scorecardresearch

‘प्रयोग’ शाळा : पत्रास कारण की.. 

पालकांकडून विद्यादानाचा वारसा मिळालेल्या गुणेश डोईफोडे यांना शालेय जीवनात उत्तम शिक्षक लाभले होते.

स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com

कल्याणच्या गणेश विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे हा शैक्षणिक विश्वात एक महत्त्वाचा प्रयोग आहे. त्यांची पत्रे देशातल्या मान्यवर, साहित्यीक, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचलीच पण परदेशातही पोहोचली. या पत्रमैत्रीला कारण आहेत, त्यांचे गुणी शिक्षक आणि विद्यार्थीमित्र गुणेश डोईफोडे.   ते करत असलेल्या शैक्षणिक प्रयोगांबाबत. 

पालकांकडून विद्यादानाचा वारसा मिळालेल्या गुणेश डोईफोडे यांना शालेय जीवनात उत्तम शिक्षक लाभले होते. आपणही असेच काम करावे हा आदर्श घेऊनच गेली २१ वर्षे ते काम करत आहेत. उपक्रम आखत आहेत.

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी गुणेशनी वर्तमानपत्रांतल्या विशेष लेखांची कात्रणे स्वत: चिकटवून, त्यांच्या चिकटवह्य़ा तयार केल्या. एका उन्हाळी सुट्टीत या वह्य़ा, आपल्याकडची काही पुस्तके, विद्यार्थ्यांकडची पुस्तके असे सर्व जमवून त्यांनी ‘पेटीतले वाचनालय’ बनवले. ज्याचे पुढे शाळेतच उत्तम वाचनालय उभे राहिले.

विद्यार्थ्यांना पत्रलेखन, निबंधलेखन असे विविध प्रकार अभ्यासाला असतात. पत्रलेखनाचा प्रत्यक्ष अनुभव जर विद्यार्थ्यांनी घेतला तर त्यांना ते जास्त कळेल, असे गुणेशला वाटले आणि त्यातून त्यांचा पत्रलेखनाचा उपक्रम सुरू झाला. अगदी लहान वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी  गुणेश आधी पत्र म्हणजे काय, ते का लिहितात वगैरे समजावून सांगत आणि मग आपल्याच घरी  पत्र पाठवा असे सांगत.  या पत्रामध्ये आपल्याला घरातील कोण आवडते, हे सोप्या शब्दांत सांगायचे असे.

त्यानंतर गुणेश स्वत:चा पत्ता असलेले पोस्टकार्ड देत त्यामधून आपल्या सरांना म्हणजे गुणेशनाच पत्र लिहिण्यास सांगत. या पत्राचा विषय ठरलेला नसे.  विद्यार्थी मग पत्रातून मोडक्यातोडक्या शब्दांत, वाकडय़ातिकडय़ा अक्षरांत आपल्या सरांना पत्र लिहीत. कधीकधी विद्यार्थ्यांना ही पत्रे लिहून झाल्यावर ती शाळेजवळच्याच पोस्टपेटीत जाऊन टाकण्याचीही एक मौज असे. आपण लिहिलेले पत्र आपल्याच घरी मिळाल्यावर विद्यार्थी खूश होऊन जात. पत्राचा तो संपूर्ण प्रवास ते केवळ पुस्तकातून नव्हे तर खराखुरा अनुभवत आणि अभ्यास आणि दैनंदिन आयुष्यातला सहसंबंध समजून घेत. थोडय़ा मोठय़ा विद्यार्थ्यांसाठी पत्रांचे विषय वेगळे असत. दिवाळीच्या सुट्टीत आपण काय काय केले, हे पत्रातून लिहायचे असे. आणखी वरच्या वर्गात गेल्यावर लेखकांना, आपल्या आवडत्या प्रसिद्ध व्यक्तींना पत्र पाठवण्याचा प्रकल्प असे. या पत्रांना उत्तरे येत असत. आपल्या आवडत्या लेखकाने आपल्याला पत्र पाठवले तर त्याचा विद्यार्थ्यांला होणारा आनंद फार वेगळा असे. गुणेश सांगतात, सध्या प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या एका विद्यार्थिनीला एपीजे अब्दुल कलाम यांनी उत्तर पाठवले होते, ते पत्र तिने आजही जपून ठेवले आहे. लेखकांना फक्त त्यांचे लेखन आवडण्याचीच पत्रे जात असे नव्हे, तर अनेक वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांकडून गुणेश पत्र लिहून घेत असत. एक प्रसिद्ध लेखक वारले होते. त्यांचा धडा विद्यार्थ्यांना अभ्यासाला होता. या लेखकांच्या कुटुंबीयांना  त्यांच्या दु:खात आम्ही सामील आहोत, असे पत्र विद्यार्थ्यांनी लिहिले होते. या पत्राला त्या लेखकांच्या पत्नीकडून आभाराचे अतिशय हृद्य पत्रोत्तर मिळाले होते. या साऱ्या पत्रसंवादातून विद्यार्थ्यांना संप्रेषणाची ((communication) एका वेगळ्या अर्थाने जाणीव होत होती.

