09 March 2021

News Flash

यू.पी.एस.सी.- तयारी निबंधलेखनाची

यूपीएससीची पूर्वपरीक्षा संपली. थोडय़ाच दिवसांत निकाल लागेल. जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ते मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील. त्यानंतर खरे तर परीक्षेचे आव्हान सुरू होईल, कारण मुख्य

| June 10, 2013 12:09 pm

यूपीएससीची पूर्वपरीक्षा संपली. थोडय़ाच दिवसांत निकाल लागेल. जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ते मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील. त्यानंतर खरे तर परीक्षेचे आव्हान सुरू होईल, कारण मुख्य परीक्षेत उत्तम गुण मिळवून अंतिम निवडयादीत अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी एकेक मार्क महत्त्वाचा ठरतो.
पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते, तर मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाची आहे. मुख्य परीक्षेत निबंधाचा एक स्वतंत्र पेपर असतो. २५० गुणांसाठी दिलेल्या चार किंवा पाच विषयांपकी कोणत्याही एका विषयावर तीन तासांत निबंध लिहावा लागतो. थोडक्यात, मुख्य परीक्षेच्या दृष्टीने निबंध हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
निबंध कसा लिहावा, त्याची तयारी कशी करावी, हे प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच  भेडसावत असतात. निबंध लिहिणे ही एक कला आहे, एक कौशल्य आहे. मात्र, प्रयत्नपूर्वक ते आत्मसात करता येते.
मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेत, प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी शब्दमर्यादा दिलेली असते. मात्र निबंधाच्या पेपरसाठी शब्दमर्यादा सांगितलेली नसते. म्हणूनच नेमक्या किती शब्दांत निबंध लिहावा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. उत्तर साधे आहे. सामान्य अध्ययनाचा पेपर लिहिताना दोन गुणांसाठी आयोगाची २० शब्दांची मर्यादा आहे. म्हणजे लिहिण्यासाठी साधारणत: २५० गुणांसाठी दोन हजार ते अडीच हजार शब्दमर्यादा पाळणे आवश्यक आहे. अगदीच दीड हजार शब्दांहून कमी शब्दांचा निबंध लिहू नये. (अर्थात हा काही नियम नाही.)
निबंधात शैलीपेक्षा अभिव्यक्ती महत्त्वाची ठरते. आयोगाने आपल्या अधिसूचनेत असे नमूद केले आहे की, दिलेल्या विषयांपकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा. सुसंगत व स्पष्टपणे निबंध लिहिणे अपेक्षित आहे. थेट व परिणामकारक अभिव्यक्तीला गुण दिले जातात. म्हणजेच उथळपणे लिहिलेल्या, कसेबसे दोन हजार शब्दांपर्यंत ओढूनताणून लिहिलेल्या निबंधाला गुण मिळणार नाहीत, हे नक्की. निबंध हा विचार मांडण्यासाठी लिहिला जातो. निबंधातील शब्दरचना शक्यतो सोपी असावी. दिलेल्या विषयांपकी तुम्हाला उमजलेला, तुम्ही ज्या विषयाची चांगली तयारी केली आहे किंवा तुमच्या ज्ञानशाखेशी संबंधित असा विषय निवडावा. विज्ञान शाखेशी संबंधित विद्यार्थ्यांनी विज्ञानासंबंधी एखाद्या विषयावर निबंध लिहिताना काळजी घ्यावी. त्या विषयाशी संबंधित विज्ञानातील जड संकल्पना, सूत्रे लिहू नयेत. तसेच आपल्या वैकल्पिक विषयाशी संबंधित एखाद्या विषयावर निबंध लिहिताना विशेष काळजी घ्यावी.
निबंधाची तयारी कशी करावी?
