मागील लेखात आपण एनसीसी, एनएसएस, स्काऊट या उपक्रमांबद्दल व्यक्तिमत्व चाचणीत काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिलं. आजच्या लेखात आपण काही खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहणार आहोत. आज आपण बॅडमिंटन, टेनिस आणि टेबल टेनिस या तीन खेळांबद्दलच्या प्रश्नांचा विचार करणार आहोत.

डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये स्पोर्ट्स याबद्दल माहिती लिहिण्याची संधी असते. यामध्ये वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या खेळांबद्दल लिहू शकतात. त्यामुळे बहुतेक सगळ्या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांबद्दलचे प्रश्न आपण या आणि पुढच्या काही लेखांमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेखामध्ये आपण बॅडमिंटन, टेनिस आणि टेबल टेनिस या तीन खेळांबद्दलच्या प्रश्नांचा विचार करणार आहोत.

कोणत्याही खेळाबद्दल काही बेसिक माहिती उमेदवाराला असली पाहिजे. ही बेसिक माहिती कोणती? प्रत्येक खेळाचा स्कोअरिंग पॅटर्न वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ टेनिसच्या पुरुषांच्या मॅचेस मध्ये ५ सेट असतात. या सेटमध्ये गेम्स असतात. त्या गेम्सचे स्कोअरिंग शून्यापासून सुरू होऊन १५, ३०, ४० असे पुढे जाते. जेव्हा एका गेममध्ये दोन्ही खेळाडूंचा स्कोअर समान म्हणजे ४० पॉईंट्स होतो तेव्हा त्याला ड्यूस म्हणतात, पण याच ड्यूसला फ्रेंच खुल्या स्पर्धेत इगलिते म्हणतात. टाय ब्रेकर केव्हा होतो, डबल फॉल्ट काय असतो? त्याचा स्कोअरवर काय परिणाम होतो हे स्कोअरिंग बद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बॅडमिंटनचा एक गेम हा २१ पॉईंट्सचा (गुणांचा) असतो आणि मॅच जिंकण्यासाठी ३ गेम्स जिंकावे लागतात. बॅडमिंटन मध्येही २० पॉईंट्स वर टाय ब्रेक होतो. त्यानंतर किती पॉईंट्स सलग जिंकावे लागतात हे माहिती असायला पाहिजे. टेबल टेनिसमध्ये ११ पॉईंट्स मिळवून गेम जिंकता येतो. मॅच जिंकण्यासाठी ७ गेम्स जिंकणं आवश्यक असत. टेबल टेनिसमध्ये एका खेळाडूला सलग दोन वेळा सर्व्हिस करता येते. पण जेव्हा दोन्ही खेळाडूंना १० पॉईंट्स मिळतात तेव्हा प्रत्येकाला एकदा अशी आलटून पालटून सर्व्हिस मिळते.

स्कोअरिंगबद्दल हे लिहिण्याचा उद्देश हा की प्रत्येक खेळाच्या स्कोअरिंग मध्ये आणि नियमांमध्ये फरक असतात. उमेदवार जो खेळ खेळत असेल किंवा ज्या खेळाबद्दल त्याने डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये माहिती लिहिली असेल त्या खेळाच्या स्कोअरिंगबद्दल सगळी माहिती त्या उमेदवाराकडे असली पाहिजे. एकापेक्षा जास्त खेळांचा उल्लेख डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये असेल तर त्या दोन खेळांची एकमेकांशी तुलना करणारे प्रश्नही विचारले जाऊ शकतात. कुठच्याही खेळाच्या संदर्भात, त्या खेळासाठी वापरल्या जाणाऱ्या रॅकेट्स, बॉल्स, नेट, शटल, टेबल याबद्दलही प्रश्न विचारले जाऊ शकतात. बॉलचा रंग, बॉल कशापासून बनवले जातात, रॅकेट बनवण्यासाठी काय साहित्य वापरलं जातं , टेबल कशापासून बनवलं जातं, नेट किती उंचीवर लावलं जातं अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.खेळाच्या मागे जे विज्ञान असतं त्याबद्दलही अनेकवेळा प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ, बॉलला स्विंग कशामुळे मिळतो? ग्रास कोर्टवर जी आर्द्रता असते त्याचा बॉल च्या स्विंगवर काही परिणाम होतो का? शटल दूरपर्यंत पोहोचण्यासाठी, किती जोराने रॅकेट मारली पाहिजे ? या सगळ्यामागे जी विज्ञानाची मूलभूत तत्व असतात त्याची माहिती उमेदवाराला असावी लागते.

थोडक्यात काय तर क्रीडाप्रकारांची सर्वसाधारण आणि काही विशिष्ट अशी तयारी करावी लागते.

बॅडमिंटन संदर्भात काही हमखास विचारले जाणारे प्रश्न

बॅडमिंटन ला ओल्ड पुणे गेम असे का संबोधले जाते? जगात बॅडमिंटन खेळात टॉप सिडेड (अग्रमानांकित) महिला, पुरुष कोण आहेत? जगात चीन किंवा दक्षिण पूर्व आशियातील देशांचे या खेळावर वर्चस्व का आहे? बॅडमिंटन खेळात पॅरिस आणि टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारतीय स्पर्धकांची कामगिरी कशी होती? हैदराबाद शहराला बॅडमिंटन हब का म्हणतात? बॅडमिंटन खेळाशी निगडित वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि त्यात भारताची कामगिरी कशी आहे? या खेळाच्या नियमांविषयी माहिती सांगा? या खेळाच्या प्रसारासाठी आणि ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवण्यासाठी कोणती पाऊले उचलायला हवी?

टेबल टेनिस खेळासंबंधी प्रश्न

या खेळाचा उगम कोठे झाला? अग्रमानांकित पुरुष, महिला तसेच देशविदेशातील विविध स्पर्धा विषयी काय माहिती आहे? टेबल टेनिस खेळाचे नियम आणि ग्रामीण भारतात या खेळाच्या प्रसारासाठी कोणती पावले उचलायला हवी? जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे स्थानांकन कोणते आहे ?

यानंतर कुठच्याही खेळाबद्दल काही कॉमन प्रश्नांची तयारी केली पाहिजे. तुमचे आवडते खेळाडू कोण? तुम्हाला त्यांच्या खेळाबद्दलची कुठची गोष्ट आवडते? भारताचे कोणते खेळाडू हा खेळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात? त्या खेळाच्या महत्त्वाच्या स्पर्धा कोणत्या आहेत? त्या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे का? खेळात राजकारण नसावे आणि खिलाडू वृत्ती वृद्धींगत व्हावी याविषयी तुमचे मत सांगा?

टेनिस खेळासंबंधी विचारले जाणारे प्रश्न

ग्रँडस्लॅम म्हणजे काय आणि यात कोणत्या इव्हेंटचा समावेश होतो? अमृतराज बंधू, कृष्णन बंधू, सानिया मिर्झा, महेश भूपती, लिअँडर पेस , रोहन बोपण्णा या भारतीयांच्या टेनिसमधील कामगिरीविषयी सांगा? भारताने आजतागायत ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीत एकदाही पदक मिळविले नाही याचे कारण काय? टेनिस संबंधी देश-विदेशात आयोजित केल्या जात असलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि त्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी या विषयी माहिती सांगा? जागतिक टेनिसमध्ये अग्रमानांकित पुरुष आणि महिला कोण आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mmbips@gmail. Com/ supsdk@gmail. Com