शिक्षक दिन विशेष
प्रत्येक व्यक्ती वेगळी, तिच्या शिकण्याच्या पद्धती वेगळ्या, क्षमता वेगळ्या, जडणघडण वेगळी आणि त्यातून बनलेलं रसायनही वेगळंच. शिकवण्यासाठी यातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचणं, त्याचं सहकार्य मिळवणं- हे खरं तर आपलंच शिकणं आणि शिक्षक म्हणून फार सुफळ संपूर्ण असा अनुभव देणारं!

५ सप्टेंबरच्या ‘शिक्षक दिन’निमित्ताने खास लेख-
इंजिनीअरिंग कॉलेजचं पहिलं वर्ष. मॅथ्सचे एक प्रोफेसर छानच शिकवायचे. म्हणजे आमच्या कॉलेजचं अख्खं मॅथ्स डिपार्टमेन्ट चांगलं होतं, पण या सरांच्यात काही खास होतं. एक टॉपिक सुरू करायच्या आदल्या दिवशी ते म्हणाले, ‘उद्यापासून आपण जो टॉपिक सुरू करणार आहोत, तो सगळ्यांना जरा बोअर वाटतो, म्हणून मला वाटतं, आपण काहीतरी विशेष करूया, म्हणजे जरा मजा येईल. आपल्याला काय करता येईल?’ एक मिनिट कुणालाच काही सुचलं नाही. मग सरच म्हणाले, ‘आपण सगळेजण उद्या टाय लावून आलो तर?’ सगळे उत्स्फूर्तपणे जोरात ‘हो’ म्हणाले. ‘चला ठरलं, उद्या आपण सगळे टाय लावू, अगदी मुलीसुद्धा.’ दुसऱ्या दिवशी वर्गातल्या दहा मुलींसकट सगळेच टायसह वर्गात हजर होते. तो दिवस आणि नंतर तो अख्खा चॅप्टर मग बोअर वाटलाच नाही.
आपण शिकत असताना, अनेक शिक्षक कळत-नकळत त्यांच्या काही पाऊलखुणा आपल्या व्यक्तिमत्त्वात उमटवून जातात. या सरांची ‘आता आपण काय करूया?’ ही खास टॅगलाइन होती. याचा माझ्यावर खूप परिणाम झाला असावा. मी स्वत: इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली तेव्हा समोरची मुलं जेमतेम माझ्यापेक्षा चारपाच वर्षांनी लहान होती. पण मुलांनाच ‘आपण काय करूया’ हे विचारणं मला फार उपयोगी ठरलं. एक चॅप्टर शिकवताना मी म्हटलं, ‘मी यातले फॉम्र्युले तुम्हाला थेट लिहून देऊ शकते, किंवा त्यामागच्या काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मला आणखी तीन लेक्चर्स लागतील, काय करायचं सांगा,’ मुलं म्हणाली, ‘चालेल, तीन लेक्चर्स लागली तरी.’ मी मग म्हटलं, ‘ज्यांना डायरेक्ट फॉम्र्युले हवे असतील, त्यांनी ही तीन लेक्चर्स नाही अटेंड केली तरी चालतील.’ पण प्रत्यक्षात सगळा वर्ग सगळे दिवस हजर होता.
खरं तर २०-२२ वर्षांपूर्वी शिकण्याच्या प्रक्रियेबाबत (लर्निग प्रोसेस) मला फारशी काही माहिती नव्हती. शिकवताना मला मजा यायची, म्हणून शिकवायला लागले. जोडीला माझं पोस्ट-ग्रॅज्युएशन सुरू होतं. त्यामुळे मी मुलांना गमतीने म्हणायचे, ‘मी एकाच वेळी शिकते आहे आणि शिकवतेही आहे.’ मजा म्हणजे या वाक्याची खरी प्रचीती मला अनेक वर्षांनी यायला लागली.
पुढे काही वर्षांनी अमेरिकेत असताना एका प्रीस्कूलमधून ‘छोटय़ा मुलांसाठी अ‍ॅक्टिव्हिटीजची आखणी करणार का,’ अशी मला विचारणा झाली. माझी पहिली प्रतिक्रिया- ‘नाही बाबा, एवढय़ा लहान मुलांबरोबर काम करणं मला नाही जमणार,’ अशी होती. मी तर युनिव्हर्सिटी लेव्हलला शिकवलं होतं ना? प्रीस्कूलच्या संचालक तेव्हा मला म्हणाल्या होत्या, ‘लहान मुलं – मोठी मुलं असं काही नसतंच. आणि आपण शिकवायचंही नसतंच. समोरचा शिकणार असतो, आपण त्याला फक्त शिकायला मदत करायची असते.’ तेव्हाही मला हे काही फार उमगलं होतं, अशातला भाग नाही. पण करून तर बघूया, म्हणून मी ते काम स्वीकारलं.
