‘कॅन (Cannes) लायन्स’ इंटरनॅशनल फेस्टिव्हलची अ‍ॅवॉर्डस घोषित झाली आणि ‘प्रॉडक्ट लॉन्च’ कॅटेगरीत ‘पब्लिसिते’चं नाव घोषित झालं आणि ‘पब्लिसिते’ची टीम जवळजवळ आनंदानं किंचाळलीच. सहा महिन्यांपूर्वीच ‘पब्लिसिते’ या अ‍ॅडव्हर्टाइझिंग फर्मला एका नव्या ई-कॉमर्स कंपनीचं फ्रेश कॅम्पेनिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. फॅशनेबल कपडे आणि ज्वेलरी-अ‍ॅक्सेसरीस यांच्या ऑनलाइन खरेदीचं त्यांचं मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाइट होती. मोठ्ठय़ा प्रमाणावर त्याचं ऑल इंडिया प्रमोशन करण्यासाठी केलेल्या कामाचं हे फलित होतं. जाहिरातीत आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतिम शब्द मानलं जाणारं ‘कॅन लायन्स’चं हे पारितोषिक ‘पब्लिसिते’ला मिळालं होतं.
अमितानं आनंदानं राज आणि अ‍ॅन्थनीला मिठीच मारली. तिच्या डोळ्यातले आनंदाश्रू थांबेचनात. सहा महिन्यांपूर्वी पार पाडलेलं काम तिला कालच्या इतकं ताजं भासत होतं. काय नव्हतं केलं या प्रॉडक्ट लॉन्चसाठी. अ‍ॅन्थनीनं हे काम अमितावर सोपवलं होतं ‘यू मॅनेज इट’ म्हणत. तिनं मग राजला हाताशी धरलं होतं. त्यानंतर मग अमिता-राजना रात्र आणि दिवस, खाणं-पिणं, ऑफिस आणि घर, कशाचंच भान राहिलं नाही. काम एके काम. दोघांनींही दिवस-रात्र एक केली होती आणि स्वत:ला पूर्ण झोकून दिलं होतं या कामात. राजच्या सिगारेटी आणि अमिताची कॉफी यांची काही गिनतीच राहिली नव्हती. आयडियाज डोक्यात कधी यायच्या, कधी नाही यायच्या. आल्या, तर त्या कुठे तरी पाहिलेल्या असायच्या, ओरिजिनल नसायच्या. कधी मग एक ‘युरेका मोमेन्ट’ यायचा आणि मस्त काही तरी सुचायचं, एकदम ओरिजिनल! वेळोवेळी ग्राहकांबरोबरही कल्पना शेअर केल्या, त्यांची पसंती तपासली. शेवटी एक मोठ्ठा अ‍ॅड कॅम्पेन बनला. टी.व्ही. अ‍ॅड्स, वर्तमानपत्रातल्या जाहिराती, स्पोर्ट अ‍ॅक्सेसरीजवर करायच्या जाहिराती. एफ.एम.वरची ऑडियो जिंगल तर कस्टमरला भयंकर आवडली. लॉन्च सगळ्या माध्यमातून एकाच वेळी झालं. अख्खा देश दुमदुमला होता त्या दिवशी. तमाम जनतेच्या मनात या जाहिरातींनी कुठे ना कुठे तरी घर केलं होतं. जाहिरातींची आम लोकांमध्ये खूप चर्चा झाली, अ‍ॅड जगतातही खूप कौतुक झालं. ‘कॅन लायन्स’ हा मात्र सगळ्यावरचा शिरपेचच म्हणायचा.
