भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी स्वातंत्र्याच्या आधीपासूनच सुरू होती. महाराष्ट्राच्या चळवळींचा अभ्यास करावयाचा झाल्यास प्रामुख्याने दोन चळवळी महत्त्वाच्या ठरतात.  मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ..

मराठवाडा मुक्तिसंग्राम

मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघलांचे राज्य दुबळे बनले. मुघलांच्या महत्त्वाकांक्षी सरदारांनी आपापल्या जहागिऱ्याचे रूपांतर स्वतंत्र राज्यामध्ये केले. याच वेळेस मीर कामरुद्दीन निजाम-उल-मुल्क याने हैद्राबाद या नवीन राज्याची स्थापना केली. निजाम-उल-मुल्कला मुघल साम्राटाकडून ‘आसफजहा’ हा किताब मिळाला होता म्हणून या घराण्याचा उल्लेख आसफजाही घराणे असेही केले जाते. या घराण्याने १७६४-१९४८ अशी एकूण २२४ वर्षे राज्य केले. निझाम मीर-उस्मान-अली हा या घराण्याचा शेवटचा राजा होता, यांच्या काळातच मराठवाडा मुक्तिसंग्राम घडून आला.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु हैदराबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता. तेलगु, मराठी, कन्नड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. निजामाच्या जुलमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ  लागले. त्यातच निजामाचे  पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या ‘रझाकार’ या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले. याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिले स्वामी रामानंद तीर्थ यांनी. त्यांनी या विरोधात प्रखर लढा दिला. महाराष्ट्र परिषेदेच्या अधिवेशनामुळे मराठवाडय़ात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय जागृती निर्माण झाली. आणि त्यामुळे १९३८ ते १९४८ पर्यंतचा हा काळ मुक्तिसंग्राम म्हणून ओळखला जातो.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाची अखेर पोलीस कारवाईने झाली. निजामी शासनसत्तेचा प्रतिकार १०९ तासांत संपुष्टात आला. ही पोलीस कारवाई म्हणजे लष्करी कारवाई होती. तिला ऑपरेशन पोलो नाव दिले होते. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणाऱ्या निजामी लष्कर व रझाकारी टोळ्यांविरुद्ध ऑपरेशन कबड्डी चालवले गेले होते. इ.स.१९४८च्या ऑगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ात ऑपरेशन पोलोची तयारी सुरू झाली. या मोहिमेसाठी फर्स्ट ग्वालियर लान्सर्स, मैसूर लान्सर्स, मेवाड इन्फन्ट्री, फोर्थ ग्वालियर इन्फन्ट्री, राजाराम रायफल्स, फर्स्ट मैसूर इन्फन्ट्री यातील दले तैनात केली होती. या लष्कराला हवाई दलाचे व रणगाडय़ांचे साहाय्य होते.

सदर्न कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंह हे पुण्याच्या मुख्यालयातून सर्व सूत्रे हलवीत होते. वेगवेगळ्या विभागांसाठी दलप्रमुख होते. सोलापूरहून शिरलेल्या तुकडय़ांचे नेतृत्व मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांच्याकडे होते तर औरंगाबादच्या बाजूने शिरलेल्या तुकडय़ांचे नेतृत्व मेजर जनरल डी.एस. ब्रार होते. हैदराबाद संस्थानात पाच दिशांनी लष्कर शिरले. वायव्येला औरंगाबादकडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला आदिलाबादकडून, दक्षिणेला कर्नुलकडून तर आग्नेयला विजयवाडय़ाकडून लष्कराने संस्थानी हद्दीत प्रवेश केला.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी सायंकाळी निजामाने आपली शरणागती घोषित केली. भारत जरी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला तरी हैद्राबाद संस्थान आणि त्यात समाविष्ट असलेला मराठवाडा १७ सप्टेंबपर्यंत निजामी राजवटीच्या गुलामगिरीखाली होता. म्हणून १७ सप्टेंबर १९४८ हाच दिवस खऱ्या अर्थाने मराठवाडय़ाचा मुक्ती दिन आणि भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ :

भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरदेखील महाराष्ट्राला स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडावे लागले. ब्रिटिश राजवटीमध्ये मराठी भाषिक प्रदेश प्रशासकीय कारणासाठी तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागला गेला होता.

