डॉ. श्रीराम गीत

सर माझे सध्या वय २४ आहे. माझे शिक्षण बीए (समाजशास्त्र), आयटीआय वीजतंत्री, इलेक्ट्रिकल डिप्लोमा असे आहे. मी मुंबई लोकलमधे उमेदवारी केली असून मेट्रो वन म नोकरी करत आहे. माझ्याकडे पीडब्ल्यूडीचे वायरमन लायसन्स आहे. गेली सहा वर्ष मी नोकरी करत माझ शिक्षण पूर्ण केले आहे. मी टेक्निकल फील्ड मध्ये दोन वर्ष काम केलं आहे आणि बाकीचं नॉन टेक्निकलमधे. मला नोकरी करत करत पुढे शिकायचं आहे. तरी तुम्ही बहुमूल्य मार्गदर्शन करावे. वर्तमान आणि येणाऱ्या भविष्यासाठी मी अजून कशा प्रकारे स्वत:ला तयार करावं. अजून कोणती कौशल्ये हवीत.-विकास खरात

तुमच्यासाठी दोन वेगवेगळे रस्ते जातात. पहिला रस्ता डिस्टन्स एमबीए करण्याचा आहे. कामाचा अनुभव व हातातील बीएची पदवी या दोनातून मार्केटिंगमधील एमबीएचा अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी त्याच जोरावर इंजिनीअिरग डिप्लोमा व मार्केटिंग स्किल यातून वेगळय़ा स्वरूपाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. दुसरा रस्ता खासगी व्यवसाय करण्याचा आहे. त्याचाही विचार करू शकता. लायसन्सड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून पहिल्यांदा उमेदवारी व त्यानंतर छोटी छोटी कंत्राटे घेत स्वत:चा व्यवसाय करणेही तुम्हाला शक्य आहे. खरे तर विविध अंगी शिक्षण घेत असून नोकरीचा छानसा अनुभव मिळवणारा तुमच्यासारखा विद्यार्थी क्वचितच पाहण्यात येतो. योग्य विचारांती निर्णय घ्यावा.

मी बीएस्सीला आहे. दहावीला ९५.८० टक्के मिळालेले आहेत. बारावीला मला ७३.२० आहेत. मी पोलीस भरती करता प्रयत्नात आहे. सर मला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा आहे, पण आर्थिक परिस्थिती चांगली नाही. वडिलांचे २०१६ मध्ये निधन झाले आहे. शेअर बाजाराची ही आवड आहे. सर मी काय करावे.     – सुदाम गोल्हार.

तुझे आजवरचे मार्क चांगले आहेत. ते टिकवून बी.एस्सी. करण्यावर पूर्ण भर दे. पुढचे रस्ते नंतर नक्की चांगले सुरू होतील. पोलीस भरती, कम्बाईन परीक्षा, शेअर बाजार वगैरे सर्व विषय बाजूला ठेवावेस. आर्थिक अडचण असताना या विषयात अडकून फायदा होत नाही. ९वीच्या शालेय विद्यार्थ्यांना रविवारी शास्त्र व गणित शिकवण्याची सुरुवात केलीस तर थोडेसे अर्थार्जन पॉकेट मनी म्हणून नक्की होईल.

 मी कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर लोणी येथे शेवटच्या वर्षांला आहे. मला अ‍ॅग्रीकल्चरमध्ये पुढील संधी काय हे समजत नाहीये. तरी मला माझ्या ध्येयाप्रमाणे शेतीला धरून व्यवसाय करायचा आहे. त्याचबरोबर अ‍ॅग्रीकल्चर स्पर्धा परीक्षाची तयारी करायची आहे. काय करू देत.        – मयूर सुनील पाटोळे.

प्रथम पदवीनंतर तुझ्या शेतीच्या गरजा लक्षात घेऊन जवळपासच्या गावात अ‍ॅग्रो मार्केटिंगच्या संदर्भातील दोन वर्षे नोकरी. या अनुभवानंतर कोणता व्यवसाय करायचा या विषयाची सखोल माहिती घेणे. वाटल्यास स्वत:च्या शेतात काही आधुनिकता आणता येते का याचाही विचार करून शेती व शेतीला पूरक व्यवसायाचा रस्ता. या दरम्यान अ‍ॅग्री संदर्भातील स्पर्धा परीक्षाचे स्वरूप समजून घेणे मग मग त्या रस्त्याला जायचे का नाही? किती प्रयत्न करायचे? यावर विचार करून तो रस्ता धरावास. खते, बी बियाणे, कीटकनाशके, फवारणी यंत्रे, यांत्रिक सामग्री, पाणीपुरवठा करण्यासाठीचे ठिबक सिंचनाचे व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात तुला नोकरी व काम मिळू शकते.

मी सध्या बीबीए दुसऱ्या वर्षांला असून संभाजीनगरमध्ये शिकत आहे. माझे लहानपापासूनच आयएएस बनण्याचे स्वप्न आहे. पण, बाबा अध्र्या वाटेतच सोडून गेले. त्यात असलेल्या स्पर्धेची मला जाणीव आहे. पण स्पर्धेच्या भीती पोटी मी बीबीएवरच फोकस करत आहे. पण कुठेतरी मनामध्ये खुपते की मी वडिलांना दिलेला शब्द न पाळणे बरोबर नाही. मी या स्पर्धेच्या युगात कशावर फोकस करायला पाहिजे.   – देवीदास पांडे.

मित्रा, बीबीएपर्यंतचे कोणतेही मार्क तू कळवण्याचे कष्ट घेतलेले नाहीस. स्पर्धा तीव्र असते हे तुला माहीत आहे हे तूच सांगतोस. पळवाट म्हणून बीबीएला प्रवेश घेतला आहेस हेही तूच लिहिले आहेस. यासाठी आता तुला जरा वेगळा रस्ता सांगतो आहे. फक्त आणि फक्त बीबीएवर लक्ष केंद्रित करून नऊ सीजीपीए मिळव. मिळेल ती नोकरी दोन वर्ष करत असताना एमबीए प्रवेश परीक्षेचा अभ्यास सुरू कर. ती सुद्धा कठीण असते त्यात यश मिळव व उत्तम कॉलेज मध्ये प्रवेश घे. एमबीए प्रवेश परीक्षेत पहिल्या एक हजारात आलास तर तुझी सगळी स्वप्ने पूर्ण व्हायला सुरुवात झाली असे समजायला हरकत नाही. एमबीए पूर्ण झाल्यावर नोकरी करताना दोन वर्षे किमान यूपीएससीचा अभ्यास वर्षांला पाचशे ते सहाशे तास करणे तुला शक्य आहे. मग त्या परीक्षेच्या रस्त्याला जावेस. मनात आहे, वडिलांना वचन दिले आहे, खूप अभ्यास करण्याची तयारी आहे यातील कोणत्याच वाक्याला पुरेसा आधार मिळून यश मिळत नसते. दमदार वाटचालीसाठी शुभेच्छा.