या घटकाची तयारी करण्यासाठी आपण तयारी करणाऱ्यांचे दोन प्रकार असतात-
१) ज्यांना एक-दीड वर्षांनंतर परीक्षा द्यायची आहे, अशांसाठी दीर्घ मुदतीची तयारी (Long Term Preparation )
२) ज्यांना २०१३ ची मुख्य परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी अल्पावधीतील तयारी( Short Term Preparation)
दीर्घ तयारी  (Long Term Preparation )
परीक्षेसाठी एक वर्ष किंवा दोन वर्षांचा अवधी असलेल्या उमेदवारांकडे तयारीसाठी मुबलक वेळ असतो. त्यांनी या घटकाच्या तयारीसाठी योग्य रणनीती तयार करावी. दररोज किमान दोन वृत्तपत्रांचे वाचन करावे. जर निबंध इंग्रजीमध्ये लिहिणार असाल तर आघाडीच्या काही इंग्रजी दैनिकांचे वाचन करावे. संपादकीय तसेच महत्त्वाचे लेख रोज वाचावेत. अवघड शब्द, म्हणी, वाक् प्रचार यांचा अर्थ समजून घ्यावा. इंग्रजीसाठी शब्दसंपदा जेवढी समृद्ध, तेवढे कोणत्याही विषयावर आपणास आपले मत ठामपणे मांडणे सोपे जाते. विविध विचारवंतांचे विचार, त्यांनी एखाद्या विषयावर मांडलेले मत, काही म्हणी, कविता यासंबंधीची टिपणे काढावीत. अभ्यासाव्यतिरिक्त इतर संबंधित विषयांवरील पुस्तकांचेही वाचन करावे.
वेळोवेळी एखादा विषय घेऊन त्यावर निबंध लिहून पाहावा. शक्य झाल्यास तज्ज्ञ व्यक्तींकडून तो तपासून घ्यावा. असे केल्यास परीक्षेच्या वेळेस आपल्याला निबंध या घटकाची तयारी स्वतंत्रपणे करावी लागणार नाही.
२०१३ साठी मुख्य परीक्षा : तयारी
निबंधाच्या पेपरसाठी तीन तासांचा अवधी असतो. म्हणजे १८० मिनिटे. पहिली १० मिनिटे निबंध वाचून विषय समजून घेण्यासाठी व शेवटची १० मिनिटे निबंध वाचून त्यातील बारीकसारीक चुका दुरुस्त करण्यासाठी ठेवल्यास हातात १६० मिनिटे उरतात. दोन हजार शब्दांत निबंध लिहिण्यास हा वेळ पुरेसा ठरतो. सर्वप्रथम कोणत्या विषयावर निबंध लिहिणार, ते निश्चित करा. विषय निश्चित झाल्यानंतर त्याबद्दल काय लिहिणार आहात, त्यात कोणते मुद्दे अपेक्षित आहेत यांची कच्ची मांडणी एका कागदावर करा. त्या मुद्दय़ांना लगेच क्रम देऊ नका. सुरुवातीला मुद्दे लिहून घ्या व नंतर त्यांना क्रम द्या.
एकदा कच्ची रूपरेषा निश्चित झाल्यानंतर त्याची मांडणी (अभिव्यक्ती ) कशी करू शकतो, याचा विचार करावा. आपल्या विचारांची मांडणी अशा प्रकारे करावी की, ज्यात आपण देत असलेली उदाहरणे, करत असलेला युक्तिवाद, देत असलेली माहिती, दाखले, दृष्टांत या सर्वाची एकसंध बांधणी होऊन निबंध तयार व्हावा. निबंध प्रभावी करण्यासाठी उदाहरणे, कोटेशन्स, काही विचारवंतांची मते सहजसोप्या भाषेत लिहावीत. लांबलचक पल्लेदार वाक्ये, अवघड शब्दप्रयोग शक्यतो टाळावेत. कोणताही विचार लिहिताना मुद्दाम ओढूनताणून केलेला नसावा, नाहीतर निबंध हा निबंध राहणार नाही. लिहिताना आपली शैली सहज असावी. एखाद्या विचारवंताचे एखादे वाक्य लिहिताना ते कुणाचे आहे, यात गल्लत करू नका. उदा. जर वाक्य अब्राहम लिंकनचे असेल आणि ते वाक्य जॉर्ज वॉिशग्टन यांचे आहे, असे लिहिल्यास विपरित परिणाम होऊन मार्कस् कमी होतील. एखादे कोटेशन तुम्हाला नक्की माहीत असेल तरच लिहावे. माहीत नसेल किंवा तुम्ही त्याबाबत जरा जरी साशंक असाल तर लिहू नका. वाक्यातील शब्दांची अदलाबदल करू नका. उदा. माओचे एक वाक्य आहे-Power Flows from the barrel of gun.  हे वाक्य Barrel of the gun contains Power
निबंधात आपले विचार (Content), मांडणी  (Composition ) व लिहिण्याची योग्य शैली ( Style) याचा सम्यक मेळ साधला गेला तर निबंध प्रभावी ठरतो.
