करिअरच्या विविध टप्प्यांतील आव्हाने आणि त्यांना सामोरे जाताना आवश्यक ठरणारा तारतम्यभाव याविषयी जाणून घेऊयात, ‘करिअरनीतीया पाक्षिक सदरातून!

अर्चना अलीकडेच प्रोबेशन पीरियड संपून कन्फर्म झाली होती. तिच्या कामाचा, तिच्या टीममधल्या स्थानाचा, तिच्या वरिष्ठांचा.. सगळ्याचा तिला बऱ्यापकी अंदाज आला होता. तिचं एकंदर बस्तान बसलं होतं.

मागचा आठवडाभर कंपनीत सर्वत्र कसली तरी गडबड चालू होती असं अर्चनाला जाणवलं. नेमकी कसली आणि काय चाललं आहे.. तिला काहीच माहीत नव्हतं. आज सोमवार सकाळ. अर्चना ऑफिसच्या दारात पोहोचली आणि पाहतो तर काय? रिसेप्शनमध्ये मोठ्ठाली रांगोळी काढलेली. त्यात फुलांच्या पाकळ्या जागोजागी अतिशय रेखीवपणं मांडल्या होत्या. शेजारी एक भली मोठ्ठी समई. कुणालातरी विचारणार इतक्यात तिला शेजारी एक ‘वेलकम’ बोर्ड दिसला. त्यावर तीन-चार पाश्चात्त्य इसमांची नावं होती. अर्चनाला कळलं, मागच्या आठवडय़ातील गडबड होती ती हीच. परदेशातून काही कस्टमर्स येणार होते, त्यांच्या स्वागताची तयारी होती ती.

साडेदहाच्या सुमारास अर्चना जागेवरून उठली वॉशरूमला जायला. वाटेवर बोर्ड रूम होती तिथेही थोडी तयारी, गजबज चालू होती. कस्टमर मंडळींसाठी इथे काही प्रेझेन्टेशन्स असणार.. अर्चनाने ताडलं. पुढे मग रिसेप्शन ओलांडत ती वॉशरूमला गेली. वॉशरूममधून मग बाहेर येते तर काय.. कस्टमर्स दारात पोचले होते, पण त्यांचं स्वागत करायला कोणीच नव्हतं. अर्चनाला रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावरचा हताशपणा दिसला. तिनं मग रिसेप्शनवर ठेवलेलं ओवाळणीचं ताट उचललं आणि ती पटदिशी मुख्य दारापाशी आली आणि कस्टमरच्या चार जणांना तिनं ओवाळलं आणि गळ्यात हार घातले. त्यांना तिनं ‘वेलकम’ म्हटलं आणि त्यांना बोर्ड रूमकडं नेलं. बोर्ड रूममध्ये सामान ठेवल्यावर मग अ‍ॅडमिनच्या काही लोकांनी त्यांना वॉशरूम्स वगरे दाखवल्या. अर्चना आपल्या जागेवर जात असताना तिनं एम.डीं.ना लाल बुंद होऊन तरातरा बोर्ड रूमकडे जाताना पाहिलं. काहीतरी गडबड झाली होती एवढं तिनं ओळखलं.

नंतर मग अर्चना आपल्या कामात दंग झाली आणि तिला सगळ्याचा विसर पडला. दुपारभर कंपनीच्या वातावरणात एक प्रकारचा ताण जाणवत राहिला. खासकरून वरिष्ठ हुद्दय़ावरच्या मंडळींमध्ये. सगळं काही नीट व्हावं, कस्टमरचं कंपनीबद्दलचं इंप्रेशन चांगलं व्हावं याच्या वजनाने माहोल जडशीळ झाला होता. दिवसभर मग वेगवेगळ्या माणसांची आत-बाहेर, जाण्या-येण्याची लगबग जाणवली. अर्चना कामासंबंधी काहीतरी वाचत होती आणि त्यात दंग झाली. काही वेळाने तिला काहीतरी विचित्र जाणवलं, म्हणून तिनं डोकं वर काढलं तर तिच्या आजूबाजूला पाच-सहा माणसं उभी होती. टुणकन उडी मारून ती उभी राहिली. सकाळी ज्यांचं स्वागत केलं ती कस्टमरकडची चार जणं आणि खुद्द एम.डी. तिच्या शेजारी उभे होते! ती थोडी गांगरून गेली.

एम.डी. तिला धीर देत म्हणाले, ‘काही नाही, यांना कंपनीचा एक फेरफटका मारायचा होता, काही जणांशी गप्पा मारायच्या होत्या. त्यांना तू दिसलीस. ते तुला काही विचारतील.’

