आपला भारत देश कृषिप्रधान देश असून शेती ही बव्हंशी मोसमी पाऊस व योग्य हवामान यावर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन हे आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीचा कणा असल्याने हवामानाचा, विशेषत:, मोसमी पावसाच्या अंदाजाला विशेष महत्त्व आहे. त्यासाठी हवामानाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे असते. हा अभ्यास म्हणजेच हवामानशास्त्र.

पृथ्वी या एकमेव ग्रहावर जीवसृष्टी आहे याचे कारण म्हणजे तिचे अनुकूल हवामान व वातावरण. हवामानाच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी व अंदाज तयार करण्यासाठी विशिष्ट उपकरणे वापरून तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग व दिशा इत्यादी हवेच्या घटकांच्या निरीक्षणांच्या नोंदी मिळवल्या जातात. हवामानाच्या घटकांची निरीक्षणे विविध स्थळांवर व विविध कालावधींसाठी घेतली जातात. याशिवाय उपग्रहाद्वारे विविध प्रकारच्या हवामानाच्या नमुन्यांच्या प्रतिमा मिळवल्या जातात. जमिनीवरील स्थानके स्थानिक हवामानाच्या घटकांची निरीक्षणे घेतात. रडार तंत्रज्ञानाचा वापर पावसाचा मार्ग समजण्यासाठी तसेच वादळे व पावसाचे वितरण यांचा अंदाज घेण्यासाठी होतो. निरीक्षणे घेणाऱ्या यंत्रणेनी सज्ज असलेल्या फुग्यांचा उपयोग पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरातील निरीक्षणे मिळवण्यासाठी होतो. महासागराच्या पृष्ठभागावरील तरंगकांचा उपयोग हवामानावर परिणाम करणाऱ्या समुद्राच्या घटकांची निरीक्षणे घेण्यासाठी होतो. या सर्व निरीक्षणांच्या नोंदी अद्ययावत असणे फार महत्त्वाचे असते. सर्व नोंदींचे जलद विश्लेषण करण्यासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. संगणकामध्ये विशेष प्रारूपांचा (models) वापर करून हवामान, त्यातील बदल व पाऊस यांचा अंदाज तयार केला जातो. तीव्र हवामानाचा अंदाज असेल तेव्हा तसा इशाराही दिला जातो. हवामानाच्या अंदाजाबरोबर हवेत होणारे बदल, ढगांची, वीजांची व पावसाची निर्मिती, हवेतील प्रदूषणाची कारणे व प्रमाण इत्यादींचाही अभ्यास व त्यावरील संशोधन हवामान शास्त्रज्ञ करत असतात.

हवामानशास्त्रातील संशोधनाचा प्रमुख उपयोग पर्जन्य व इतर ऋतुंमधील हवामानाचा अंदाज देणे आणि त्याचा वापर मुख्यत: शेतीचे नियोजन करण्यासाठी करणे यासाठी होतो. इतर महत्त्वाची क्षेत्रे ज्यामध्ये हवामानशास्त्राचा उपयोग अनिवार्य आहे ती म्हणजे पशुपालन व पशुसंवर्धन, धान्याचे व पाण्याचे नियोजन, वाहतुक व्यवस्था, वीज निर्मिती व तिचे पुरवठा व्यवस्थापन, वाहतुक व दळणवळण, आपत्तीनिवारण व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, संशोधन, पर्यटन, पर्यावरण, सर्वसाधारण माहिती देणारे प्रशासकीय विभाग इत्यादी. हल्ली तर विमा कंपन्याही हवामानाच्या अंदाजाचा वापर करून नैसर्गिक आपत्तींमध्ये अत्यावश्यक असलेल्या वित्तव्यवस्थेची तयारी करतात. या सर्व उपयुक्ततेमुळे हवामानशास्त्र हे एक सेवाकार्य बनले आहे. हवामानशास्त्राच्या परिपूर्णतेसाठी संगणकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास त्यात समाविष्ट असतो. सध्या जीवशास्त्र, समुद्रशास्त्र, व अभियांत्रिकी या शाखांचाही समावेश हवामानशास्त्रात केला जात आहे. थोडक्यात, हवामानशास्त्र हे सर्वसमावेशक बहुविद्याशाखीय असे शास्त्र आहे.

हवामानशास्त्रातील कार्यसंधीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय हवामान विभागात व त्या विषयासंबंधीच्या संस्थांमध्ये ज्या काही पदांवर कर्मचारी व अधिकारी यांच्या नियुक्त्या झाल्या ते भौतिकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र व तत्सम विषयातील पदवीधर असायचे. त्यामुळे त्यांना हवामानशास्त्रासाठी लागणारे प्रशिक्षण द्यावे लागे. याला कारण म्हणजे हवामानशास्त्र या विषयाचा भारतीय शिक्षणात स्वतंत्र विषय म्हणून समावेश नव्हता. हवामानशास्त्राची उपयुक्तता लक्षात घेऊन कालांतराने खालील विद्यापीठात व संस्थांमध्ये गणित, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र यासारख्या पारंपरिक विषया़ंबरोबर हवामानशास्त्रही शिकवले जाऊ लागले. हवामानशास्त्रातील नोकरीसाठी वरीलपैकी कोणत्याही विषयात एम.एस्सी. किंवा एम. टेक. किंवा पी. एच. डी. असावी लागते. अभियांत्रिकीतील पदवीही चालते. ज्यांना हवामानशास्त्रात कार्य करायचे आहे त्यांना हवामानशास्त्र किंवा त्यातील शाखेच्या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या बी. एस्सी., बी. टेक., एम.एस्सी., एम. टेक. या पदव्या प्राप्त कराव्या लागतात. या पदव्यांना प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा व पात्रता परीक्षांमध्ये आवश्यक गुण मिळवून उत्तीर्ण व्हावे लागते. संशोधन संस्था व विद्यापीठे यांमध्ये पीएच.डी. साठी शिष्यवृत्ती उपलब्ध असते. त्यासाठी जाहिरात देऊन व मुलाखत घेऊन योग्य उमेदवारांची निवड केली जाते.

हवामानशास्त्राचे शिक्षण देणारी विद्यापीठे व शैक्षणिक संस्था

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
  • कोचिन विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, कोची
  • आंध्रा विद्यापीठ, विशाखापट्टणम
  • भारतीयार विद्यापीठ, मदुराई
  • एस.आर.एम. विज्ञान व तंत्रज्ञान संस्था (चेन्नई, त्रिची, दिल्ली, हरयाणा)
  • राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, रूरकेला
  • कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता
  • महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा
  • पंजाबी विद्यापीठ, पतियाळा
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</li>
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), खरगपूर व दिल्ली
  • भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगलोर
  • इंदिरा गांधी कृषि विद्यापीठ, रायपूर
  • कृषि विद्यापीठे

पुणे व कोलकाता येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (Indian Institute of Science Education and Research – IISER) पृथ्वी विज्ञान अंतर्गत हवामानशास्त्राचे शिक्षण व संशोधनाचे प्रशिक्षण देते. त्यासाठी या संस्थेने भारतीय हवामानशास्त्र विभाग (India Meteorological Department – IMD) या संस्थेबरोबर सामंजस्य करारही केला आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (Indian Institute of Tropical meteorology – IITM) विद्यादान व संशोधनात मार्गदर्शन करते.

हवामानशास्त्र प्रशिक्षण संस्था

जागतिक हवामानशास्त्र परिषद (World Meteorological Organization – WMO) मान्यताप्राप्त भारतीय हवामानशास्त्र विभागाची हवामानशास्त्र प्रशिक्षण संस्था (The Meteorological Training Institute) पुणे व नवी दिल्ली इथे भारतातील व मित्र राष्ट्रातील हवामान शास्त्रज्ञांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देते.