अमिताची जीव ओतून काम करण्याची वृत्ती अगदी तिच्या वाढत्या वयापासून सगळ्यानांच माहितीची होती. तिनं जे जे हातात घेतलं ते जीव ओतूनच केलं, अभ्यास असो की खेळ; इतर छंददेखील. तिला ट्रेकिंगचा खूप नाद. तिथेच मग तिला अमोल भेटला. मनाच्या तारा जुळल्या, मतं जुळली, एकंदर आयुष्याबाबतीतले दृष्टिकोन जुळले. अमोललाही ही तिची धडाडी मोहवून गेली. स्वतंत्र विचारांची, स्वत:च्या कामानं झपाटलेली, कामात स्वत:ला झोकून देणारी, बेभान! अमितानं कमर्शियल आर्ट्स आणि मीडिया मॅनेजमेन्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. अमोलनं कॉमर्स आणि एम.बी.ए. मार्केटिंगमध्ये केलं. दोन्ही घरांनी विरोध पत्करावा असं काहीच दिसलं नाही. त्यामुळे लग्न अगदी रीतसर पार पडलं. अमितानं आधीपासून लग्नातल्या आपल्या अपेक्षा अमोलला सांगितल्या होत्या. ती आपल्या करिअरबद्दल अतिशय गंभीर होती. माध्यम क्षेत्रातलं काम हा तिचा जीव की प्राण होता. त्यातही तिला अ‍ॅडव्हर्टाइझिंगच्या सर्जनशील विश्वात काम करायची संधी मिळाली आणि तिनं जणू आकाशातच झेप घेतली! देहभान विसरून काम केलं, स्वत:ला झोकून दिलं, कामाशिवाय कशाकडेही पाहिलं नाही. अमोल स्वत:च्या कामाबद्दलही तितकाच पॅशनेट होता. तो एका मल्टिनॅशनल कंपनीत ४-५ प्रॉडक्टचे सेल्स पाहायचा. भरपूर प्रवास, कस्टमर्सबरोबर ऊठबस. खूप झपाटय़ानं तो आपलं जाळं सर्वत्र पसरत चालला होता. स्वप्नातसुद्धा अमोलला सेल्स टारगेट्सच दिसायचे. डोक्यात सदैव नवे ग्राहक व नवे विभाग हा एकच विचार.
अमोल आणि अमिता, दोघंही आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलं. पण लग्न झाल्यावर दोघंही आईवडिलांपासून वेगळी, स्वतंत्र राहू लागली. लग्न झाल्यापासून ते आजतागायत जी फ्लेक्सिबिलिटी आणि स्वातंत्र्य त्यांना मिळालं, ते एरवी मिळालंच नसतं. दोघांचे दिनक्रम स्वतंत्रपणे चालायचे. अनेकदा ती घरी यायची तेव्हा तो झोपलेला असायचा किंवा मग तो घरी यायचा तेव्हा ती झोपलेली असायची. खरं तर त्यांना आपण शनिवारी किंवा रविवारीही कामाला जातो आहोत याचं भानच नसायचं.
दोघांच्याही करिअर्सचा ग्राफ सात-आठ वर्षांत झपाटय़ाने आकाशाला भिडला. अमोलनं सेल्स एक्झिक्युटिव्हपासून सुरुवात करून आज तो वेस्टर्न रिजनचा सेल्स मार्केटिंग हेड झाला होता. अविरत मेहनतीनं स्वत:ची सक्षम टीम उभी केली होती आणि अतिशय धूर्तपणे आपल्या तुल्यबळ स्पर्धकांना शह देत मार्केटमध्ये पाय रोवून उभा होता, साम्राज्य वाढवीत होता. बॅक टू बॅक तीन प्रमोशन्स मिळवली होती अमोलनं. अमिता आता प्रोजेक्ट डिरेक्टर झाली होती. मोठ्ठे प्रोजेक्ट्स स्वतंत्रपणे मॅनेज करायची. तिची टीम आता खूप मोठ्ठी झाली होती. अ‍ॅन्थनी सोडून गेल्यावर त्याची जागा तिनेच घेतली होती. ‘पब्लिसिते’ची ती आता एक अतिशय अनुभवी सीनियर प्रोजेक्ट डिरेक्टर होती.
अनेक महिने धकाधकीचे गेल्यावर अमिता-अमोल ब्रेक घेत असत. दोन आठवडय़ांची सुट्टी घेऊन दोघं अज्ञातवासात जात. ‘कॅन लायन अवॉर्ड’नंतर अमिताने अ‍ॅन्थनीकडे रिवॉर्ड म्हणून दोन आठवडय़ांची सुट्टी मागितली. सुट्टीत आईकडे गेल्यावर अमिताच्या आईला तिला खूप दिवसांनी पाहून भरून आलं. तिच्या डोक्यावरून, गालांवरून हात फिरवत आई म्हणाली, ‘‘किती गं वय दिसू लागलं तुझं एवढय़ात!’’
‘‘आई, अनुभवच असा मिळतोय की वय पटापट होत जातंय बघ.’’ अमिता हसत म्हणाली.
‘‘छट! काही तरी तोंडाला येईल ते बोलू नकोस. केस पांढरे होऊ लागण्याचं वय आहे का हे?’’