अर्चनाचे पाय लटपटले, घसा कोरडा पडला. कस्टमर ग्रुपमधील िलडा नावाच्या बाईने हे ओळखलं आणि तिला थोडं पाणी पिऊन घ्यायला सांगितलं. िलडानं तिला थोडा धीरही दिला. ‘आम्ही अगदी सहज काही गोष्टींची चौकशी करतो आहोत. घाबरायचं कारण नाही,’ असंही सांगितलं. चौघे मग चार खुच्र्या घेऊन बसले आणि प्रथम त्यांनी तिचे त्यांचं सकाळी स्वागत केल्याबद्दल आभार मानले. मग अर्चना काय काम करते, तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत, तिनं कधी जॉइन केलं, जॉइन केल्यानंतर तिची कोणती कोणती प्रशिक्षणं झाली वगरे माहिती विचारली.

तिनं सगळ्या प्रश्नांची छान सविस्तर उत्तरं दिली. चौघांनी तिला धन्यवाद देत ते उठू लागले. िलडानं तिला एक अगदी वॉर्म स्माइल दिलं. अर्चनानं मग धीर एकवटून तिला भारत कसा वाटला, पहिल्यांदाच येत आहात का, इथलं काही आवडतं का विचारलं. िलडाबाई मग खूप मोकळेपणाने बोलल्या. भारतातून त्यांना खूप शॉिपग करायचं होतं. पुढची दहा मिनिटं बाईंनी मग अर्चनाच्या शेजारीच ठिय्या मारून तिला भारतातून काय काय विकत घ्यायचंय याची लांबच लांब यादी वाचून दाखवली. अर्चना तिला मग कुठं काय चांगलं मिळतं, कुठं बार्गेन करावं लागतंची सविस्तर माहिती देऊ लागली. एका पॉइंटला िलडा तिला म्हणाली, ‘तूच का येत नाहीस माझ्यासोबत संध्याकाळी शॉिपगला?’ दोघींचं ठरलंच मग.

तीन तास टाऊन साइडला भरपूर शॉिपग करून िलडाबाई अगदी तृप्त होऊन हॉटेल रूमवर परतल्या. त्यांची लेट नाइट फ्लाइट होती, जिने ते चौघं पुढे बंगळुरूला दुसऱ्या एका कंपनीत जाणार होते. दुसऱ्या दिवशी एम.डीं.ची सेक्रेटरी अर्चनाला शोधत आली, ‘सरांनी तुला बोलावलय.’

सीनियर मॅनेजमेंटच्या केबिन्स समोरून चालत मग दोघी एम.डीं.च्या केबिनपाशी गेल्या. सेक्रेटरीने दार हलकेच टॅप केले आणि आत डोकावली आणि अर्चनाला मग तिनं आत जायला खुणावलं. अर्चनाच्या पोटात खड्डा पडला. खोल श्वास घेत ती आत शिरली. प्रशस्त ऑफिसात तिला अगदीच छोटं वाटलं. एम.डी. जागेवरून उठून तिच्याकडे आले आणि तिचा हात हातात घेत म्हणाले, ‘यू डिड अ गुड जॉब माय डिअर. थँक यू सो मच.’ अर्चनाची त्यांनीही मग थोडी चौकशी केली आणि ती मग केबिनबाहेर आली. एकदम हलकं वाटलं मग तिला.

पुढच्या कस्टमर व्हिझिटला मॅनेजमेंटला अर्चनाची आठवण येईल का? येण्याची खूप दाट शक्यता आहे. काही नाही तर शॉिपगसाठी नक्की येईल. कदाचित कस्टमर्सना काय गिफ्ट्स द्यावीत याबद्दल तिला सहभागी केलं जाईल. कदाचित त्यांना काहीतरी प्रेझेन्ट करायची एखादी छोटी संधीही तिला मिळेल. का? त्या कंपनीत अनेक लोकांना शॉिपगची माहिती असेल आणि प्रेझेन्टेशन्सचाही अनुभव असेल, पण या मुलीनं आपल्या स्वयंप्रेरित (प्रोअ‍ॅक्टिव्ह) वृत्तीनं सगळ्यांची मनं जिंकली होती. मॅनेजमेन्टचा विश्वास संपादन केला होता. कस्टमर्सचं स्वागत करणं तिचं काम नव्हतं. ते करायला कुणीच नाही हे पाहिल्यावर ती ‘हे माझं काम नाही,’ असं म्हणत तिथून निघून गेली नाही. याउलट तिनं त्या क्षणी जे योग्य आणि आवश्यक होतं ते चोखपणं निभावलं. कस्टमरच्या प्रश्नांना जेवढय़ास तेवढी उत्तरं देऊन ती थांबू शकली असती. तिनं आपणहून त्यांची अधिक चौकशी केली, त्यांना आपली एक संध्याकाळ दिली. हे सगळं तिने उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने केलं.. ही झाली स्वयंप्रेरित वृत्ती. यानंही तुम्हाला ‘व्हिझिबिलिटी’ मिळते आणि करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आणखी अशा संधी कशामुळं मिळू शकतात.. पाहूया पुढच्या लेखात.

palsule.milind@gmail.com