अपर्णा दीक्षित

मागील लेखात आपण एकंदरीत यूपीएससीच्या निबंधाच्या पेपरचे आव्हान काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच निबंधाचे मूल्यमापन कोणत्या निकषांवर होणार आहे याची तोंडओळखही करून घेतली. ते निकष पुन्हा एकदा पाहू यात.

निबंधाच्या पेपरमधील किमान आवश्यक बाबी:

(१) विषयाचा आवाका आणि मर्यादा

(२) विचारातील व मांडणीतील स्पष्टता

(३) वैचारिक प्रक्रिया

(४) उमेदवाराचे स्वत:चे वैचारिक विश्लेषण

आता आपण यातील प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र चर्चा करणार आहोत. या अपेक्षा प्रत्यक्ष लिखाणात कशा उतरवायच्या हेही पाहणार आहोत. या अपेक्षांच्या यादीकडे बघितले तर असेही लक्षात येईल की, साधारणत: शाळा-कॉलेजमध्ये असताना ज्या मुद्दय़ांना धरून निबंध लिहिले किंवा तपासले जातात, तशी ही यादी नाही. उदाहरणार्थ, आलंकारिक भाषा, सुविचारांचा वापर इत्यादी. अर्थात, वरील गोष्टी करूच नयेत अशातला भाग नाही. मात्र, १०००-१२०० शब्द लिहिताना असलेला तार्किक मांडणीचा हेतू असफल होणार नाही, याची दक्षता जरूर घ्यावी.

अर्थपूर्ण व सुसूत्र मांडणी असलेला निबंध लिहिण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करावा.

(१) आराखडा

पेपरमध्ये दिलेले सर्व निबंध विषय काळजीपूर्वक वाचावेत. ज्या विषयाबद्दल आपल्याला पुरेसा आत्मविश्वास वाटतो तो विषय निश्चित करावा. एकदा विषय निश्चित करून लिखाणास सुरुवात केल्यानंतर पुन्हा विषय बदलला जाऊ शकत नाही. विषय निश्चित करीत असताना, त्या विषयाबद्दल आपल्याला किती माहिती आहे व एकंदरीतच त्या विषयाचे लिखाण करण्याकडे आपला किती कल आहे याचा अंदाज घ्यावा. सुरुवातीची १० ते १५ मिनिटे विषय निश्चित करण्यात आणि कच्चा मसुदा तयार करण्यात गेली तरी हरकत नाही. कच्चे काम करण्यासाठी उत्तरपत्रिकेमध्ये जागा दिलेली असते. निबंध विषयाशी संबंधित मुद्दय़ांचे टिपण काढून कच्चा आराखडा तयार करावा. निबंधामध्ये येणाऱ्या सर्व प्रमुख मुद्दय़ांचा यामध्ये समावेश असावा. यातून लिखाणाला निश्चित दिशा मिळण्यास मदत होते. तीन तास सलग लिखाण करण्याकरिता अशा नियोजनाची व त्यास अनुसरून मांडणी करण्याची नितांत गरज असते. एकदा लेखनाची रचना ठरली की, त्याप्रमाणे एक समान लयीत मांडणी करावी. अनेकदा लिहीत असताना नवीन मुद्दे, संदर्भ आठवतात. त्यांचा लिखाणात जरूर समावेश करावा. मात्र असे करत असताना मूळ रचनेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.

असे नियोजन केल्याने लेखन करण्याआधी विषयासंबंधीचा पूर्ण विचार केला जातो. संपूर्ण निबंध लिहून झाल्यानंतर जर असे लक्षात आले की, नियोजनावर अजून थोडा वेळ खर्च करायला हवा होता तरी त्याचा काही उपयोग नाही. मुक्त शैलीत निबंध लिहिल्यास, नंतर आढावा घेत असताना काही परिच्छेद गाळायला हवेत असे वाटल्यास काहीही केले जाऊ शकत नाही. अशा सर्व प्रकारचे रचनेतील बदल आराखडय़ाच्या टप्प्यावरच करणे शक्य आहे. अशा प्रकारे उत्तम नियोजनानंतर लेखन करीत असताना विचार करण्यात खूप वेळ खर्च होत नाही. लेखनाच्या मांडणीकडे, शब्दांच्या वापराकडे पुरेसे लक्ष दिले जाते. अर्थातच लिहीत असताना झालेल्या लिखाणाचा आढावा घेणे आवश्यक असते.

(२) मूळ हेतू/प्रमुख दावा

निवडलेल्या विषयासंबंधी कोणता प्रमुख मुद्दा आपल्याला सांगायचा आहे हे निश्चित केले पाहिजे. आपण सांगत असलेला मुद्दा ठामपणे सांगण्यामागील मूळ हेतू कोणता याबद्दल लिखाणात स्पष्टता असणे आवश्यक आहे. यामधून वाचणाऱ्याला लेखनाची एकंदरीत दिशा कोणती हे समजण्यास मदत होते. एकंदरीतच स्पष्ट मूळ हेतूशिवाय चांगला निबंध लिहिणे अशक्य आहे. हा प्रमुख मुद्दा/दावा पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी येणे अपेक्षित आहे. विषयाच्या सुरुवातीला जी तोंडओळख करून दिली जाते त्याला जोडूनच हे ठाम मत येणे आवश्यक आहे. पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी हे विधान असण्याची वाचक किंवा निबंध तपासणारी व्यक्ती अपेक्षा करते. एकदा प्रमुख मुद्दा लक्षात आल्यानंतर त्या संदर्भातील अधिक बारकावे असलेला युक्तिवाद निबंधात असेल अशी अपेक्षा केली जाते.

(३) विषयाचा आवाका आणि मर्यादा

निबंध विषय निवडल्यानंतर त्या विषयाशी प्रामाणिक राहणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. असे करत असताना विषयाशी संबंधित कोणते मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असायला हवेत आणि कोणते मुद्दे परिघावरचे आहेत, याचे भान असणे अतिशय महत्त्वाचे ठरते. मध्यवर्ती मुद्दे राहून गेले आणि इतरच मुद्दय़ांवर खूप चर्चा झाली. अशा गोष्टी टाळण्याकरिता पुढील विचारपद्धती अवलंबता येईल. विशेषत: विश्लेषणात्मक निबंध (जे यूपीएससीमध्ये अनेकदा लिहावे लागतात.) लिहीत असताना या पद्धतीचा अवलंब करता येतो. इंग्रजीमध्ये याला ढएरळछए अल्लं’८२्र२ म्हणतात. दिलेल्या निबंध विषयाचा आपण P (Political), E (Economics), T (Technological), L (Legal). E (Environmental) अशा सर्व अंगांनी विचार केला आहे का, हे पडताळून पाहिल्यास महत्त्वाचे मुद्दे सुटत नाहीत. अर्थात, अशाप्रकारे लिहायलादेखील भरपूर सराव असणे गरजेचे आहे.

पुढील लेखात आपण विचारातील व मांडणीतील स्पष्टता आणि वैचारिक प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करणार आहोत.