आर्किमिडीजच्या काळात ग्रीक आणि रोमन सन्यांमध्ये सतत लढाया होत. अर्थात या हल्ल्यांचा फारसा परिणाम आर्किमिडीजवर झाला नाही; आणि झालाच असेल तर तो असा की रोमन सन्याविरुद्ध लढण्यासाठी त्याने अनेक जबरदस्त उपकरणं तयार करून ग्रीकांना दिली होती. आर्किमिडीजच्या सिरॅक्यूज गावावर रोमन सन्याने हल्ला केला. सनिक आर्किमिडीजच्या घरापर्यंत पोहोचले तेव्हा आर्किमिडीज गणितं सोडवण्यात गर्क होता. खरं म्हणजे आर्किमिडीजला मारू नये, अशा सूचना रोमन सन्याला देण्यात आल्या होत्या. पण, अभ्यासात गर्क असलेली ही व्यक्ती कोण आहे हे कळण्यापूर्वीच त्यांनी आर्किमिडीजला मारून टाकलं.
आर्किमिडीजच्या जीवनातला हा प्रसंग वाचून सोफीला अतिशय दु:ख झालं. पण त्याचबरोबर सोफीच्या मनात आलं की आपल्यावर हल्ला होईपर्यंत गणितासारख्या एका विषयाने आर्किमिडीजला ज्या अर्थी एवढं खिळवून ठेवलं, त्या अर्थी गणित हा विषयच माणसाचे मन गुंतवून ठेवणारा असला पाहिजे.
फ्रेंच राज्यक्रांतीचा तो काळ होता. याच काळात सोफीला गणिताने अक्षरश: झपाटलं होतं. सोफीचे वडील हे पॅरिसमधले एक धनाढय़ व्यापारी होते. त्यांच्या घरात सदासर्वकाळ राजकारण आणि पसा यांची चर्चा चालू असायची. या गोष्टींचा सोफीला तिटकारा वाटत असे. त्यामुळे वडिलांकडे असे लोक आले की, ती घरातल्या ग्रंथालयात जाऊन बसत असे. वयाच्या तेराव्या वर्षी तिने आर्किमिडीजचे चरित्र वाचले आणि तिच्या आयुष्याला जणू कलाटणी मिळाली. गणित हा तिचा श्वास बनला.
तिची गणिताबद्दलची आवड जसजशी वाढायला लागली, तसतशी तिची अस्वस्थताही वाढायला लागली. गणित शिकायचं कुठे आणि शिकवणार कोण? कारण, सोफीला ना कुठली शाळा माहिती, ना कुठली परीक्षा देणं माहिती. त्या काळात मुलींनी शिकावे, त्यांच्यासाठी शाळा असाव्यात हा विचारच फ्रेंच समाज करीत नव्हता. किंबहुना मुलींनी असं काही करू नये, असा नियमच समाजात होता.
लिओनार्ड ऑयलर आणि आयझ्ॉक न्यूटन यांनी त्यांच्या मातृभाषेतून म्हणजे लॅटिन आणि ग्रीक भाषांमधून त्यांचं  संशोधन प्रसिद्ध केलं होतं. या भाषा सोफीला परक्या होत्या, अपरिचित होत्या. अडचणीच अडचणी! पण सोफीने त्याच्यावरही तोडगा काढलाच. कुणाचीही मदत न घेता ती लॅटिन आणि ग्रीक या दोन्ही भाषा शिकली. भूमिती, बीजगणित आणि कॅलक्युलस हे विषय कुणाच्या मदतीशिवायच ती स्वत शिकली यावर कुणाचा विश्वास बसणंही कठीण आहे.
लग्नाचं वय झालेल्या आपल्या मुलीने अशी पुस्तकं वाचावीत, अभ्यास करावा हे तिच्या आई-वडिलांना अजिबात मान्य नव्हतं. त्यांनी सोफीला अभ्यास करण्यासाठी मनाई केली. त्यामुळे रात्री घरामध्ये निजानीज झाली की मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करायला सोफीने सुरुवात केली. तिच्या आई-वडिलांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी मेणबत्त्या जप्त केल्या.   