‘‘आई केस पांढरे दोन कारणांनी होताहेत. निगा न राखल्यानं आणि अनुभवानं.’’
‘‘ते निगा न राखण्याचं कारण मला पटतं. कसे जगता गं दोघं. नुसतं काम एके काम. आयुष्य म्हणून काही आहे की नाही तुम्हाला!’’
अमिताला हसूच आलं. ‘‘आई, कोण म्हणतं आम्हाला आयुष्य नाही. रोज पर्याय नाही म्हणून पाठीवर ओझं वाहिल्यासारखी जे नोकरी करतात आणि ‘नियमित’ आयुष्य जगतात, त्यांनाच फक्त आयुष्य आहे असं तुझं म्हणणं आहे का?’’
‘‘शिरलीस परत वाकडय़ात. मला नाही बुवा तुझ्याबरोबर वाद घालता येत. पण हे जे काही चाललं आहे तुमचं ते बरोबर नाही एवढं मला कळतं.’’
‘‘काय बरोबर नाही आई?’’
‘‘काय बरोबर आहे सांग मला! तुम्हा दोघांपैकी कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, कोण कधी आलं, कधी गेलं तुम्हालाच माहीत नसतं. जेवणाखाण्याच्या काही वेळा नाहीत, एकमेकांना भेटतही नसाल धड अनेक दिवस. हे काय आयुष्य झालं का?’’
‘‘आई हे सगळं झालं तरच आयुष्य आहे असं म्हणायचं का?’’
‘‘हो. आयुष्याला काही तरी नियमितपणा लागतो. संसारात एकमेकांना वेळ द्यावा लागतो. मुलं व्हावी लागतात. तरच आयुष्य सुफळ संपूर्ण होतं अमिता.’’
‘‘आई हे तुझे किंवा तुझ्या पिढीचे विचार झाले. आमचं आयुष्य सुफळ संपूर्ण तेव्हा होतं, जेव्हा आम्हाला ज्या कामात अतीव आनंद मिळेल असं काम करायला मिळतं, त्यात झोकून द्यायला मिळतं, त्यात रात्रंदिवस डुंबून राहायला मिळतं. त्यातून काही तरी घसघशीत हासिल करता येतं. तसं झाल्यावर परमानंद मिळतो. काय सांगू मी तुला त्याचं समाधान!’’
‘‘अगं मान्य आहे. पण असं किती दिवस चालणार?’’
‘‘त्याला कसलं ‘टाइम लिमिट’ आलंय?’’
‘‘वयाचं. काही गोष्टी योग्य वयात व्हाव्या लागतात. जसं की मुलं.’’
‘‘आई बोललो आहोत ना या विषयावर आपण! आम्हाला मुलं नको आहेत. तुला सुरुवातीला सांगितलं होतं तेव्हा तुला ते आमचं तरुण वयातलं फॅड वाटलं असावं. आता पुन्हा सांगते. आई, आम्ही ज्या प्रकारचं आयुष्य जगतो, आम्हाला ज्या क्रिएटिव्ह गोष्टींतून आनंद मिळतो, आणि आम्ही त्या आनंदासाठी ज्या प्रकारची कामं करतो आणि आयुष्य जगतो, त्यात आहेत ती तुमची आईवडिलांची नाती सांभाळणंही आम्हाला कठीण जातंय. कसे सुट्टी घेऊन आलो आहोत पाहते आहेस ना मुंबईतल्या मुंबईत तुमच्याकडे. त्यात नवं नातं? मूल? केवढी जबाबदारी आहे गं ती! कसं सांभाळायचं त्याला? तुम्हा मंडळींच्या जिवावर? किंवा मग काय नोकर माणसांच्या जबाबदारीवर? मला असं मूल वाढवताना फार अपराधी वाटेल आई! अशा स्थितीत एका मुलाला या जगात आणणं हा त्याच्यावर आणि आमच्यावरही अन्याय होईल. म्हणून मूल नको.’’
‘‘काय करू या मुलीचं देवा!’’
‘‘अगं काही नको करूस. बस्स मजेत आहे आपली मुलगी असं समज. आणि चुकीचं नाही बरं का ते! आणि मुख्य म्हणजे अपराधी भावना नाही आहे तिच्यात!’’
आई जराशी हसली, ‘‘किती स्पष्टपणे मांडता गं तुम्ही मंडळी सगळं!’’ अमिताने मग मिठीच मारली तिला.
मिलिंद पळसुले palsule.milind@gmail.com