१) मुंबई इलाखा  २) मध्यप्रांत व वऱ्हाड

३) हैदराबाद संस्थान (मराठवाडय़ाचा भाग)

या तिन्ही भागांमध्ये प्रशासकीय विविधता असली तरीही भाषिक व सांस्कृतिक समानता होती.

यासाठीच संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला जोरदार सुरुवात झाली हे प्रयत्न अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासुनच सुरू होते. यासाठी विविध पातळीवर/व्यासपीठावर संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली.

मराठी साहित्य संमेलन १९०८ – चिंतामणराव वैद्य

भाषावार प्रांतरचनेची मागणी १९१५ – लोकमान्य टिळक

मराठी साहित्य संमेलन : अहमदनगर – १९३९  मराठी भाषिक प्रदेशाचे नाव ‘संयुक्त महाराष्ट्र’ असावे.

संयुक्त महाराष्ट्र सभा : २८ जानेवारी १९४० – रामराव देशमुख

महाराष्ट्र एकीकरण परिषद : २४ मे १९४०- डॉ. टी. जे. केदार

संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा : १९४० च्या प्रारंभी श्री. वाकणकर यांनी धनंजयराव गाडगीळ व न. वि. पटवर्धन यांच्या मदतीने तयार केला.

संयुक्त महाराष्ट्र परिषद (१२ मे १९४६):

अशा विविध वस्तुनिष्ठ बाबींची माहीती कालानुक्रमानुसार लिहून काढल्यास परीक्षेला जातना त्याची उजळणी करणे, सोपे जाईल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वरील मागणीचा जोर वाढतच गेला; यासाठी भाषावार प्रांतरचना निर्माण करण्यासाठी विविध आयोग नेमण्यात आले त्या आयोगातील सदस्य, अध्यक्ष, त्यांच्या सूचना-शिफारसींचा अभ्याससुद्धा महत्त्वाचा ठरतो. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील असणारे वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांच्या भूमिकासुद्धा अभ्यासाव्यात. १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली व महाराष्ट्राच्या स्वतंत्र वाटचालीस सुरुवात झाली. १९६० ते २००३ पर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची सूची व त्यांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्य या सर्व बाबींचा समावेश पाठय़पुस्तकामध्ये केलेला आहे म्हणून त्यांचाही विशेष अभ्यास करावा. प्रत्येक बाबीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास अभ्यासामध्ये सुसूत्रता निर्माण होईल व इतिहासाच्या या विभागामध्ये जास्तीतजास्त गुण मिळतील यात शंका नाही.

संदर्भसूची :  ११ वी इतिहास : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्याच्या शिक्षण मंडळाने या पुस्तकाची निर्मिती केली असल्याने आपण यातील प्रत्येक बाबीचा सूक्ष्मपणे अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. परीक्षेला जाण्याआधी उजळणीसाठी हे सर्वात उत्तम पुस्तक आहे.

महाराष्ट्राचा इतिहास : कठारे / गाथाळ : यामधून आपल्याला  महाराष्ट्राविषयी नेमक्या, मोजक्या, महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करता येतो. एमपीएससीच्या प्रत्येक परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तक खूप उपयोगी ठरते.

आधुनिक भारताचा इतिहास : ग्रोव्हर आणि बेल्हेकर : भारतामध्ये ब्रिटिशांच्या आगमानापासून भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत सर्व बाबींचा अचूक समावेश यामध्ये केलेला आहे. याशिवाय इतिहास विषयाच्या एकूण नियोजनासाठी अधिक अभ्यास – माहितीसाठी  ‘सिव्हिल्स महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा माहितीकोश’ हे संदर्भ पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.