यूपीएससीची तयारी : प्रवीण चौगले

आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ च्या अभ्यासक्रमाविषयी जाणून घेऊ यात. याबरोबरच उपयुक्त संदर्भ साहित्याचा आढावा घेणार आहोत. सामान्य अध्ययन भाग २ मध्ये प्रामुख्याने संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय, कारभार प्रक्रिया व आंतरराष्ट्रीय संबंध या घटकांचा समावेश होतो. या विषयाचे स्वरूप बहुपेडी असल्याने यासंबंधीच्या चालू घडामोडींचा मागोवा घेत राहणे श्रेयस्कर ठरते.

सर्वप्रथम भारतीय संविधान या घटकाबाबत जाणून घेऊ यात. ‘भारतीय संविधान’ हा घटक पूर्व व मुख्य या दोन्ही परीक्षेकरिता उपयुक्त आहे. यामध्ये भारतीय घटनेचा पूर्वोतिहास जाणून घ्यावा. ब्रिटिशांनी भारताच्या घटनात्मक विकासाकडे टाकलेले पाऊल म्हणजे १७७३चा नियामक कायदा. या कायद्यापासून ते १९३५ पर्यंत केलेले विविध कायदे अभ्यासणे आवश्यक आहे. याच बरोबर भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील धुरिणांनी भारताची घटना कशा प्रकारची असावी यासाठी वेळोवेळी केलेले प्रयत्न उदा. नेहरू रिपोर्ट, संविधान सभेची स्थापना, उद्दिष्टांचा ठराव, संविधान सभेतील चर्चा, घटनेचा स्वीकार, इ. बाबींविषयी माहिती करून घ्यावी.

राज्यघटनेची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी सुरू झाली. भारतीय सामाजिक, आíथक व राजकीय परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर राज्यघटनेमध्ये विस्तृत व सखोल तरतुदी, महत्त्वपूर्ण प्रशासकीय तपशील यामुळे संविधान मोठे बनले. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, जनतेचे सार्वभौमत्व, संसदीय लोकशाही, संघराज्यीय स्वरूप, घटनादुरुस्ती, आणीबाणी, एकल नागरिकत्व अशा तरतुदींचा संविधानामध्ये समावेश केलेला आहे. संविधानाच्या महत्त्वपूर्ण तरतुदींमध्ये मूलभूत अधिकार, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये आदींचा समावेश होतो.

मुख्य परीक्षेच्या दृष्टीने, घटनादुरुस्ती हा उपघटक महत्त्वाचा आहे. कारण कोणत्याही संविधानामध्ये काळानुरूप बदल करण्यासाठी दुरुस्ती महत्त्वाची ठरते. या संदर्भामध्ये आजतागायत झालेल्या घटना दुरुस्त्यांमधील महत्त्वाच्या दुरुस्त्या अभ्यासने उचित ठरेल. २०१६च्या मुख्य परीक्षेमध्ये ६९व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाला दिल्लीतील लोकनियुक्त सरकार व नायब राज्यपाल यांच्यामध्ये असणाऱ्या संघर्षांची पाश्र्वभूमी होती.

‘संघराज्यवाद’ या घटकावरही प्रश्न विचारलेले आहेत. कारण हे तत्त्व राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. या तत्त्वावर आधारित २०१५मध्ये प्रश्न विचारला गेला. उपरोक्तघटकांबरोबरच मूलभूत संरचना हा घटकही महत्त्वाचा आहे. मूलभूत संरचनेशी संबंधित केशवानंद भारती खटला तसेच या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निवाडेही अभ्यासावेत. राज्य व्यवस्थेविषयक घटकांमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारची काय्रे, जबाबदाऱ्या अभ्यासाव्यात. केंद्र-राज्य संबंध, आणीबाणीविषयक तरतूद, राज्यपालाची भूमिका, सातवी अनुसूची, अखिल भारतीय सेवा, पाणीवाटपविषयक विवाद, वस्तू व सेवा कर आदी. केंद्र व राज्य सरकार यांच्या दरम्यान असणारे विवाद्य मुद्दे अभ्यासणे आवश्यक ठरते.

भारतीय राज्य व्यवस्थेमध्ये पंचायती राजव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण दिसते. ७३व्या व ७४व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती, त्यांची रचना, काय्रे व त्यांसमोरील आव्हानांचा अभ्यास करावा. या पाश्र्वभूमीवर २०१७ चा प्रश्न पाहता येईल.

The local self-government system in India has not proved to be effective instrument of governance.ll Critically examine the statement and give your views to improve the situation (2017)

भारतामध्ये संसदीय पद्धती स्वीकारली आहे. संसद, राज्य विधिमंडळे, त्यांची रचना, काय्रे, सभागृहातील कामकाज, अधिकार, विशेष हक्क आदी बाबी माहीत करून घ्याव्यात. कार्यकारी मंडळाची रचना – यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ; राज्य पातळीवर राज्यपाल, मुख्यमंत्री यांचा समावेश होतो. कार्यकारी मंडळाची काय्रे यासंबंधित गृहीतकांचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करावा. दबावगट, औपचारिक/अनौपचारिक संघटना, त्यांचे प्रकार, काय्रे, सकारात्मक व नकारात्मक भूमिका यांचा आढावा घ्यावा.

राज्यघटनेमध्ये अंतर्भूत संविधानिक निकालांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. महालेखापाल, महाधिवक्ता, निवडणूक आयोग, यूपीएससी, एससी/एसटी आयोग, वित्त आयोग यांतील पदांची नियुक्ती, रचना, काय्रे, अधिकार यासंबंधी जाणून घ्यावे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, सतर्कता आयोग, ट्राय, आयआरडीए, स्पर्धा आयोग, हरित न्यायाधीकरण या संस्थांचे अध्ययनही महत्त्वपूर्ण ठरते.

लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वाच्या आहेत. निवडणूक आयोग, कार्ये, रचना, निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा, लोकप्रतिनिधी अधिनियम आदी महत्त्वपूर्ण बाबी अभ्यासाव्यात. राज्यघटनेच्या अध्ययनाकरिता ‘इंडियन पॉलिटी’- लक्ष्मीकांत, ‘आपली संसद’-सुभाष कश्यप, ‘भारतीय संविधान व भारतीय राजकारण’ – तुकाराम जाधव आणि महेश शिरापूरकर इ. पुस्तके उपयुक्त ठरतात. या घटकाशी संबंधित चालू घडामोडीकरिता ‘द हिंदू’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘लोकसत्ता’ ही वृत्तपत्रे, बुलेटीन, योजना, फ्रंटलाइन या मासिकांचे वाचन पुरेसे ठरते.