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्याचा कमालीचा मनस्वीपणा सोफीजवळ होता. पण त्या काळात या गुणांचा तिला फायदा होण्याऐवजी त्रासच झाला.
चर्चमध्ये गेल्यावर तिथे असलेल्या मेणबत्त्या चोरून त्या कशाबशा लपवून सोफी घरी आणायची. कशासाठी.. अभ्यास करण्यासाठी! पण, सोफीच्या आई-वडिलांना तेही समजलं. आपल्या मुलीला अभ्यास करण्यापासून परावृत्त करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला..इतका की त्यांनी सोफीला एका खोलीत विवस्त्र अवस्थेत डांबून ठेवलं. हेतू हा की, ती कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये.
कालांतराने आई-वडिलांच्या लक्षात आलं की, ही मुलगी गणिताशिवाय राहू शकणार नाही. शेवटी त्यांनी अनेक अटी घालून तिला अभ्यास करण्याची परवानगी दिली. कुटुंबातल्या लोकांनी परवानगी दिली तरी समाजाने एका स्त्रीला संशोधन करण्याची परवानगी देणं ही त्याकाळी अशक्यप्राय गोष्ट होती.  
सुशिक्षित महिला आणि तीही संशोधक असणं हे त्या काळी कोणालाच पटण्यासारखं नव्हतं. मग तिने त्याच्यावर एक नामी युक्ती शोधून काढली. अगदी विश्वास न बसण्यासारखीच. कुणाला पुसटशी कल्पनाही येणार नाही अशी. एक पुरुषी टोपणनाव घेऊन त्या नावाखाली सोफीने आपलं संशोधन प्रसिद्ध करायला सुरुवात केली. तिने नाव घेतले होते, ‘मॉन्सिएर  लेब्लांक’ – मिस्टर लेब्लांक! हेच नाव घेण्यामागचं कारण असं की इकोल पोलिटेक्निकमधील मॉन्सिएर अँटनी लेब्लांक हा विद्यार्थी पॅरिस सोडून निघून गेला होता. पण, अ‍ॅकेडमीला ही गोष्ट माहिती नव्हती.      
त्या काळात फ्रान्समधील प्रसिद्ध गणिती जोसेफ लुई लॅग्रांग यांना सोफीने आपला एक पेपर, आपल्या मॉन्सिएर  लेब्लांक या टोपणनावाने पाठवला. तो लॅग्रांगना पसंत पडला. पण आपला विद्यार्थी मॉन्सिएर  लेब्लांक गणितात एवढी कशी हुशारी दाखवायला लागला, असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी ‘मिस्टर ब्लांक’ला ताबडतोब भेटीचे आमंत्रण दिले. त्या वेळी मात्र सोफीला आपली खरी ओळख उघड करावी लागली. लॅग्रांगना सोफीचे काम विशेष पसंत पडल्यामुळे त्यांनी आपण होऊन तिच्या संशोधनासाठी तिचा मार्गदर्शक होण्याचे कबूल केले आणि सोफीला आश्चर्याचा एक सुखद धक्का बसला.
