फारूक नाईकवाडे

राज्य सेवा परीक्षेच्या पेपर एकमधील भूगोल आणि भूगोल व कृषी या दोन घटकांमध्ये झालेले बदल किंवा पुनर्रचनेमुळे उमेदवारांना या घटकांचा व्यवस्थित व नेमका अभ्यास करणे जास्त सोयीचे झाले आहे. यातील भूगोल विषयामधील बदलांबाबत या लेखामध्ये चर्चा करू.

पुनर्रचना

* प्राकृतिक भूगोलाऐवजी भूरूपशास्त्र या शीर्षकाखाली आवश्यक त्या सर्व मुद्दय़ांचा समावेश करण्यात आला आहे. आधीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या सर्वसाधारण व ढोबळ मुद्दय़ांचे नेमके स्पष्टीकरण सुधारित अभ्यासक्रमामध्ये देण्यात आले आहे. यामध्ये आधी पुराची समस्या हा मध्येच दिसणारा असंबद्ध मुद्दा वगळलेला आहे.

* हवामानशास्त्र हा भूगोलातील घटक कृषी व भूगोल या घटक विषयामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. आता हा मुद्दा भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला आहे.

* आधी स्थलांतर हा मुद्दा मानवी आणि जन भूगोल दोन्हींमध्ये विस्कळीतपणे मांडलेला होता. आता महा ष्ट्राच्या विशेष संदर्भाने लोकसंख्या भूगोलामध्ये संक्षिप्तपणे समाविष्ट करण्यात आला आहे.

* पर्यावरणीय भूगोलातील काही मुद्दय़ांसाठी आधी करण्यात आलेल्या सर्वसाधारण शब्दप्रयोगापेक्षा त्यांचा पारिभाषिक संज्ञा वापरून उल्लेख केल्याने अभ्यासक्रमाला एक शास्त्रीय, मुद्देसूद स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे हे नवे मुद्दे आहेत असे समजू नये.

* यापूर्वी रिमोट सेन्सिंग आणि त्यातील काही मुद्दे असे विस्कळीत स्वरूप आणि सर्वसाधारण शब्दप्रयोग यामुळे या मुद्दय़ाचा अभ्यास करताना बऱ्यापैकी गोंधळ असायचा. प्रश्नांच्या विश्लेषणावरून लक्षात येतील ते मुद्दे अभ्यासायचे अशी उमेदवारांची चाचपडत तयारी चालू असायची. आता या मुद्दय़ातील महत्त्वाच्या सर्व मुद्दय़ांच्या अभ्यासक्रमामध्ये मुद्देसूद उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाचा विस्तार झाला असे दिसत असले तरी या मुद्दय़ांवर आधीपासूनच प्रश्न विचारण्यात आले आहेत हे समजून घेतले पाहिजे. समाविष्ट ३० मुद्दे म्हणजे अभ्यासक्रमाचा विस्तार नाही तर त्यामध्ये नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न आहे.

नवीन मुद्दे

* मानवी भूगोल हा मुद्दा आधी महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. आता यामध्ये विविध सिद्धांत व विचारधारा हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. आणि मानवी वसाहतीमध्ये नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन हे नवीन  मुद्दे आले आहेत. म्हणजे आता हा मुद्दा थिअरी व अ‍ॅप्लिके शन अशा प्रकारे परिपूर्ण अभ्यासावा लागेल.

* आर्थिक भूगोलामध्ये प्राथमिक क्षेत्रातील कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुपालन, चतुर्थक क्षेत्रातील ज्ञानाधारित आर्थिक व्यवहार आणि वाहतूक ही पायाभूत सुविधा या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील पर्यटन आणि कृषीविषयक मुद्दे पेपर दोन आणि चारमध्ये आधीही समाविष्ट होतेच. अन्य मुद्दे नवीन आहेत. मात्र द्वितीयक क्षेत्राचे म्हणजे उद्योगांचे भौगोलिक वितरण (Spatial distribution of industries) हा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला नाही. पेपर चारमध्ये याबाबतचे अन्य मुद्दे समाविष्ट आहेत, पण भौगोलिक वितरण आणि त्यामागची कारणे हा महत्त्वाचा मुद्दा दोन्ही पेपरमध्ये समाविष्ट नाही.

* लोकसंख्या भूगोलामधील स्थलांतर हा ढोबळ मुद्दा वगळता सर्वच मुद्दे नव्याने समाविष्ट केले दिसतात. यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येची रचना, (घनता, वाढ, वितरण), लोकसंख्या बदलाचे घटक (जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर) आणि लोकसंख्या धोरण हे मुद्दे समाविष्ट आहेत.

* पर्यावरणीय भूगोलामध्ये जैवविविधतेशी संबंधित मुद्दे, मानव-वन्यजीव संघर्ष, नागरी उष्माद्वीप या पर्यावरणीय भूगोलातील मुद्दय़ांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. हरितगृह वायूंचे विवरण, आम्ल पर्जन्य या बाबी नव्याने दिसत असल्या तरी त्या आधीच्या अभ्यासक्रमातील मुद्दय़ामध्ये समाविष्ट होत्या. फक्त त्यांचा उल्लेख नव्याने करण्यात आला आहे.

* भूगोल आणि आकाश – अवकाशीय/ अंतराळ तंत्रज्ञान हा नवीन मुद्दा आवश्यक उपमुद्दय़ांच्या उल्लेखासह समाविष्ट केलेला आहे. सुदूर संवेदनातील काही मुद्दे आणि विज्ञान तंत्रज्ञानावर overlap होणारे इस्रो, डीआरडीओ, मिशन शक्ती हे मुद्दे वगळता यातील बाकीचे मुद्दे नव्याने अभ्यासावे लागतील. अवकाश तंत्रज्ञानाचा संरक्षण,

बँकिं ग, टेलिकम्युनिकेशन, पायाभूत सुविधा व विविध अन्य क्षेत्रांतील वापर, अवकाशीय उपग्रह संपत्ती, अंतराळातील कचरा व्यवस्थापन आणि शस्त्रास्त्र स्पर्धा हे मुद्दे समर्पकपणे समाविष्ट करण्यात आले आहेत.

वगळलेले मुद्दे

* भारताचे अन्य देशांच्या तुलनेत हिंद महासागरातील मोक्याचे ठिकाण हा मुद्दा वगळला असला तरी याबाबतचे मुद्दे अन्य मुद्दय़ांच्या प्रश्नांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळे तयारी करताना या मुद्दय़ाचा आढावा घेणे चांगले.

* वायुराशी, चक्रीवादळे, भारतीय मान्सूनचे तंत्र, पावसाचे पूर्वानुमान हे मुद्दे आश्चर्यकारकपणे वगळलेले आहेत. मान्सूनचा केवळ महाराष्ट्रापुरता उल्लेख अभ्यासक्रमामध्ये केलेला असला तरी भारतीय मान्सून समजून घेतल्याशिवाय हा अभ्यास नीट होणे शक्य नाही.

* मानवी सामाजिक भूगोलातील वस्त्यांमधील समस्यांचे दिलेले विवरण काढलेले असले तरी त्या समस्यांचा अभ्यास आवश्यक आहे.

* स्थलांतर आणि संबंधित मुद्दे हा सामाजिक भूगोलातील मुद्दा खरे तर सध्याच्या काळातील अत्यंत सुसंबद्ध मुद्दा आहे आणि त्याबाबत उमेदवारांना जाणीव असणे आवश्यक आहे. मात्र तरीही हा मुद्दा केवळ महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बदलाचा घटक म्हणूनच अभ्यासणे आयोगाला अपेक्षित असल्याचे दिसत आहे.

* शहरी कचरा व्यवस्थापन आणि सागरी संरक्षित क्षेत्रे हा पर्यावरणीय भूगोलातील मुद्दा वगळण्यात आला आहे.