केंद्रीय नागरी उडान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, रायबरेली येथील वैमानिक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
जागांची संख्या
अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांची संख्या १५० आहे. यापैकी ७५ जागा खुल्या गटातील उमेदवारांसाठी असून २३ जागा अनुसूचित जाती, ११ जागा अनुसूचित जमाती तर ४१ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव आहेत.
 शैक्षणिक अर्हता
उमेदवारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र विषयांसह किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
निवड पद्धती
उमेदवारांचे वय १७ वर्षे असावे. अर्जदारांना संगणकीय पद्धतीने १७ मे २०१५ रोजी निवड परीक्षा द्यावी लागेल. संगणकीय निवड पद्धतीत निर्धारित गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना ८ जून २०१५ रोजी मुलाखत व वैमानिक पात्रता परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.
निवड पद्धतीत विशिष्ट गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल आणि त्याआधारे त्यांना १८ महिने कालावधीच्या छत्रपती शाहूजी विद्यापीठ, कानपूरच्या बीएस्सी (विमान वाहतूक) या १८ महिने कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
 अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० एप्रिल २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीची जाहिरात पाहावी अथवा http://www.igrua.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांनी अर्जासह पाठवायचे शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची मुदत
प्रवेश अर्ज संगणकीय पद्धतीने  ३० एप्रिल २०१५ पर्यंत वरील संकेतस्थळावर दाखल करावेत.