UPSC Success Story Of Uday Krishna Reddy: अपमानाचा प्रत्येकालाच सामना कधी ना कधी करावा लागतो. कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान सहन करावा लागतो. त्या क्षणी जरी अपमान गिळत असलो तरी झालेला अपमान कुणीही विसरत नाही. काही जण चुकीच्या मार्गाने याचा बदला घेतात, मात्र यश संपादन करणं हाच सगळ्यात मोठा बदला आहे; हे तर साऱ्यांनाच मान्य असेल. मात्र, फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात. असेच एक पोलिस कॉन्स्टेबल असलेले उदय कृष्ण रेड्डी यांनी यूपीएससीची सिव्हिल सर्विसेस परीक्षा २०२३ क्रॅक करून मोठं यश संपादन केलंय. त्यांच्या जीवनातील हे सर्वात मोठे यशच नाही तर अपमानाचा खूप मोठा बदला त्यांनी घेतला आहे.

उदय कृष्ण रेड्डी यांचा पोलिस विभागातील एका सिनिअर अधिकाऱ्याने अपमान केला होता. या अपमानानंतर त्यांनी पोलिसातील नोकरी सोडून दिली. एवढंच नव्हे तर त्यानंतर सर्वात मोठा अधिकारी होण्याचा निश्चय केला, ज्याचा बदला त्यांनी तब्बल सहा वर्षांनी घेतला.

“शेवटी तू फक्त एक हवालदार

उदय कृष्ण रेड्डी यांच्या या यशाचा टर्निंग पॉईंट २०१८ ला झालेला अपमान आहे. साल २०१३ ते २०१८ पर्यंत उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेशात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. २०१८ मध्ये एका अधिकाऱ्याने वैयक्तिक वादातून ६० सहकारी पोलिसांसमोर उदय यांचा अपमान केला होता. या घटनेनंतर रेड्डी यांनी पोलिसांच्या नोकरीचा राजीनामा दिला. “तो अपमान मला सतावत होता, शेवटी तू फक्त एक हवालदार आहेस, असे त्या अधिकाऱ्याचे शब्द माझ्या डोक्यातून जात नव्हते”, असं उदय कृष्ण रेड्डी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिल्यानंतर उदय कृष्ण रेड्डी यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. यानंतर आता आयएएस अधिकारी होऊन दाखवायचंच असा निश्चय त्यांनी केला.

उदय कृष्ण रेड्डी सांगतात, “माझ्या सर्कल इन्स्पेक्टरला मी माझ्या फावल्या वेळात सिव्हिलची तयारी करत होतो हे आवडायचे नाही. ते माझ्या तयारीची चेष्टा करायचे आणि मला डिमोटिव्हेट करण्यासाठी माझ्यावर वेगवेगळ्या ड्युटी सोपवायचे. एके दिवशी त्यांनी ६० सहकाऱ्यांसमोर माझ्या तयारीची खिल्ली उडवली आणि मला थोडा उशीर झाला तेव्हा शिक्षा म्हणून मला अतिरिक्त तास काम दिलं. त्यांना फक्त माझी कारकिर्दीची प्रगती मर्यादित करायची होती.” मी राजीनामा दिल्यावरही त्यांनी तो न स्वीकारून मला त्रास देणं सुरूच ठेवल. मात्र, मी माझं संपूर्ण लक्ष माझ्या ध्येयाकडे लावलं आणि चौथ्या प्रयत्नात ७८० वा रँक पटकावला”, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >> VIDEO: शाब्बास पोरा! शेतकऱ्याचा लेक झाला IAS; घरची परिस्थिती बिकट, झोपडीत राहून यूपीएससीत भरारी

लहान वयात आई-वडिलांचं छत्र हरवलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान वयातच आई-वडील गमावलेले उदय कृष्णा रेड्डी आपल्या आजीसोबत वाढले आणि तेलुगू माध्यमाच्या सरकारी शाळेत शिकले. रेड्डी म्हणाले की, त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक या दोन्ही पार्श्वभूमी, आयएएस बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुकूल नव्हती. मात्र, या परिस्थितही माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल उदय कृष्ण रेड्डी कुटुंबातील सदस्यांचे आभार मानतात.