रासायनिक रंग वापरणाऱ्या कारखान्यांचे दूषित पाणी जलप्रवाहांमध्ये जाऊन जलप्रदूषण आणि इतरही समस्या निर्माण होतात. हे ध्यानात घेऊन केबिकॉल्स सायन्सेस प्रा. लि. या स्टार्टअप कंपनीने यावर जैविक रंगांचा पर्याय शोधला आहे. हे रंग सूक्ष्म जीवाणूंपासून तयार केले जातात. या नैसर्गिक रंगांच्या उद्योगाविषयी माहिती देत आहेत संस्थापक डॉ. वैशाली कुलकर्णी…
मी डोंबिवलीकर आहे. मला पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीकरिता इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईमध्ये प्रवेश मिळाला. बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी हा माझा विषय होता. कॉलेजमध्ये टेक्सटाइल विभागात विविध कारखान्यांमधून पाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प येत. टेक्सटाइल उद्याोगात जे प्रक्रियायुक्त पाणी सोडण्यात येते, ते त्यातील रसायनांमुळे पर्यावरणीयदृष्ट्या हानिकारक असते. पण त्यावर कितीही प्रक्रिया केली तरी ते १०० टक्के शुद्ध होत नाही. त्यावर संशोधन सुरू आहे. एकदा एका चर्चेतून असा विचार आला की पाण्यावर प्रक्रिया करण्यापेक्षा असे रंग निर्माण करता येतील का की जे रंग थेट पाण्यात सोडले तरी पाणी प्रदूषित होणार नाही.
● संकल्पनेला आकार
कंपनीचे सहसंस्थापक आणि माझा पती डॉ. अर्जुन सिंह बाजवा आम्ही दोघं आयसीटीत एकत्र शिकत होतो. आमचे पीएचडीचे विषय वेगवेगळे होते. तो जेनेटिक इंजिनीअरिंग विषयात पीएचडी करत होता. माझे मार्गदर्शक प्रा. अनंत पटवर्धन यांची मी खूप आभारी आहे. त्यांनी पीएचडी विषयासाठी मला कधी मर्यादा न घातल्यामुळेच या विषयाचा व्यापक अभ्यास मला करता आला आणि उत्तरोत्तर पुढील मार्ग सापडत गेला. पटवर्धन सरांचे काम पाण्यावरील प्रक्रियेसंबंधीत होते. संशोधनाशी संबंधित अनेक स्पर्धा असतात. त्यात मी आणि अर्जुन भाग घ्यायचो. या जैविक रंगाची केवळ संकल्पना आम्ही एका स्पर्धेत मांडली तेव्हा आम्हाला तिसरं बक्षिस मिळालं होते.
आणखी लहान लहान स्पर्धांमध्ये आम्हाला या संकल्पनेवर बक्षीस मिळत गेलं, पण जो महत्त्वाचे निर्णायक वळण होते ते म्हणजे अॅक्सिस मूट्स २०१७ स्पर्धा. त्यातील परीक्षकांच्या पॅनेलने आमच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिले आणि ती केवळ संकल्पनेच्या पातळीवर न ठेवता प्रत्यक्षात आणण्याविषयी सुचविले. सध्या वापरले जाणारे रासायनिक रंग हे पेट्रोलियम क्षेत्रातून येतात, ते कधी ना कधी संपणार आणि भविष्यात पर्यावरणस्नेही जैविक रंगांची खूप मोठी गरज उद्याोगांना निर्माण होणार आहे, असे सांगत आमच्या संकल्पनेला बळ दिले. हे परीक्षक आमच्या उद्याोगात गुंतवणूक करण्यासही तयार झाले.
आम्हाला २५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले. ते बक्षीस भांडवलासारखे वापरून आम्ही दोघांनी त्यावर काम करणे सुरू केले. त्यानंतर आम्हाला बायरॅककडून निधी मिळाल्यानंतर २०१८ ला आमची स्टार्टअप कंपनी सुरू झाली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्याचकडून दुसरा निधी मिळाला. पुणे येथे व्हेंचर सेंटरद्वारे प्रयोगशाळा उपलब्ध झाली. चिराटे व्हेंचर्स, नॅबव्हेंचर्स, अॅक्सिलॉर आणि अन्य काहींनी निधी पुरवला. या फंडिंगमुळे भोसरी येथे प्रायोगिक उत्पादन केंद्र उभारले.
● रंगांविषयी…
केबिकॉल्समध्ये आम्ही सूक्ष्म जीवाणूंपासून नैसर्गिक रंग बनवतो. सध्या आपल्याकडे अन्न, वस्त्रोद्याोग, रासायनिक उद्याोग या सर्व ठिकाणी रासायनिक रंगांचा वापर केला जातो. रासायनिक रंगांचे पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित नसून पुढे घातक ठरू शकतात. नैसर्गिक रंगांमध्ये सध्या झाडे, कंदमुळे, पालेभाज्या, बीट, हळद आदीतून आपण नैसर्गिक रंग तयार करतो. पण ते रंग जास्त टिकाऊ नसतात. त्यामुळे त्यांचा उद्याोगांमध्ये वापर होत नाही. दुसरे म्हणजे त्यांची वाढ करण्यासाठी जमीन लागते, वनस्पतीची लागवड करावी लागते.
काही पिकं सीझनल असतात. त्यामुळे यावर पर्याय म्हणून आम्ही हे जैविक रंग शोधले. हे रंग प्रयोगशाळेत बायोरिअॅक्टरमध्ये वाढतात. एक रंग (रंगाचा जीवाणू) साधारणपणे २४ तासांत वाढतो आणि त्यासाठी फार जागाही लागत नाही. हे जीवाणू आम्ही निसर्गातील वेगवेगळ्या ठिकाणांहून घेतो आणि प्रयोगशाळेत ते वाढवतो. त्यापासून जो रंग निघतो तो नैसर्गिक असतो. आपल्या आजूबाजूला खूप विविध प्रकारचे जीवाणू असतात. उदाहरणार्थ, आमच्याकडे जो निळा रंग तयार होतो, त्यासाठी लागणारा जीवाणू आम्ही तलावातून घेतला.
एक मि.ली. पाणीही त्या जीवाणूपासून लक्षावधी जीवाणू तयार करण्यासाठी पुरेसे असते. जसं आपण दह्याचं विरजण लावतो, तशाच प्रक्रियेद्वारे हे जीवाणू वाढत जातात. तो ज्या तापमानात वाढला आहे तसंच तापमान प्रयोगशाळेत तयार करून त्यात तो वाढवला जातो. काही विशिष्ट परिस्थितीत हे जीवाणू स्वत:च्या सुरक्षिततेसाठी म्हणून रंगद्रव्यांचे स्राव तयार करतात. त्यातून हे रंग मिळतात.
● चारांतून १५ रंग
सध्या आम्ही मूळ चार रंग तयार करतो. त्यात मिश्रण करून आम्ही एकूण १५ रंग तयार करू शकतो. चॉकलेटी, हिरवा, हलका गुलाबी, आकाशी हे मुख्य चार रंग आहेत. या क्षेत्रात जागतिक पातळीवर फार थोड्या कंपन्या आहेत. यापैकी काही कंपन्या जीवाणूंमध्ये अनुवांशिक बदल करून नंतर त्यापासून रंग तयार करतात. आम्ही जीवाणूंमधील नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रंगद्रव्यापासून रंग तयार करतो.
अंतिम उत्पादन भुकटी (पावडर) स्वरुपात असते. आम्ही सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ कापड उद्याोगासाठी हे रंग तयार करत आहोत. पण भविष्यात अन्न आणि सौदर्य प्रसाधनांसाठी वापरले जाणारे रंग तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कारण या दोन क्षेत्रात नैसर्गिक रंगांची मागणी सर्वाधिक आहे. या उद्याोगांत नियामक प्रक्रिया अधिक काटेकोर आहे, ती गाठण्यासाठी आम्हाला आणखी काही अवधी लागेल. शिवाय तसा मोठ्या प्रमाणावर निधीही लागेल. त्यामुळे प्राथमिक पातळीवर आम्ही कापड उद्याोगासाठी रंग तयार करत आहोत.
● अडचणींतून मार्ग
आमची संकल्पना मोठ्या क्षमतेने वापरण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या. पण त्यातूनही मार्ग काढला. लवकरच आमचे उत्पादन व्यावसायिकदृष्ट्या बाजारात येईल. पाच-सहा कंपन्यांसोबत आमचे प्रायोगित तत्त्वावर काम झाले आहे. या सर्व कंपन्या परदेशी आहेत. ही प्रक्रिया खर्चिक असल्याने भारतीय बाजारात उतरण्यासाठी आम्ही उत्पादनाच्या किमतीवर काम करत आहोत. काही भारतीय कंपन्याही आमच्या संपर्कात आहेत. याप्रकारे मानवजातीची सेवा करण्याची पूर्ण संधी आम्ही घेऊ, अशी आम्हाला आशा आहे.
(शब्दांकन : मनीषा देवणे) careerloksatta@gmail.com
