तमेढ रोवली. या योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील ४० कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयानंतर महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या रोजगाराभिमुख कौशल्यविकासासाठी काही अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. सध्या देशात मोठा गट हा २५ ते ४० या वयोगटातील असून यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही अधिक आहे. देशात मेहनती तरुणांची ऊर्जा योग्य दिशेने उपयोगात आणली तर त्याचा फायदा देशाला आणि तरुणांचे करिअर घडायला मदत होईल. १५ जुलै या युवा कौशल्यविकास प्रशिक्षण दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयांतील प्राचार्याशी संवाद साधला.

मुंबईतील ‘टाटा सामाजिक संशोधन संस्था’ मार्च २०१२ पासून देशभरामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण विभाग राबवीत आहेत. या विभागाअंतर्गत विविध १९ क्षेत्रांमधील अभ्यासक्रम राबविले जात आहेत. यात कृषी, आरोग्य, बँक, आयटीईएस अशा अनेक क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चार भिंतींमधील बंदिस्त वर्गामध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरच कामाचे प्रशिक्षण मिळाले तर या मुलांचा आत्मविश्वास दुणावतो असा आमचा अनुभव आहे. सध्या ‘व्यावसायिक प्रशिक्षण विभागा’त देशभरातील २००० हून जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून अभ्यासक्रमाची नोंदणी झाल्यानंतर मुलांनी निवड केलेल्या क्षेत्रात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पाठविले जाते. तर गरजेनुसार दिवसाचे दोन तास किंवा आठवडय़ाचा एक दिवस त्यांना सैद्धांतिक शिक्षण दिले जाते. यात जास्त वेळ हा कामाच्या क्षेत्रामध्ये दिल्यामुळे नोकरी करण्यापूर्वीच या मुलांना त्याबाबतची अधिक माहिती मिळते. यामुळे एरवी पदवी मिळाल्यानंतर कुठले क्षेत्र निवडावे, ते कसे असेल, मला जमेल की नाही, असे अनेक प्रश्न मुलांना भेडसावत असतात. मात्र कुठल्या क्षेत्रात करिअर करावयाचे याची स्पष्टता असल्यामुळे मुले थेट आपल्या आवडीच्या क्षेत्रातील ज्येष्ठांकडून प्रशिक्षण घेतात. त्यामुळे प्राथमिक पातळीवरच त्यांच्या मनातील प्रश्न दूर होतात.

सध्या आपल्याकडे मोठमोठय़ा कंपन्यांकडून प्रशिक्षित तरुणांची मागणी वाढत आहे. कंपन्यांमधील वाढती स्पर्धा आणि कामाच्या ताणामुळे नवीन मुलांना प्रशिक्षण देण्याइतका अवधी नसल्यामुळे कंपन्या थेट प्रशिक्षित मुलांची मागणी करतात. तरुणांकडे पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पुस्तकी ज्ञान असले तरी विविध क्षेत्रांत काम करण्याचे आवश्यक कौशल्य नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळवणे अवघड जाते. मात्र या अभ्यासक्रमाच्या मदतीने मुले नोकरी लागण्यापूर्वीच त्या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार होत आहेत. या प्रशिक्षणांमुळे कंपन्यांची आणि तरुणांची गरज पूर्ण होत आहे. कारण सध्याच्या तरुणांना नोकरी मिळवून देणारे शिक्षण हवे आहे. कृषी विषयामध्ये पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शेती कशा प्रकारे करावी याचे प्रात्यक्षिक ज्ञान नसते ही सध्याची सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून मुलांना शिक्षणाबरोबरच नोकरी मिळवून देणारे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. व्यावसायिक प्रशिक्षण घेत असताना वेगवेगळ्याकंपन्यांमध्ये काम केल्यामुळे तरुणांमधील आत्मविश्वास वाढीस लागतो. यातूनच अनेक मुलांना त्या कंपनीत काम करण्याची संधीही मिळू शकते. टाटा सामाजिक संशोधन संस्थेच्या व्यावसायिक प्रशिक्षण विभागात मुंबईमधून ६०० मुलांची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्याकडून येणारा प्रतिसाद हा खूप सकारात्मक आहे. यामध्ये टाटा सामाजिक संशोधन संस्थेसोबत काही कंपन्या संलग्नपणे काम करीत आहेत. मात्र सध्या हा विभाग नवा असून त्यामध्ये नवनवे प्रयोग केले जात आहेत.

– शिवरंजनी कुलकर्णी, व्यवस्थापक, व्यावसायिक प्रशिक्षण विभागाच्या (स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन) 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कौशल्ये विकसित करावीत

सध्या देशात तरुणांची मोठी फळी नोकरीचा शोध घेत आहे. मात्र नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये नसल्यामुळे अनेकदा त्यांची निवड करण्यात येत नाही. कारण नोकरी पुरविण्याऱ्या कंपन्यांना नवीन मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ नाही. जागतिक पातळीवरील स्पर्धाना सामोरे जाण्यासाठी कंपन्यांना तयार आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज असते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी पदवी घेत असतानाच आपल्याला करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करावीत. विद्यापीठाने अभ्यासक्रम बदलण्याची वाट न बघता आपल्या पातळीवर सुरू करावेत. आमच्या महाविद्यालयात येत्या १५ जुलैपासून बँकिंग क्षेत्रातील प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. महाराष्ट्र कौशल्यविकास महामंडळाशी संलग्न असणाऱ्या संस्थेसोबत काम करीत आहोत. यामध्ये बँकेतील कर्मचारी प्रात्यक्षिके शिकविणार असून त्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या १२० मुलांची नोंदणी करण्यात झाली असून चार बॅचमध्ये याची विभागणी करण्यात येणार आहे. याबरोबर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे ज्ञान देणारे केंद्र लवकरच आम्ही सुरू करणार आहोत.

– डॉ. माधवी पेठे, प्राचार्य,  डहाणूकर महाविद्यालय

रोजगाराभिमुख प्रशिक्षणामुळे तरुणांचा आत्मविश्वास बळावतो

केंद्र सरकारच्या ‘कौशल्यविकास योजने’अंतर्गत महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने आमच्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेमध्ये तीन ते चार अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये कंपन्यांचा सहयोगाने करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधीही दिल्या जातात. सध्या देशामध्ये मुलांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची गरज असून अशा प्रकारच्या प्रशिक्षणातूनच रोजगाराच्या नव्या वाटा उघडतील. आम्ही दिवाळी आणि उन्हाळ्यात मुलांना वेगवेगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या शिबिरांमध्ये पाठवतो. यातूनच मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते तयार होतील. नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमाला मुले चांगला प्रतिसाद देत आहेत.

– डॉ. प्रतिमा जाधव, प्राचार्य, एल्फिन्स्टन महाविद्यालय 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 12:21 am

Web Title: skills of studies
Next Stories
1 माझ्या मते
2 तयारी ‘युथ’ उत्सवाची
3 अर्थबळकटीला धोरणसंतुलन आवश्यक
Just Now!
X