नागरिकशास्त्राचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना पत्रे लिहिली. याचबरोबर वेगवेगळ्या देशांना म्हणजे त्यांच्या राजदूतांनाही पत्रे पाठवली गेली. ही पत्रे इंग्रजीत होती. या पत्रातून विद्यार्थ्यांनी त्या देशाची संस्कृती, शाळा याबद्दल प्रश्न विचारले होते. इंग्रजीसारख्या भाषेत आधी मजकूर तयार करणे, मग तो आपल्या शिक्षकांकडून वाचून घेणे, त्यात फेरफार करणे आणि सरतेशेवटी तो पक्का करून पाठवणे ही सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास ४०-५० देशांच्या राजदूतांना अशी पत्रे गेली होती. त्यातले बहुतेक सर्वानीच विद्यार्थ्यांना उत्तरे पाठवली. या उत्तरांसोबत भेटवस्तूही होती. चीनमधून त्यांचा पंखा आणि चलनातील नाणी आली. स्पेनमधून नकाशा मिळाला होता. या सगळ्या वस्तूंचे मग शाळेमध्ये प्रदर्शनही भरवले गेले. आज गुणेश यांचे विद्यार्थी यातल्याच अनेक देशांत जाऊन शिकत आहेत. नोकरी करत आहेत.

या पत्रलेखनासोबतच आपला इतिहास यासारखा एक प्रकल्पही गुणेशनी केला ज्यामध्ये स्वत:विषयी आठवणाऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लिहिल्या. सोबतच आपल्या कुटुंबाचा इतिहास, नातेसंबंध हे सारेच अभ्यासात्मक दृष्टीने मांडले. इतिहासलेखनाचा एक आगळावेगळा धडा यानिमित्ताने गिरवला गेला.

गुणेश कायम म्हणतात, अभ्यासाच्या वर्षांचे नियोजन होते, तसे सुट्टीचेही व्हायला हवे. सुट्टीत अनेक विद्यार्थी गुणेश सरांच्या घरीच येऊन राहत. गेली काही वर्षे स्वत: गुणेशच विद्यार्थ्यांना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जात असत; परंतु यामध्ये टिपिकल पर्यटन नसे, तर त्या शहरांतील महत्त्वाच्या व्यक्ती, कारखाने, ठिकाणे यांना भेटी दिल्या जात. त्यातून माहिती मिळवली जाई. अशा खऱ्या अर्थाने अभ्यास सहलीत गुणेशनी विद्यार्थ्यांसमवेत कोल्हापूर, कोकण, रायगड-सिंहगड-पुणे, तलासरी, दीव-दमण अशा अनेक ठिकाणांना भेट दिली आहे. आदिवासी पाडय़ांत जाऊन त्यांच्यात राहून काम करण्याचा अनुभवही गुणेशनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

आपल्या साऱ्याच विद्यार्थ्यांसाठी गुणेश कायमच शिक्षक आणि मित्र राहिलेले आहेत. त्यामुळेच कधीकधी पालकांशीही शेअर न केलेल्या गोष्टी त्यांचे विद्यार्थी गुणेशसोबत शेअर करतात. अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे संसारही सुरु आहेत पण माहेराच्या ओढीने ते आजही गुणेशकडे धाव घेतात. त्यांच्याशी मनातले बोलतात. सल्ले मागतात.

सध्या गुणेश यांच्याकडे तिसरीचा वर्ग आहे. या विद्यार्थ्यांना सतत पेन्सिलला टोक काढण्याची हौस असते. त्यामुळे वर्गात कचरा होतो. मग या कचऱ्याला नियंत्रित करण्यासाठी गुणेशनी एक वर्ग एक शार्पनर असा उपक्रम सुरू केला. त्यांच्या वर्गात एकच शार्पनर आहे, तेही कचऱ्याच्या डब्याजवळ. या छोटय़ाशा उपक्रमातून स्वच्छता, पेन्सिलची निगा, शिस्त अशा किती तरी गोष्टी साधल्या गेल्या. शिवाय शाळेतील सफाई करणारे दादा खूश झाले ते वेगळेच. या विद्यार्थ्यांशी गुणेश अनेक गोष्टींवर चर्चा करतात. म्हणजे केरळमधला पूर, माळीण दुर्घटना, आग लागणे अशा अनेक आपत्कालीन परिस्थितीविषयी त्यांचे तिसरीतले विद्यार्थीही उत्तम बोलतात. निसर्गाचा कोप होऊ नये यासाठी पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, यांसारख्या गोष्टी त्यांना पुस्तकातून शिकण्याची गरज राहत नाही.   इतकेच नव्हे तर मध्यंतरी जेव्हा दंगलीसारख्या घटना देशाच्या विविध भागांत घडल्या, त्यांच्या बातम्या आल्या, त्या वेळी वर्गात प्रार्थना बदलली गेली. ‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे वागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या प्रार्थनेतल्या ओळी विद्यार्थ्यांना आपसूकच समजून गेल्या.

या सगळ्या उपक्रमांतून केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर जीवनशिक्षणाचा धडा विद्यार्थी शिकत होते आणि आहेतही. या प्रवासामध्ये गुणेश हे कायमच त्यांचे मित्र आणि वाटाडय़ा राहिलेले आहेत. आजही गुणेश यांचे अनेक माजी विद्यार्थी त्यांच्या चांगल्या संपर्कात आहेत. हे सारे मिळून दुवा फाऊंडेशनसारखी सेवाभावी संस्था चालवतात. एकमेकांना मदत करतात. समाजातील आपत्कालीन स्थितीतही मदतीचा हात पुढे करतात. उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करतात. एका चांगल्या शिक्षकाच्या कामाची हीच तर खरी पावती असते!

मराठीतील सर्व लेख ( Careervrutant-lekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Educational experiments of teacher ganesh doifode

ताज्या बातम्या