फारुक नाईकवाडे

दुय्यम सेवांच्या पूर्वपरीक्षेमध्ये इतिहास घटकाचा अभ्यासक्रम ह्य ‘आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास’ अशा प्रकारे विहित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मुंबई प्रांतातील घडामोडी आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठवाडा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, स्वतंत्र विदर्भाची मागणी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेऊन तयारी करायला हवी. या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?
PM Narendra Modi
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

मागील तीन वर्षत्च्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर लक्षात येते की, इतिहास या घटकावर १५ प्रश्न विचारले गेले आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडावर जास्त भर दिलेला आढळतो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधील ब्रिटिशांचे राजकीय आणि सामाजिक धोरण, त्यांचे कायदे, सामाजिक सुधारणा चळवळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व आंदोलने, राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान या बाबींवर भर देण्यात आलेला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडावर सन २०१८ नंतर प्रश्न विचारलेला नसला तरी त्याची तयारी न करून चालणार नाही. उलट दोन वर्षांत प्रश्न विचारलेला नसल्यामुळे या वर्षी या विभागातून किमान दोन ते तीन प्रश्न विचारले जाण्याची शक्यता गृहीत धरायला हवी.  उपघटकनिहाय तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात:

स्वातंत्र्यपूर्व इतिहास

राजकीय इतिहास

यामध्ये ब्रिटिशांचे राजकीय धोरण, त्यांचे विविध नागरी व राजकीय निर्णय / कायदे, महत्त्वाचे व्हाइसरॉय / गव्हर्नर जनरल व त्यांचे ठळक निर्णय या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

१८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मैलाचा दगड आहे. त्यामुळे या बाबतचे सर्व मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. सहभागी सामाजिक प्रवर्ग, त्यामागची कारणे, उठावाची सामाजिक – राजकीय कारणे, तात्कालिक कारणे, व्याप्ती, विविध नेते, त्यांचे कार्यक्षेत्र व उठावादरम्यान वा नंतरची त्यांची स्थिती, महत्त्वाच्या घोषणा, इ.

ब्रिटिशांच्या धोरणांवर भारतीयांच्या प्रतिक्रिया, राजकीय संस्था / संघटनांची स्थापना आणि कार्ये यांचा आढावा घ्यावा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, तीन ठळक कालखंड, त्यांतील महत्त्वाची अधिवेशने व ठराव, आंदोलने, त्यांचे स्वरूप व परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.

काँग्रेसच्या वाट्चालीतील महत्त्वाचे टप्पे, मवाळ व जहाल कालखंडाची तुलना महत्त्वाचे नेते, महात्मा गांधीजींच्या कालखंडातील तीन महत्त्वाचे टप्पे व चळवळी, त्याला समांतर इतर राजकीय संघटनांच्या चळवळी, मागण्या, महत्त्वाचे नेते यांचा बारकाईने अभ्यास करायला हवा.

सशस्त्र / क्रांतिकारी चळवळींचे दोन कालखंड, त्यांतील महाराष्ट्र, पंजाब व बंगालमधील क्रांतिकारक, त्यांच्या संघटना, महत्त्वाच्या घडामोडी, दैनिके / नियतकालिके, पुस्तके यांच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील. यामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीतील वैशिष्टय़पूर्ण बाबी समजून घ्याव्यात. उदाहरणार्थ साता-याचे ‘पत्री’ सरकार, नाटकांचा प्रचारासाठी उपयोग, इ.

या कालखंडातील महाराष्ट्रातील नेते, घडामोडी, आंदोलने, राजकीय संस्था यांचा जास्त बारकाईने आढावा घ्यायला हवा. नागपूरचा झेंडा सत्याग्रह यांसारखे महाराष्ट्रातील वैशिष्टय़पूर्ण योगदान माहीत असायला हवे.

सामाजिक इतिहास 

एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन:

देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पैलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी / व्यवसाय, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे. महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान, असल्यास विवाद/लोकापवाद, इ.

सामाजिक प्रबोधनाबरोबरच धार्मिक सुधारणांचाही यामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

या विभागाचा अभ्यास करण्यासाठी स्टेट बोर्डाची आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती असणारी पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक तसेच, बिपिन चंद्र यांचे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स हे पुस्तक अभ्यासोपयोगी आहे.

स्वातंत्र्योत्तर  भारताचा इतिहास :

या विभागामध्ये घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्वाच्या नेत्यांची भूमिका, संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका यांचा थोडक्यात आढावा घ्यायला हवा.

स्वतंत्र भारतातील महत्त्वाची आर्थिक व सामाजिक धोरणे, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील निर्णय, महत्त्वाच्या महत्त्वाकांक्षी योजना / प्रकल्प (विशेषत: महाराष्ट्रातील) यांचा आढावा घ्यायला हवा.

या कालखंडातील महत्त्वाच्या राजकीय चळवळी,   महत्त्वाच्या राजकीय पक्षांची स्थापना, वाटचाल समजून घ्यायला हवी.

पंडित नेहरू आणि त्यांचे अलिप्ततावादी धोरण, इंदिरा गांधी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण, आणीबाणी या बाबींचा आढावा घ्यावा.

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा अभ्यास करताना मराठवाडा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळी महत्त्वाच्या ठरतात.

मराठी साहित्य संमेलने, भाषावार प्रांत रचनेची मागणी, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असायला हवी. त्यानंतर नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा आवश्यक आहे.

त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंच्याहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चर्चेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास करावा. सन  २०२२ हा  ‘‘आजादी का अमृत महोत्सव’’ आहे. त्यामुळे स्वातंत्र्य हस्तांतरणासाठीच्या वेगवेगळय़ा प्रस्तावित योजना, त्यातील मुद्दे, फाळणीचे स्वरुप, त्याचे भौगोलिक, राजकीय, आर्थिक असे तात्कालिक आणि दूरलक्ष्यी परिणाम, संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया, तात्पुरते/हंगामी सरकार, स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळातील महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, प्रसिद्ध वक्तव्ये हे मुद्दे अपेक्षित यादीमध्ये असायला हवेत आणि त्यांचा बारकाईने अभ्यास करायला हवा.