श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण विसाव्या शतकातील आधुनिक जगाच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडींची विस्तृत चर्चा करू. तसेच गतवर्षीच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांसह या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भ साहित्य वापरावे, याचा आढावा घेणार आहोत.

या कालखंडात ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या त्याला तत्कालीन कारणाबरोबरच मागील दोन शतकांतील म्हणजेच अठराव्या  आणि एकोणिसाव्या शतकात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांची पार्श्वभूमी होती. विशेषकरून युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचा प्रभाव हा संपूर्ण जागतिक व्यवस्थेवर होत असे. कारण विसाव्या शतकातील साम्राज्यवादी सत्ता या युरोपमधील होत्या आणि त्यांच्या वसाहती आफ्रिका आणि आशिया खंडात होत्या. एकोणिसाव्या शतकात झालेल्या युरोपातील काही महत्त्वाच्या घडमोडी उदा. इटलीचे एकीकरण, जर्मनीचे एकीकरण, राष्ट्रवादाचा उदय, पूर्वेकडील प्रश्न, बर्लिन परिषद आणि आफ्रिका खंडाची साम्राज्यवादी सत्ता यामध्ये झालेली विभागणी आणि युरोपातील विविध राष्ट्रांमध्ये स्थापन झालेल्या मैत्रीपूर्ण युती अथवा करार (Alliances) आणि या द्वारे केले जाणारे राजकारण, त्याचबरोबर अमेरिका, जपान या राष्ट्रांची ध्येय धोरणे इत्यादीची माहिती असल्याखेरीज विसाव्या शतकातील अर्थात सुरुवातीपासून या शतकाच्या मध्यापर्यंतच्या  महत्त्वाच्या घडामोडी योग्य पद्धतीने समजून घेता येणार नाहीत.

मैत्रीपूर्ण युती अथवा करार, राष्ट्रवादी विचारसरणीचा वाढता प्रभाव, आक्रमक लष्करवाद, साम्राज्यवादी प्रतिस्पर्धा, बाल्कन युद्धे तसेच तत्कालीन कारणे या काही महत्त्वाच्या कारणांमुळे पहिल्या जागतिक महायुद्धाची १९१४ साली सुरुवात झाली आणि हे युद्ध १९१८ मध्ये समाप्त झाले. यानंतर पॅरिस शांतता परिषेदतील विविध करारानुसार पराभूत राष्ट्रांवर अनेक अटी लादण्यात आल्या आणि यामध्ये जर्मनी हे महत्त्वाचे पराभूत राष्ट्र होते व जर्मनीला या युद्धासाठी जबाबदार धरण्यात आले. तसेच या परिषदेमध्ये राष्ट्रसंघाची (League of Nations) स्थापना करण्यात आली होती. तिचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील विवाद सोडविणे हा होता, याच दरम्यान रशियन क्रांती होऊन सोव्हिएत युनियनची स्थापना झालेली होती आणि या क्रांतीवर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. या विचारसरणीचा वाढता प्रभाव, दोन जागतिक महायुद्धांमधील जग, इटलीमधील फासीवाद आणि जर्मनीमधील नाझीवाद, राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे कार्य आणि राष्ट्रसंघाचे अपयश, जागतिक आर्थिक महामंदी, अरब राष्ट्रवाद, युरोपमधील हुकूमशाहीचा उदय आणि अंत, ब्रिटिशांचे तुष्टीकरण धोरण व याचे परिणाम, दुसऱ्या जागतिक महायुद्धाची महत्त्वाची कारणे व याचा परिणाम.

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचे जग, यामध्ये आशिया आणि आफ्रिकेमधील निर्वसाहतीकरण व यामधून उदयाला आलेली नवीन राष्ट्रे व अलिप्ततावादी चळवळ, चीनची क्रांती, भांडवलशाही व समाजवादी विचारसरणीचा प्रभाव व अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांचा उदय व या दोन महासत्तांमध्ये जगाची विभागणी, शीतयुद्धाची सुरुवात आणि या काळातील महत्त्वाच्या घटना, १९८९ मधील सोव्हिएत युनियनचे विघटन व याची कारणे, पश्चिम व पूर्व जर्मनीचे १९९१ मध्ये झालेले एकत्रीकरण व अमेरिकेचा एकमेव जागतिक महासत्ता म्हणून झालेला उदय इत्यादी महत्त्वाच्या घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या घटकांची सर्वप्रथम मूलभूत माहिती करून घ्यावी लागते, ज्यामुळे या विषयाची समज व्यापक होण्यास मदत होते.

२०१८, २०१९ आणि २०२० मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. उपरोक्त प्रश्न हे संकीर्ण आणि विश्लेषणात्मक या दोन्ही माहितीचा एकत्रित आधार घेऊन विचारण्यात आलेले आहेत. यातील आर्थिक महामंदीशी संबंधित प्रश्न सोडविताना आपणाला आर्थिक धोरणांचा मुखत्वे विचार करावा लागतो. ही धोरणे नेमकी कोणती होती व या धोरणांच्या परिणामस्वरूप नेमके काय साध्य झाले होते, अशा पद्धतीने माहिती असावी लागते. तसेच या प्रश्नाचे स्वरूप संकीर्ण प्रकारात अधिक मोडणारे आहे म्हणून येथे फक्त धोरणाची माहिती नमूद करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. यातील ‘पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नव अभिजन वर्गाने केलेले होते. परीक्षण करा.’ हा प्रश्न व्यक्तिविशेष प्रकारात मोडणारा आहे आणि या देशातील महत्त्वाच्या व्यक्ती व त्यांची नावे व कार्य आणि विचारसरणी व कशा पद्धतीने त्यांनी नेतृत्व केलेले होते या सर्व पैलूंचा आधार घेऊन या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित होते.

या घटकाची तयारी करण्यासाठी एनसीईआरटीची इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शालेय पुस्तकांचा आधार घेता येतो. तसेच या घटकाचा अधिक सखोल पद्धतीने अभ्यास करण्यासाठी राजन चक्रवर्ती लिखित ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’, अर्जुन देव लिखित ‘हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’ आणि नॉर्मन लोवे लिखित ‘मास्टररिंग मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री’ या महत्त्वाच्या संदर्भ साहित्याचा वापर करावा.