निबंध लिहिताना होणाऱ्या चुका
मोठे उत्तर लिहिताना सुरुवात अगदी अचूक माहीत असलेल्या वाक्याने करावी. त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे क्रमाने लिहावेत. नंतर प्रत्येक मुद्दा चार ते पाच ओळींत लिहिण्याचा प्रयत्न करावा. उत्तराचा शेवट समर्पक आणि लिहिलेल्या  सर्व मुद्दय़ांचा सारांश असलेला हवा.
पेपर तपासणारे परीक्षक देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांतून आलेले तज्ज्ञ प्राध्यापक असतात. ते अनुभवी असतात, म्हणून वरवरचे मुद्दे मांडून, पानभर निबंध लिहून फसविण्याचा प्रयत्न करू नये.
निबंधाचा विषय निवडताना ज्याबाबत तुम्हांला थोडी माहिती आहे किंवा ज्या विषयातील आपले ज्ञान अल्प आहे, असे उदा. ‘ Do we need nuclear Power ?’(आपणास अणुऊर्जेची गरज आहे काय?) या विषयावर निबंध लिहिताना परीक्षार्थी सुरुवात पुढील मुद्दय़ांनी करतो- औष्णिक ऊर्जेचे तोटे, त्यामुळे किती व कसे प्रदूषण होते, भारताची वाढणारी लोकसंख्या, कोळशाचे कमी होत जाणारे साठे, अणुऊर्जा कशी स्वस्त पडते, त्यामुळे कमी प्रदूषण होते, जपान त्सुनामी इ. घटकांना स्पर्श करत सुमारे ५०० ते ६०० शब्द पूर्ण करताना त्याची दमछाक होते. मग तो पुन्हा नवीन मुद्दय़ांवर विचार करायला लागतो. नंतर लक्षात येते, अणुऊर्जा प्रकल्पांमुळे लोकांचे विस्थापनदेखील होते. मग तो महाराष्ट्राच्या संदर्भात लिहायला सुरुवात करतो आणि त्याचे अध्रे पान लिहून पूर्ण होते. तरीही त्याला अपेक्षित शब्दमर्यादा पार करायची असते. मग त्याला भूमी अधिग्रहण (Land Acquisition) चा मुद्दा आठवतो. मग तो या मुद्दयाशी संबंधित फायदे-तोटे लिहू लागतो आणि आणखी अर्धे पान भरते. लिहिता लिहिता त्याच्या लक्षात येते, आपल्याला भारत-अमेरिका नागरी अणुकराराबाबत लिहायला हवे. मग तो सीटीबीटी (CTBT), एनपीटी (NPT) याबाबतही लिहितो. नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेतील कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याच्या दृष्टीने भारताची दावेदारी किती योग्य आहे, याबाबत लिहायला सुरुवात करतो.. तीन तास उलटेपर्यंत तो त्यावर लिहीत राहतो. अशा रीतीने तो मूळ मुद्दय़ापासून भरकटत जातो. निबंधात सुसंगत विचारांची व्यवस्थित मांडणी नसते.
अशा निबंधास २५० पकी ५० पेक्षाही कमी गुण मिळतात, तेव्हा त्याला चूक उमगते. मुख्य परीक्षेत इतर विषयांत चांगले गुण असूनही एकूण मार्कामध्ये यामुळे कमी पडल्याने मुलाखतीसाठी आपल्याला बोलावणे येत नाही. अनेक तज्ज्ञ प्राध्यापकांशी बोलल्यानंतर तसेच अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून निबंध लिहिताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी, हे निश्चित-
०    सर्वप्रथम दिलेले विषय व्यवस्थित समजून घ्यावे. इंग्रजीत विषय समजला नसेल तर िहदीत वाचून, ज्या विषयावर आपली पकड आहे त्या विषयावर निबंध लिहावा.