कार्ल फ्रेडरिक गॉस या संशोधकाने लिहिलेल्या ‘डिस्क्बिझिशन्स अ‍ॅरिथमॅटिकी’ या ग्रंथाची त्यांनी पारायणं केली होती. सोफीने गॉसबरोबर पत्रव्यवहार सुरू केला. अर्थात ‘मिस्टर ब्लांक’ या टोपणनावानेच. १८०८ मध्ये गॉसला लिहिलेल्या पत्रात त्यांनी ‘फरमॅट लास्ट थिअरम’ सोडविण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा पुरावा मांडला. सोफीचं हे प्रमेय अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्या काळात नेपोलियनच्या सन्याचे गॉस राहत असलेल्या न्यू ब्रून्सविक या गावावरही हल्ले व्हायला लागले. सोफीला गॉसची काळजी वाटू लागली. आíकमिडीजच्या बाबतीत जे झाले ते गॉसच्या बाबतीत होऊ नये, अशी तिची मनोमन इच्छा होती. तिने अमेरिकन लष्कराच्या जनरलला त्वरित विनंती करून गॉससारख्या मोठय़ा संशोधकाला विशेष सुरक्षा देण्याविषयी सुचवले. ‘मिस्टर ब्लांकने तसे सांगितले आहे,’ असे त्या जनरलने गॉसच्या कानावर घालावे अशी व्यवस्था केली. तोपर्यंत मिस्टर ब्लांक म्हणजे कोण, याचा गॉसला पत्ताही नव्हता. शेवटी तिने गॉसजवळ आपल्या नावाचे रहस्य उघड केलं. गॉसला तिचे विशेष कौतुक वाटलं. शिक्षणापासून महिला वंचित असण्याच्या त्या काळात सोफीचं असामान्यत्व त्याने मान्य केलं.
नंबर थिअरी, डिफरन्शिअल जॉमेट्री आणि इलॅस्टिसिटी या विषयांत सोफीने मूलभूत संशोधन केलं होतं, तरीही समाजिक बंधनांमुळे सोफीच्या कार्याला विद्वानांची मान्यता मिळाली नव्हती.
‘इलॅस्टिसिटी’ म्हणजे ‘स्थितिस्थापकत्व’ या विषयातील सिद्धांताच्या जडणघडणीतही तिचं योगदान दिशादर्शक मानलं जातं. सुप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या उभारणीत इलॅस्टिसिटी थिअरीला महत्त्वाचं स्थान आहे. ज्या ७२ शास्त्रज्ञांनी केलेल्या मूलभूत संशोधनाच्या आधारे आयफेल टॉवर उभारणं शक्य झालं त्यांची नावं टॉवरवर कोरलेली आहेत. पण त्यात सोफीचं नाव नाही. एक स्त्री असल्याने सोफीला पुरुषांना सहज उपलब्ध असणारं  कोणतंही रीतसर शिक्षण-प्रशिक्षण उपलब्ध नव्हतं. तरीही ती आपल्या अफाट गणिती बुद्धीच्या आधारे गणित क्षेत्रात उच्चपदी पोहोचली. या महिला संशोधिकेचं पूर्ण नाव काय असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. जाचक सामाजिक बंधनांमुळे आपलं नाव, आपली ओळख, आपलं स्त्रीत्व कुठेही उघड न होण्याची दक्षता घेणाऱ्या या थोर विदुषीचं संपूर्ण नाव आहे- मेरी सोफी जम्रेन!                                         
                
०     गणितामध्ये ज्या महिलांनी संशोधन केलं आहे, अशा भारतीय आणि पाश्चिमात्य महिला संशोधकांची छायाचित्रांसह माहिती मिळवा. त्यांनी गणितामध्ये केलेल्या कामगिरीची ओळख करून घ्या.
०     आयफेल टॉवरच्या रचनेमागे जसा मूलभूत विज्ञानाचा आधार आहे, त्याचप्रमाणे मूलभूत विज्ञानाच्या आधारे  बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती मिळवा. या वस्तू उभारणीतलं विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करा.
०     वस्तूला स्थितिस्थापकत्व गुणधर्म असणे म्हणजे काय? हा गुणधर्म दर्शवणाऱ्या दैनंदिन व्यवहारातल्या वस्तू कोणत्या?
०     गणितातील ‘नंबर थिअरी’ विषयी माहिती मिळवा. या सद्धांतिक गणिताचा वापर कुठे आणि कसा केला जातो?