Salary of Intern in Mumbai: शिक्षण पूर्ण झाल्यावर करिअरला सुरूवात करताना पगार, ठिकाण या सगळ्या गोष्टींचा विचार फारसा केला जात नाही. कारण सुरूवातीचे काही महिने इंटर्नशिप, त्यातून शिकणं, प्रॅक्टिकल ज्ञान मिळवणं या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. पण इथे तर चक्क इंटर्नलाच एखाद्या पेरोलवरील कर्मचाऱ्यापेक्षाही जास्त पगार मिळत आहे. हो, मुंबईतल्या एका कंपनीने इंटर्नला तब्बल १२. ५ लाख रूपये दरमहा पगार ऑफर केला आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अॅमस्टरडॅमस्थित आयएमसी ट्रेडिंग बीव्ही या कंपनीने भारतात काम करणाऱ्या त्यांच्या इंटर्नना हे पॅकेज देऊ केलं आहे.
साधारणपणे कोणत्याही क्षेत्रातील कंपनीत सुरूवातीच्या टप्प्यातील कामासाठी एवढं पॅकेज दिलं जातं. काही कंपन्यांमध्ये तर याहीपेक्षा कमी पॅकेज दिलं जातं. या कंपनीने गेल्या वर्षीदेखील त्यांच्या इंटर्न्सना भलंमोठं पॅकेज देऊ केलं होतं. मात्र, यावर्षी त्यांनी याच पॅकेजमध्ये तब्बल तिपटीने वाढ केली आहे.
अनेक कंपन्या प्रतिभाशाली कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेत आहेत. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यापूर्वीच या मोठ्या ऑफर्स मिळत आहेत. भरती करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, स्टायपेंड केवळ आकर्षक नाहीत तर प्रतिस्पर्ध्यांच्या आधी कार्यक्षम तरूणांना नोकरी मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न आहेत.
भारतातील डेरिव्हेटिव्ह्ज व्यवहारांमध्ये आता अल्गोरिदमिक ट्रेडिंगचा वाटा ७० टक्के असल्याने उद्योगात प्रवेश करणाऱ्या इंटर्नकडून लवकरात लवकर जुळवून घेण्याची अपेक्षा आहे.
तुम्हालाही अशा इंटर्नशिपच्या ऑफर मिळू शकतात का?
दरमहा एवढं मोठं पॅकेज मिळवण्यासाठी काय करावं लागेल यावर रिक्रूटर्स म्हणतात की, आयएमसीसारख्या ट्रेडिंग फर्म्स परिणामकारक आणि कोडिंग कौशल्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतात. गणित, सांख्यिकी, संभाव्यता आणि अल्गोरिदम डिझाइनचा विचार करा. अनेकदा स्पर्धात्मक समस्या सोडवण्याद्वारे चाचणी केली जाते. पायथन, सी ++ आणि डेटा स्ट्रक्चर्समधील प्राविण्य याला प्राधान्य दिले जाते. भरती प्रामुख्याने आयआयटी आणि काही प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेज कॅम्पसमध्ये होते. इंटर्न्सना सहसा कठीण चाचण्या आणि मुलाखतींमधून जावे लागते. त्या माध्यमातून केवळ कोडिंग क्षमताच नाही तर दबावाखाली ते किती जलद विचार करू शकतात हेदेखील तपासले जाते.
तांत्रिक कौशल्यांव्यतिरिक्त कंपन्या अशा विद्यार्थ्यांचाही शोध घेतात जे परिस्थितीशी लवकर जुळवून घेऊ शकतात. ट्रेडिंग क्षेत्रात आज एखादी रणनीती काम करत असेल, तर दोन महिन्यांनी ती कालबाह्य झालेली असते. त्यामुळेच कुतूहल, लवचिकता आणि सतत शिकण्याची तयारी हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अशा ऑफर्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे बरेच मार्ग आहेत. प्रगत गणितांमध्ये सुधारणा, मजबूत कोडिंग प्रोफाइल बनवणे, हॅकेथॉन आणि क्वांट स्पर्धांमध्ये भाग घेणे. तसंच IMC, Quadeye आणि Citadel securities यासारख्या कंपन्यांकडून कॅम्पसमध्ये होणाऱ्या भरतीकडे लक्ष ठेवा.