या प्रीस्कूलमध्ये मला नोवा भेटला. तीन-साडेतीन वर्षांचा. मूळ जपानी मुलगा, अमेरिकन आई-बाबांनी दत्तक घेतलेला. हा लहानखुरा, पिटुकल्या डोळ्यांचा मुलगा प्रचंड तल्लख होता. तो फारसा बोलायचाही नाही, पण समोर आलेल्या कामाचा फडशा पाडून हाताची घडी घालून आता पुढची ऑर्डर काय, अशा सैनिकाच्या अविर्भावात उभा राहायचा. त्याला उद्योग काय द्यायचा, हा शाळेत सगळ्यांसमोर मोठाच प्रश्न असायचा. मग काही काम दिलं नाही की कंटाळून जायचा. नोवाच्या चेहऱ्यावर कंटाळा सोडून फारसं काही दिसत नाही, असं सगळेच म्हणायचे.
नोवा माझ्या ग्रुपमध्ये आला. एकदा त्याची दिलेली अ‍ॅक्टिव्हिटी लगेचच करून झाली. मग मी विचारलं, ‘व्हॉट वुड यू लाइक टू डू नाऊ?’ नोवा शांतपणे म्हणाला, ‘नथिंग.’ मी एक आवंढा गिळला, पण त्याला तसंच शांतपणे बसू देण्यावाचून माझ्याकडे आता काही पर्याय नव्हता. तो भल्या मोठय़ा बीनबॅगवर बसला. गुडघ्यावर कोपर ठेवून आणि आपले गाल दोन पंजात ठेवून! बराच वेळ तो बाकी मुलांना न्याहाळत राहिला. मग आला आणि इतर मुलांबरोबर गाणी म्हणायला लागला.
हळूहळू नोवासाठी काही ना काही अ‍ॅक्टिव्हिटी शोधायचं, माझं स्वत:चंच कम्पल्शन खूप कमी झालं. नंतर नंतर तोच सकाळी आल्या आल्या सांगायचा की आपली मेन अ‍ॅक्टिव्हिटी झाली की, नंतर मला अमुक अमुक करायचं आहे. किंवा मी त्याचा आधीच सांगायचे की, आज माझ्याकडे त्याच्यासाठी काहीतरी नवीन आहे. मग आम्हाला एकमेकांकडे बघूनच मजा यायला लागली.
तिथे अलेक्सीही भेटली. चार वर्षांची होती. असहकार हेच तिचं कुणाहीबरोबर वावरायचं एकमेव तंत्र होतं. तिची घरची पाश्र्वभूमीही त्रासदायकच होती. तिलाही मी एकदा विचारलं, ‘व्हॉट वुड यू लाइक टू डू नाऊ?’ तिने एक मिनिट नुसतं माझ्याकडे पाहिलं. मग काहीतरी पुटपुटली. आणि समोर आलेली अ‍ॅक्टिव्हिटी तिने झपाटय़ाने पुरी केली. पुढे मला अलेक्सीकडून कधी त्रास नाही झाला.
नोवा आणि अलेक्सीने मला मुलांबरोबर वावरायचा खूप विश्वास दिला. माझ्या ध्यानीमनी नसताना भारतात परत आल्यावर मी चक्क शिक्षण आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर काम करायला लागले.
मुंबईत मी स्वत: शिकले त्या शाळेतच पूर्वप्राथमिक विभागासाठी अभ्यासक्रमाच्या आखणीचं काम केलं. माझी शाळा, तिथला सगळा सेटअप तर माझ्या एकदमच परिचयाचा होता. ते सगळं माझं होम पीचवरचं होतं. पण एवढय़ा छोटय़ा मुलांसाठी काम करायला सुरुवात केली तेव्हा सगळंच वेगळं वाटायला लागलं. आपल्याला किती गोष्टी येतच नाहीत, जमत नाहीत, हे रोज नव्याने कळायला लागलं. दुसरीत शाळेत असताना एकदा गायीचं चित्र काढलं नाही, म्हणून मला वर्गाबाहेर काढलं होतं. माझ्या शाळकरी आयुष्यात मला झालेली ही एकमेव शिक्षा. ती मला फार झोंबली होती. इतकी की, पुढे मी कधी प्राण्यांचे चित्र काढायच्या भानगडीतच पडले नाही. मेमरी ड्रॉइंग मला मनापासून नको असायचं, कारण त्यात कुठेतरी बारीकसा कुत्रा, मांजर काढलेलं असतं म्हणून. बाकी चित्रकला ठीकठाक असूनही मी तेवढय़ासाठी ड्रॉइंगच्या परीक्षाही दिल्या नाहीत. पण मुलांबरोबर काम करायला लागल्यावर याचा मोठा अडसरच व्हायला लागला. आम्ही चित्र काढत काढत गोष्ट उलगडत जायचा एक खेळ खेळायचो. तो मुलांना प्रचंड आवडायचा. माझ्या काही सहकारी त्यात फारच माहिर होत्या. त्यामुळे माझ्यावर तो खेळ घ्यायची फारशी वेळ नाही यायची. पण एकदा ती वेळ आलीच. मी मुलांना सांगून टाकलं, की प्राण्यांची चित्रं मला जमत नाहीत. आपल्याला काय करता येईल?
