द चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख – हाँगकाँगमधील ‘शा तीन’ या शहरात असलेले ‘द चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’ (सीयूएचके)हे एक जागतिक दर्जाचे विद्यापीठ आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार ते जगातील एकोणपन्नासाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. ‘लेजिस्लेटिव्ह कौन्सिल ऑफ हाँगकाँग’च्या विद्यापीठ कायद्यानुसार या विद्यापीठाची स्थापना १९६३ मध्ये झाली. Through learning and temperance to virtue हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. सीयूएचके हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. एकूण १३७ हेक्टरच्या परिसरात विद्यापीठाचा विस्तार आहे. येथे दीड हजारांहून अधिक प्राध्यापक-संशोधक आहेत. जवळपास एकवीस हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. या विद्यापीठाशी संलग्न नऊ महाविद्यालये आणि आठ शैक्षणिक विभाग आहेत. शैक्षणिक व प्रशासकीय अशा दोन्ही स्तरांवरील कामे विद्यापीठाच्या आठ विभागांमध्ये आणि संलग्न नऊ महाविद्यालयांमध्ये विभागलेली आहेत. म्हणूनच सीयूएचके ही हाँगकाँगमधील एकमेव ‘कॉलेजिएट युनिव्हर्सिटी’ आहे.

अभ्यासक्रम – द चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगमधील बहुतांश पदवी अभ्यासक्रम हे चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम हे एक वर्षांपासून ते चार वर्षांच्या कालावधीचे आहेत. विद्यापीठामधील सर्व अभ्यासक्रमांचे अध्ययन-अध्यापन हे इंग्रजी आणि चिनी अशा दोन्ही भाषांमध्ये चालते. विद्यापीठात एकूण आठ प्रमुख विभाग (स्कूल्स) कार्यरत आहेत. यामध्ये कला, व्यवसाय व्यवस्थापन, शिक्षण, अभियांत्रिकी, विधि शिक्षण, वैद्यकीय, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विभागांचा समावेश आहे. पदवी स्तरावर विद्यापीठ सत्तरहून अधिक अभ्यासक्रमांचा पर्याय बहाल करत आहे. सर्व अभ्यासक्रम ‘टॉट प्रोग्राम’ आणि ‘रिसर्च प्रोग्राम’ अशा दोन गटांमध्ये विभागले आहेत. ‘हाँगकाँग रॉयटर्स’ने सीयूएचकेचा नामोल्लेख करताना, पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी आशिया खंडातील सर्वात अभिनव विद्यापीठह्ण असे प्रशस्तीपूर्ण शब्द वापरले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्धवेळ आणि पूर्णवेळ असे दोन पर्याय विद्यापीठाने दिले आहेत. पदव्युत्तर स्तरावर असलेल्या ‘एमफिल-पीएचडी आर्टक्यिुलेटेड प्रोग्राम्स’ या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांला त्याच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यानच प्रवेश दिला जाईल. विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांसाठीची  प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे.

सुविधा – हाँगकाँग हे एक सुरक्षित आंतरराष्ट्रीय शहर आहे. शहरातील आरोग्य सुविधा जागतिक दर्जाच्या आहेत. येथे इंग्रजीभाषिक साक्षरतेचा दर उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. सीयूएचके विद्यापीठाचा परिसर हाँगकाँगमधील विद्यापीठांपैकी सर्वात मोठा व सर्वाधिक हिरवागार परिसर म्हणून ओळखला जातो. विद्यापीठातील अद्ययावत आणि आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणाबरोबरच उत्तम राहणीमान देतात. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय यांसारख्या शैक्षणिक सुविधा आहेतच. त्याचसोबत संगीत कक्ष, जलतरण तलाव व जवळपास सर्व प्रकारच्या खेळाच्या सुविधा आदी शिक्षणेतर सुविधाही आहेत.  सीयूएचकेने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पात्रतेच्या निकषांनुसार शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत, शैक्षणिक कर्ज, ऑन कॅम्पस नोकऱ्या, कमवा-शिका कार्यक्रम इ.सुविधा दिलेल्या आहेत. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिसरात खात्रीशीर निवासाची सुविधा देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना स्टुडंट क्लब्स, असोसिएशन्स यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

वैशिष्टय़

या विद्यापीठात होणारे संशोधन उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचे मानले जाते.  विद्यापीठातील प्राध्यापक-संशोधकांनी आतापर्यंत चार नोबेल पारितोषिके मिळवलेली आहेत. संशोधनासाठी विद्यापीठ औद्योगिक क्षेत्रासहित अनेक नामांकित संशोधन संस्थांबरोबर मिळून कार्यरत आहे. शैक्षणिक विभागांबरोबरच विद्यापीठाच्या संशोधन संस्था स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. कृषी, जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयांमध्ये विद्यापीठाचे अद्ययावत संशोधन अव्याहत चाललेले आहे.

संकेतस्थळ –  http://www.cuhk.edu.hk