श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण भूगोल या विषयातील प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत. प्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ४; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५; २०१७ मध्ये ४; आणि २०१८ मध्ये ३ प्रश्न विचारण्यात आले होते. अभ्यासक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे म्हणून प्राकृतिक भूगोलाची तयारी करताना जगाचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचा प्राकृतिक भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकाची माहिती असणे आवश्यक आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यांसारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकासंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती सर्वप्रथम असणे आवश्यक ठरते.

पुढे आपण २०१३ ते २०१८ दरम्यान घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची थोडक्यात चर्चा करणार आहोत.

* ‘भूखंड अपवहन सिद्धांताद्वारे तुम्हाला नेमके काय समजते? याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.’ (२०१३)

या प्रश्नाचा मुख्य रोख हा भूखंड अपवहन सिद्धांतावर आहे आणि हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी हा सिद्धांत नेमका काय आहे, या सिद्धांताची मांडणी कोणी केली आणि यामध्ये नेमक्या कोणत्या प्राकृतिक घडामोडींची चर्चा करण्यात आलेली आहे अशा विविधांगी पलूंचा विचार करून या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

* ‘‘हिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तापमानवाढीच्या लक्षणांचा संबंध उघड करा.’’ (२०१४)

या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी हिमनदी म्हणजे काय, तिची निर्मिती कशी होते, या प्रकारच्या नद्या हिमालय पर्वत रांगांमध्येच का आहेत याची माहिती सर्वप्रथम असणे गरजेचे आहे. या प्रश्नाचा मुख्य कल हा एका विशिष्ट प्रक्रियेशी म्हणजे जागतिक तापमानवाढीशी जोडण्यात आलेला आहे आणि जागतिक तापमानवाढीमुळे या हिमनद्यांमध्ये कशी घट होत आहे याची पुराव्यानिशी चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावे लागते.

* ‘‘आर्क्टिक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात.’’ (२०१५)

आर्क्टिक समुद्राचे भौगोलिक स्थान काय आहे आणि याचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर आर्क्टिक समुद्रातील खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व लक्षात घ्यायला हवे. सद्य:स्थितीमध्ये जगातील विविध देशांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी या खनिज तेलाचा उपयोग होऊ शकतो.  आर्क्टिक समुद्रावर अधिपत्य असणाऱ्या देशांना याचा होणारा आर्थिक लाभ, या खनिज तेलाचे उत्पादन करताना आक्र्टिक समुद्रामध्ये केले जाणारे उत्खनन आणि यामुळे येथील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेत होणारा बदल आणि या बदलांचा येथील पर्यावरणावर होणारा परिणाम अशा विविधांगी बाबींचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. तो केल्याशिवाय या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येणार नाही.

* २०१६ मध्ये या घटकातील हिमालय पर्वतातील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, परिणामकारकरीत्या केलेले जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे मानवी विपत्ती कमी करू शकते, दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व, भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

* २०१७ मध्ये आशिया मान्सून आणि लोकसंख्या संबंध, महासागरीय क्षारतेतील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा, कोळसा खाणीच्या विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते. हे प्रश्न प्राकृतिक भूगोलाची पारंपरिक माहिती आणि चालू घडामोडीचा संबंध जोडून विचारण्यात आलेले होते.

* २०१८ मध्ये समुद्री पारिस्थितीकीवर आणि मृत क्षेत्रे, तसेच आच्छादन (mantle plume) याची व्याख्या आणि आच्छादन याची प्लेट टेक्टोनिकमध्ये असणारी भूमिका स्पष्ट करा, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते.

उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की पर्यावरण आणि हवामान संबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांश प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाची संपूर्ण तयारी करण्याबरोबरच चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. थोडक्यात अभ्यासक्रमामध्ये नमूद घटकाच्या आधारे या प्रश्नांची विभागणी करावी आणि अभ्यासाची दिशा निर्धारित करावी. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलला जाऊ शकतो, त्यामुळे हा घटक सर्वंकष आणि सखोल पद्धतीने अभ्यासणे अपरिहार्य ठरते.

या घटकाची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या  Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment(XI), या क्रमिक पुस्तकांचा आधार घेता येतो. ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकेल आणि या माहितीला विस्तारित करण्यासाठी ‘Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India A Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) या संदर्भ ग्रंथांचा आधार घेता येतो.

या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात. स्वत:च्या अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे, हे कळण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा व मूल्यमापन करून घ्यावे. त्यामुळे आपल्या अभ्यासातील उणिवा दूर करून अधिक नेमकेपणाने उत्तर लिहिण्याचा सराव करता येतो आणि चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपणाला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांचाच अंतर्भाव करणे अधिक श्रेयस्कर ठरते.