एकजण म्हणाला, ‘ताई, तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला जमेल.’
दुसरी एकजण म्हणाली, ‘तुम्ही नुसत्या रेघा- स्टिक ड्रॉइंग काढा, आम्हाला कळेल.’ मला प्रयत्न करण्यावाचून काही पर्याय नव्हता. मध्येच एकजण म्हणाली, ‘चांगलं काढताय की. घाबरू नका, आम्हाला कळतंय!’ मग शेवटी एकजण म्हणाला, ‘पुढच्या वेळी आणखी छान काढाल तुम्ही!’ मग मी घरी येऊन चक्क प्राण्यांची चित्रं काढायची प्रॅक्टिस सुरू केली.
मुलांपर्यंत पोहोचायचे प्रयत्न सुरू झाले आणि आपल्या क्षमता आणि मर्यादांचं वास्तव भान यायला लागलं. खरंतर कोणत्याही व्यवसायात काही काळ काढला की हे होतंच, पण मुलांबरोबर वावरताना हे वास्तव अनेकदा अंगावर यायला लागलं. जोडीला पालक आणि शिक्षकांबरोबर काम सुरू झालं आणि एकाच वेळी पाच-सहा वर्षांची मुलं ते रिटायरमेन्टला आलेले शिक्षक – एवढी रेंज समोर यायला लागली. मोठय़ांना शिकवणं आणखीनच आव्हानात्मक! त्यांची जडणघडण, त्यांना आलेले अनुभव, यातून प्रत्येकाची एक विचाराची बैठक बनलेली असते. त्यापेक्षा वेगळं असं काही समोर आलं की, अनेकांना प्रौढ वयात ते सगळं नकोसं वाटतं. (माझीही सुरुवात तशीच तर झाली होती!) अशा वेळी एखादाच विषय त्यांच्याशी कसा नेमका संबंधित आहे/असू शकतो, हे त्यांच्या विचारधारेच्या आधाराने मांडलं आणि त्यांना स्वत:चाच रस्ता शोधायला प्रवृत्त केलं, तर समोरच्याच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि क्षमतेचा रास्त आदर होतो. हाच अ‍ॅडल्ट लर्निगचा (प्रौढ वयातलं शिक्षण) कणा आहे. खरंतर हे कोणत्याही व्यक्तीला लागू पडतं.
मुलांनाही हा आदर मिळायला लागला की मूल पटदिशी शिकत जातं. आणि मी शिकवलं, हा आपला अहंकार आपोआप गळून पडायला लागतो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने स्वीकारलेला ज्ञानरचनावाद हेच तर सांगतो आहे.
मुलांना न आवडणाऱ्या विषयातल्या संकल्पना (उदा. गणित, भूगोल, निबंधलेखन) शिकताना तर हे फार महत्त्वाचं होऊन जातं. आणि याचं शिकवणाऱ्याला किती भान आहे, हा यातला फार कळीचा मुद्दा ठरतो. हे सगळं थिअरी म्हणून समोर आलं तेव्हा खूप कुतूहल वाटलं होतं. अनेक पूर्वसुरींनी यात खूप काम करून ठेवलं आहे. त्यांचं बोट धरूनही तत्त्व प्रत्यक्ष वापरायला सुरुवात केली तेव्हा मिळणारे रिझल्ट्स फार थक्क करून टाकणारे होते.
माझं रूढ शिक्षण विज्ञान तंत्रज्ञानातलं. त्यात मला खूप रस वाटायचा. मानवीय विज्ञानाचे (ह्य़ुमॅनिटीज सायन्सेस) विषय फार बोअरिंग वाटायचे. पण एकदा का ते माझ्या कामाशी जोडून घेता यायला लागले की, त्यात आपोआप रस येत गेला. अ‍ॅडल्ट लर्निगचं तत्त्वं माझ्या स्वत:च्या बाबतीतही असं लागू पडलं. त्यांचं उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) कसं कसं करता येईल, याचा पाठपुरावा सुरू झाला आणि मग रोजच नव्याने शिकणं व्हायला लागलं, आणखी आणखी समाधान मिळत गेलं.
प्रत्येक व्यक्ती वेगळी, तिच्या शिकण्याच्या पद्धती (लर्निग स्टाइल्स) वेगळ्या, क्षमता वेगळ्या, जडणघडण वेगळी आणि त्यातून बनलेलं रसायनही वेगळंच. शिकवण्यासाठी यातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचणं, त्याचं सहकार्य मिळवणं- हे खरंतर आपलंच शिकणं आणि शिक्षक म्हणून फार सुफळ संपूर्ण असा अनुभव देणारं.     

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा