व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या तुलनेत जो फरक जाणवतो तो म्हणजे विषयांतील वैविध्य आणि अभ्यासक्रमाची व्याप्ती. त्याचप्रमाणे अध्यापन पद्धतीमध्येसुद्धा फरक पडू शकतो. एमबीएच्या पहिल्या वर्षी सर्व विषय अनिवार्य असतात आणि दुसऱ्या वर्षांपासून  स्पेशलाझेशनची सुरुवात होते. काही ठिकाणी पहिल्या वर्षीच्या दुसऱ्या सत्रापासूनच   स्पेशलायझेशनची सुरुवात होते. पहिल्या वर्षीच्या विषयांमुळे  व्यवस्थापनविषयक विषयांचा पाया पक्का होतो आणि दैनंदिन काम करताना व्यवस्थापकाला ज्या विषयांची मदत लागते त्या विषयांची माहिती होते. यामध्ये मॅनेजमेंट अकाऊंटिंग, व्यावसायिक अर्थशास्त्र, व्यवसायविषयक कायदे, व्यवस्थापनाची मूलतत्त्वे, संवाद कौशल्ये, ऑर्गनायझेशनल बिहेवियर अशा अनेक विषयांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे ज्याला आपण कार्यकारी स्वरूप म्हणतो असे विषय म्हणजे वित्तीय व्यवस्थापन, विपणन  व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास व मनुष्यबळाचे व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन इत्यादी अनेक विषय शिकवले जातात. दुसऱ्या वर्षी जरी स्पेशलायझेशन असले तरीसुद्धा काही विषय सर्वानाच शिकावे लागतात.
या सर्व विषयांचा अभ्यास करताना
स्वयं अध्ययनाची सवय लावून घेणे उपयुक्त ठरते. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना अनेकदा शिक्षकांनी दिलेल्या नोट्सवर अवलंबून राहण्याची सवय लागलेली असते. तसेच तयार उत्तरे पुरवणारी गाईड्स वापरण्याची सवय असते. या सवयींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे
आवश्यक आहे.
प्रत्येक विषयाचे महत्त्व व उद्देश समजून घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा आराखडा बनवायला हवा. यासाठी एमबीए अभ्यासक्रम करण्यामागचा दृष्टिकोन गांभीर्यपूर्वक असायला हवा. हा दृष्टिकोन अभ्यास करण्याच्या पद्धतीपासूनच स्वीकारला पाहिजे. विषयाचा अभ्यास करताना त्याच्या मुळापर्यंत जायची तयारी पाहिजे. त्या विषयावरील चांगले ग्रंथ शोधून ते वाचण्याचे कष्ट घ्यायला हवेत. केवळ पाठय़पुस्तकांवर भर देणे  योग्य ठरणार नाही. संदर्भ पुस्तके शोधण्यासाठी नियमित ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचण्याची सवय जाणीवपूर्वक लावून घ्यायला हवी. याबरोबरच प्रत्येक विषयाचा व्यवस्थापन क्षेत्रातील उपयुक्तता समजण्यासाठी वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये काम करीत असलेले मित्र, नातेवाईक यांच्यासोबत चर्चा केल्यास त्याचाही उपयोग होतो. जे विषय सैद्धान्तिक आहेत त्या विषयांच्या नोट्स स्वत:च तयार करता येतात. मॅनेजमेंट अकाऊंटिंग, स्टॅटिस्टिक्स, फायनान्शिअल मॅनेजमेंट यासारख्या विषयांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारची अंकगणिते  सोडवण्याचा सराव करता येतो. फायनान्शियल मॅनेजमेंट व मॅनेजमेंट अकाऊंटिंगमधील वेगवेगळय़ा संकल्पनांचा अभ्यास करताना त्यांचा उपयोग व्यवस्थापनातील निर्णय घेताना कसा करता येतो हेही शिकता येते.
विषयांचा अभ्यास करताना प्रत्येक विषयाचे उपयोजन म्हणजेच विषयाचा व्यवस्थापनातील निर्णय घेताना होणारा उपयोग समजणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी-विद्याíथनींना विषयाची ही बाजू समजावी यासाठी अनेक संस्थांमध्ये ‘केस स्टडी’ पद्धत वापरली जाते.
केस स्टडीमध्ये कंपन्यांना किंवा इतर व्यावसायिक संस्थांना भेडसावणाऱ्या एखाद्या प्रश्नासंबंधीची माहिती दिलेली असते. त्याचबरोबर कंपनीची पाश्र्वभूमी, इतिहास तसेच कंपनीची धोरणे यांची माहिती दिलेली असते. यामध्ये अपेक्षा अशी असते की केस स्टडीतील प्रश्न समजावून घेऊन ते प्रश्न  सोडवण्यासाठी उपाय सुचवणे तसेच या प्रश्नाबद्दल स्वत:चे मत व्यक्त करणे. काही केसेस काल्पनिक प्रश्नांवर आधारित असतात, तर काही केसेस मात्र प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित असतात.
काही संस्थांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम (स्टॅटिस्टिक्ससारखे विषय वगळता) केवळ केस स्टडीवर आधारित असतो आणि अभ्यासक्रम पूर्णपणे केस स्टडी पद्धतीनेच शिकवला जातो. काही संस्थांमध्ये केस स्टडी ही पद्धत पूरक म्हणून वापरली जाते. मॅनेजमेंट अकाऊंटिंग, फायनान्शिअल मॅनेजमेंट यासारख्या विषयांमधील केस स्टडी आकडेवारीवर व आकडेमोडीवर आधारित असतात तर मार्केटिंग, मनुष्यबळ विकास यासारख्या विषयांवरील केस स्टडीज प्रामुख्याने वर्णनात्मक स्वरूपाची असते. केस स्टडीमध्ये दिलेल्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांची मते तर्कसुसंगत  असणे अपेक्षित आहे तसेच विद्यार्थ्यांने आपल्या मताचे तार्किक समर्थन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
केस स्टडी पद्धत समजण्याकरता सराव आवश्यक ठरतो. असा अनुभव आहे की, विद्यार्थी-विद्याíथनी केस स्टडीला घाबरतात. केस स्टडी हा जर प्रश्नपत्रिकेचा किंवा अभ्यासक्रमाचा भाग नसेल व अभ्यासक्रमाचा पूरक भाग म्हणून वापरला जात असेल तर केस स्टडीच्या तासाला वर्ग रिकामे पडतात ही वस्तुस्थिती आहे. याचे कारण म्हणजे केस स्टडीची भीती हे जसे आहे तसेच परीक्षेत मार्क्‍स मिळवण्यासाठी त्याचा उपयोग नसणे हेही आहे. पण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे की, प्रत्येक गोष्ट मार्काशी निगडित करणे योग्य नाही तसेच याची भीती बाळगणेही योग्य नाही. एकदा भीती गेली की केस स्टडीची आवड निर्माण होऊ शकते.
केस स्टडी समजून घेण्यासाठी पहिल्यांदा लहान केसेसपासून सुरुवात करता येईल. प्रत्येक संदर्भ पुस्तकांच्या शेवटी अशा केसेस दिलेल्या सापडतील. या लहान केसेसवर सुरुवातीला लक्ष केंद्रित करून त्यातील प्रश्न समजला की, मित्र-मैत्रिणींचे लहान गट करून त्यावर चर्चा करता येते व प्रश्न कसा सोडवावा यावर विचार करता येतो. यानंतर प्राध्यापकांची मदत घेऊन आपला प्रश्न सोडवण्याचा दृष्टिकोन कितपत योग्य आहे, हा प्रश्न अजून कोणत्या प्रकारांनी सोडवता येईल यासंबंधी मार्गदर्शन घेता येते.
काही विषयांच्या केस स्टडीज  सविस्तर पद्धतीने दिलेल्या असतात. १५-२० पाने माहिती दिलेल्या अनेक केसेस आहेत. यामध्ये विद्यार्थी-विद्याíथनींची तक्रार अशी असते की शेवटचे पान वाचेपर्यंत सुरुवातीचा मजकूर आम्ही विसरतो. ही समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक पान वाचून झाल्यानंतर त्यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून नोट्स काढता येतात.
वरील विवेचनावरून लक्षात येईल की, केस स्टडी पद्धतीने विश्लेषण करण्याचे कौशल्य विकसित करता येते तसेच एखाद्या क्षेत्रातील प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित प्रश्न समजतात आणि ते सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागते. स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय पुढील करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
सारांश, व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या व घेऊ इच्छिणाऱ्या
सर्वानीच हे समजून घ्यायला हवे की, हा अभ्यासक्रम पूर्ण करताना प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपल्या आयुष्यातील  दोन वर्षे व शुल्कामधील आर्थिक गुंतवणूक यशस्वी व्हावी याकरता व्यावसायिक पद्धतीनेच हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर करिअरमध्ये यश मिळेल व प्लेसमेंटमागे धावण्याची गरज भासणार नाही, हे निश्चित.
nmvechalekar@yahoo.co.in (लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश