मी सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला संगणकीय क्षेत्राची आवड आहे. त्यातील नवनवीन तंत्रज्ञान शिकायला मला आवडते. परंतु नोकरीमुळे मला संगणकीय शिक्षण घेता येणे शक्य नाही. नोकरी न सोडता मी संगणकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय करू शकतो?
– पंकज वाढे
तुला संगणकीय क्षेत्रात नेमके कशात करिअर करायचे आहे हे आधी स्पष्ट करावे लागेल. कारण संगणकाचे छोटे-मोठे अभ्यासक्रम सर्वत्र शिकवले जातात. तू ज्या शहरात राहतो त्या ठिकाणीसुद्धा असे अभ्यासक्रम शाळेच्या वेळेनंतर किंवा दिवाळी अथवा उन्हाळी सुट्टय़ांमध्ये करता येतील. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनने असे लघु मुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. एमएस-सीआयटी हा असाच अभ्यासक्रम आहे. (संपर्क- े‘ू’.१ॠ)
मी सिव्हिल इंजिनीअिरगच्या प्रथम वर्षांला आहे. या क्षेत्रात मला कुठल्या संधी आहेत? शासकीय सेवेत येण्याकरता
मी काय करू?
– ऐश्वर्य देशमुख
आपल्या देशात व राज्यातही गृहनिर्माण, रस्ते, पूल, महामार्ग अशा अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. त्यांची संख्या आगामी काळात वाढतच जाईल. त्यामुळे या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. शासकीय पाटबंधारे आणि बांधकाम विभाग, सिडको, म्हाडा, एमआयडीसी, वेगवेगळ्या महापालिकांमध्ये प्रवेश परीक्षा/ मुलाखतींद्वारे नोकरी मिळू शकेल. मात्र, त्यासाठी तुला उत्तम गुणांनी बी.ई व्हावे लागेल. त्यामुळे सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर.
मी बी.कॉमच्या प्रथम वर्षांला आहे. बी.कॉमनंतर कोणते क्षेत्र उपयुक्त ठरेल? अॅनिमेशन किंवा ग्राफिक अभ्यासक्रम केल्याचा काही फायदा होईल? – शौनक
अभ्यासक्रमांकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन हा नफ्यातोटय़ाच्या तराजूत तोलणारा आहे. हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक अभ्यासक्रम हा उत्तम करिअरची संधी मिळण्याकरता सक्षम असतो, मात्र तो आपण मनापासून व सर्व संकल्पनासह समजून उमजून घेऊन केलेला असावा. बरेचजण पदवी वा पदविका घेण्यासाठी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. तशी पदवी अथवा पदविका त्यांना मिळतेही. पण ज्ञान मात्र मिळालेले नसते. सध्याच्या काळात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर किती प्रभावीरीत्या करू शकता यावर करिअर मिळणे, टिकवणे आणि त्यानंतर प्रगती करणे शक्य होते. ग्राफिक आर्ट किंवा अॅनिमेशन हे क्षेत्र अतिशय झपाटय़ाने वाढत असलेले व खूप संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे. पण त्यात सर्जनशीलता, हटके करून दाखवण्याची क्षमता आणि अत्यंत परिश्रम करण्याची तयारी लागते. वाणिज्य क्षेत्रातही उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत आहेत. कार्यक्षम अकाउंटंट हव्या त्या प्रमाणात मिळत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवावी.
मी एम.कॉम पूर्ण केले असून माझे वय २६ आहे. शासकीय नोकरीमध्ये येण्यासाठी काय करावे लागेल?
– संपदा कोलमकर
तू राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, मंत्रालयीन साहाय्यक परीक्षा आणि उपजिल्हाधिकारी/ विक्रीकर अधिकारी/ उप पोलीस अधाक्षक/ उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ तहसीलदार आदी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेद्वारे राज्य शासनाच्या सेवेत येऊ शकते. संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेद्वारे विविध केंद्रीय नागरी सेवांमध्ये प्रवेश मिळू शकतो. भारतीय लष्करामध्येही काही शाखामंध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लिपिक किंवा प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदांवर नियुक्ती मिळू शकते, पण याकरता तुला मोठय़ा स्पध्रेस तोंड द्यावे लागेल. त्याकरता अतिशय परिश्रम घेणे भाग आहे.
मी गोव्यात राहतो. माझा पुतण्या नववीत विज्ञान शाखेत असून मला पुढील माहिती हवी आहे. १) फॉरेन्सिक सायन्स- आवश्यक अर्हता, अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची माहिती हवी होती. तसेच कंपनी सेक्रेटरीसाठी आवश्यक अर्हता आणि अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या संस्थांची नावे सांगाल का?
– विनय टकले
आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत- १) फॉरेन्सिक सायन्स या विषयातील पदवीस्तरीय (बी.एस्सी) अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नागपूर (ँ३३स्र्://्रऋ२ूल्लंॠस्र्४१.्रल्ल), मुंबई<br />(्रऋ२ूे४ेुं्र.ूे) आणि औरंगाबाद (६६६.ॠ्रऋ२ं.्रल्ल) येथील इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन्सिक सायन्समध्ये हा अभ्यासक्रम करता येतो. २) कंपनी सेक्रेटरी या विषयातील सुरुवातीचा फाउंडेशन अभ्यासक्रम हा कोणत्याही शाखेतील बारावी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांला करता येतो. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अभ्यासक्रम करता येतो. पदवी परीक्षेनंतर एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अभ्यासक्रम करता येतात. आता कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम (पत्ता- प्लॉट क्रमांक १०१, सेक्टर १५, इन्स्टिटय़ुशनल एरिया, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४) सुरू करण्यात आला आहे. हे सर्व अभ्यासक्रम द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केले आहेत.
संकेतस्थळ- ६६६.्रू२्र.ी४ि
मी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेतून बी.टेक करीत आहे. मला नागरी सेवेमध्ये करिअर करायचे आहे. इतिहास आणि राज्यशास्त्रात मुक्त विद्यापीठामधून पदवी घेता येईल का? हे दोन्ही विषय माझ्या आवडीचे असून मला नागरी सेवा परीक्षेतील ऐच्छिक विषय म्हणून फायदा होईल का? – संग्राम पवार
तू इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून दोन्ही विषयात पदवी घेऊ शकतोस. नागरी सेवा परीक्षेतील ऐच्छिक विषयांचा अभ्यास करताना या दोन्ही विषयांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.
मी बी.कॉम करत आहे. बँकेमधील नोकरी मिळण्यासाठी काय करावे लागेल?
-निखिल गायकवाड
सार्वजनिक बँकांमधील लिपिक आणि प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यामध्ये इंग्रजी, कार्यकारणभाव, सामान्यज्ञान वा चालू घडामोडी, सामान्य अंकगणित या विषयांवर वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. याचा विशिष्ट अभ्यासक्रम नसला तरी बारावीपर्यंतचे इंग्रजी आणि गणित या विषयांचा पाया पक्का असायला हवा. उत्तम वाचन हवे. मुलाखतीमध्ये स्वत:ला आत्मविश्वासाने सादर करण्याइतपत संवाद कौशल्य हवे.