०    निबंध लिहिण्यास घाईने सुरुवात न करता त्यात आपण कोणते मुद्दे लिहिणार आहोत त्याची मांडणी करून कच्चा आराखडा तयार करावा.
०    एकदा मुद्दे लिहिल्यानंतर त्यांना योग्य क्रम द्यावा.
०    निबंधाला सुरुवात करताना सुरुवात आकर्षक, विषयाशी निगडित व विषयाची घट्ट पकड घेणारी असावी.
०    उर्वरित निबंध वाचण्याचे परीक्षकाचे कुतूहल वाढण्यासारखी सुरुवात  असावी.
०    ज्या विषयावर आपण निबंध लिहीत आहोत, तो विषय सोडून इतर अवास्तव माहिती लिहू नये.
०    वस्तुनिष्ठ माहिती (डाटा) याला निबंधात फारसे महत्त्व नाही. तुम्ही लिहीत असलेल्या विषयात तुमचे किती ज्ञान आहे, विचारांची तुम्ही कशी मांडणी केली आहे, तो विषय सकारात्मक प्रकारे कशा शैलीत लिहिला आहे, यावरून निबंधाचे गुण ठरतात.
०    विनाकारण सरकारी धोरणावर टीका करू नका. उदा.अमूक पदावरील व्यक्तीने अशी पावले उचलायला हवी होती वा असे निर्णय घ्यायला हवे होते. अशा प्रकारच्या लिखाणाने कमी गुण मिळू शकतात.
०    कोणत्याही प्रश्नावर तुमचे मत लिहिताना ते वास्तवाला धरून असावे, ते अगदीच नाटय़मय असू नये.
०    निबंधातील भाषा सोपी असावी. निबंधात एका मुद्दय़ाचा दुसऱ्याची मेळ असावा. त्यातून विचारांची ताíकक सुसंगती साधली जावी.
०    निबंधाचा शेवट संपूर्ण निबंधाशी मिळताजुळता असावा. शक्यतो आपले स्वत:चे वैयक्तिक मत न देता निबंधाला अनुरूप असा शेवट करावा.
परीक्षा केंद्रात निबंध लिहिताना :
०    पेपर हातात मिळाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत वाचून पेपरमध्ये दिलेले विषय नीट समजून घ्यावेत.
०    पुढील ४५ ते ५० मिनिटांत निबंधाचा कच्चा आराखडा, त्यात समाविष्ट करावयाचे मुद्दे, त्यांचा क्रम यांची मांडणी करून घ्यावी. उरलेल्या दीड ते पावणेदोन तासांत निबंध लिहावा, तर शेवटची १५ मिनिटे काही चुका दुरुस्त करण्यासाठी हातात ठेवावीत.
थोडक्यात सांगायचे तर निबंध हा घटक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अजूनही मुख्य परीक्षेसाठी सहा महिने उरले आहेत. निबंधलेखनाचा व्यवस्थित सराव करावा.
यू.पी.एस.सी.च्या संदर्भात काही व्यक्ती असे मत मांडतात की, निबंधासाठी विशेष तयारी करण्याची गरज नसते. सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांचा अभ्यास करता करता त्याची तयारी होत असते. पण या परीक्षेत एकेका गुणाला असलेले महत्त्व लक्षात घेतले आणि संबंध देशात या परीक्षेसाठी होणारी स्पर्धा बघितली तर योग्य प्रकारे तयारी केलेली उत्तम!
परीक्षार्थीनी निबंधलेखनाची व्यवस्थित तयारी करावी. ठरावीक विषयांवर निबंध लिहून पाहावेत. ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. या परीक्षेत चांगल्या क्रमांकाने यशस्वी व्हायचे असेल तर अधिकाधिक सराव करणे श्रेयस्कर.                         
grpatil2020@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2013 12:09 pm

Web Title: how to prepare for upsc essay
टॅग : Upsc,Upsc Exam
Next Stories
1 भारत पेट्रोलियमच्या एचआर विभागातील विविध संधी
2 कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन
3 फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, डेहराडून येथील संधी
Just Now!
X