हवामानशास्त्रातील सेवा, संशोधन, व विद्यादान यामध्ये कार्यसंधी

संस्था व विद्यापीठे

  • भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय (Ministry of Earth Sciences), दिल्ली (प्रशासन व व्यवस्थापन)
  • भारतीय हवामानशास्त्र विभाग (India Meteorological Department), पुणे, दिल्ली व क्षेत्रीय कार्यालये (सेवा व संशोधन)
  • राष्ट्रीय मध्यम पल्ल्याचे हवामान अनुमान केंद्र (National Centre for Medium Range Weather Forecasting), गुरगाव (सेवा व संशोधन)
  • भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (Indian Institute of Tropical Meteorology), पुणे (संशोधन)
  • भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (Indian National Centre for Ocean Information System), हैदराबाद (सेवा व संशोधन)
  • राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान स़ंस्था (National Institute of Ocean Technology), चेन्नई (संशोधन)
  • राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (National Centre for Polar and Ocean Research), गोवा (संशोधन)
  • राष्ट्रीय महासागर संस्था (National Institute of Oceanography), गोवा (संशोधन)
  • भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science), बेंगलोर (विद्यादान व संशोधन)
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institutes of Technology), खरगपूर व दिल्ली (विद्यादान व संशोधन)
  • भारतीय संरक्षण क्षेत्राचे वायूदल, नौकादल व पायदळ (Indian Airforce, Navy, Army) (सेवा)
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization), बेंगलोर व क्षेत्रीय कार्यालये (सेवा व संशोधन)
  • राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (National Remote Sensing Centre), हैदराबाद (सेवा व संशोधन)
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule University of Pune), पुणे (विद्यादान व संशोधन)
  • कोचीन विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (Cochin University of Science and Technology), कोची (विद्यादान व संशोधन)
  • आंध्रा विद्यापीठ (Andhra University), विशाखापट्टणम (विद्यादान व संशोधन)
  • भारतीयार विद्यापीठ (Bhartiyata University), मदुराई (विद्यादान व संशोधन)
  • पंजाबी विद्यापीठ (Punjabi University), पतियाळा (विद्यादान व संशोधन)
  • महाराजा सयाजीराव विद्यापीठ (Maharaja Sayajirao University), बडोदा (विद्यादान व संशोधन)
  • एस.आर.एम. विज्ञान व तंत्रज्ञान संस्था (चेन्नई, त्रिची, दिल्ली, हरयाणा) (विद्यादान व संशोधन)
  • राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, रूरकेला (विद्यादान व संशोधन)
  • कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता (विद्यादान व संशोधन)
  • कृषि विद्यापीठे (Agricultural Universities) (विद्यादान, सेवा व संशोधन)
  • भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (Indian Institute of Science Education and Research – IISER) (विद्यादान व संशोधन)
    खासगी संस्था
    नोएडा येथे १९८९ साली स्थापन झालेली बी.के.सी. वेदरसिस प्रायव्हेट लिमिटेड ही हवामान क्षेत्रातील तंत्रज्ञानाची भारतातील सर्वात जुनी खाजगी संस्था आहे. नॉयडा इथेच २००३ साली स्थापन झालेली स्कायमेट ही आणखी एक हवामान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील खाजगी संस्था आहे. या दोन्ही संस्था प्रसार माध्यमे, विमा, कृषी, उर्जा निर्मिती, विविध उद्योग, दळणवळण, इत्यादी क्षेत्रातील संस्थांना हवामानाचा अंदाज व त्याची रेखाचित्रे (ग्राफिक्स) पुरवतात. या दोन्हींही खाजगी संस्था हवामानाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक यंत्रणा व तंत्रज्ञानाचा वापर करतात. काही नवीन स्टार्ट अप कंपन्या पण या क्षेत्रात काम करत आहेत.

कृषी क्षेत्र

कृषी क्षेत्रात हवामानशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे भारतीय कृषी विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमात हवामानशास्त्र हा विषय अनिवार्य असतो. काही विद्यापीठात या विषयाच्या पदविका, पदवी, आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय असते. भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय जिल्हानिहाय कृषिहवामान सल्लासेवा पुरवते ज्याचा लाखो शेतकऱ्यांना लाभ होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागातही शेतकऱ्यांसाठी हवामान विषयक सल्ला देण्याच्या अनेक योजना आहेत. त्यातील महत्त्वाच्या म्हणजे आकाशवाणीद्वारे हवामानाचा अंदाज व इशारा देणारी ग्रामीण मौसम सेवा, भारतीय कृषी संशोधन परिषदेबरोबर स्थानिक भाषेत हवामानाचा अंदाज व इशारा देणारी मेघदूत सेवा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेमार्फत भारतात कोणत्याही ठिकाणी घडणाऱ्या वीजांच्या घटनांचा इशारा देणारे व काय काळजी घ्यायची हे सांगणारे दामिनी हे अॅप तयार केले आहे.

मिशन मौसम

भारत सरकारने १० जानेवारी २०२५ रोजी ‘मिशन मौसम’ या प्रकल्पाला मंजूरी दिलेली आहे. हा प्रकल्प पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था आणि नॉयडा येथील मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र यांच्या सहयोगाने भारतीय हवामानशास्त्र विभाग राबवत आहे. हवामानाच्या घटकांच्या नोंदी घेणारी अत्याधुनिक व स्वयंचलित यंत्रणा, खास उपग्रह, कलर डॉप्लर रडार्स यांचे जाळे तयार करून ते महासंगणकाला जोडणे, तसेच महासंगणकाची क्षमता व वेग वाढवणं इत्यादी गोष्टींना प्राधान्य देण्यात येत आहे. हवामानाचा अचूक अंदाज, तसेच हवामान बदलांमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीं यांचा इशारा यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही सुरू केलेला आहे

हवामानशास्त्रातील फायदे

हवामानाचा अंदाज वेळेवर देण्याने तीव्र हवामानामुळे येणाऱ्या आपत्तींपासून बचाव करता येतो तसेच आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्यांना योग्य नियोजन करणे शक्य होते. हवामानशास्त्रज्ञांना त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा योग्य वापर करण्याची संधी मिळते. यामध्ये निरीक्षणाच्या नोंदीचे विश्लेषण करणे, विविध प्रारूपे तयार करणे, पूरक तंत्रज्ञानाचा वापर करणे इत्यादी कार्ये करण्याची संधी प्राप्त होते. हवामानशास्त्र बहूविद्याशाखीय असल्याने त्यातील ज्ञानाचा व कौशल्याचा वापर अनेक क्षेत्रांत उपयुक्त ठरतो.

(लेखिका भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था,पुणेच्या निवृत्त वैज्ञानिक अधिकारी आहेत.)