शिक्षण शुल्कातील मदतीसाठी असणारे आर्थिक पर्याय
● संपूर्ण शिष्यवृत्ती : परदेशातील शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला किमान आर्थिक मदत मिळावी अशी इच्छा असते. कारण त्यामध्ये मग ट्युशन फी भरता येते व त्याबरोबरच तिथल्या वास्तव्याचा व खर्चाचा प्रश्न निकाली निघतो. या आर्थिक मदतीसाठी विद्यार्थ्यांकडून पहिला पर्याय निवडला जातो तो म्हणजे संपूर्ण शिष्यवृत्तीचा. कारण संपूर्ण शिष्यवृत्ती म्हणजे शंभर टक्के आर्थिक मदत. विद्यार्थ्याला एकाही रुपयाची आर्थिक झळ न बसता विद्यापीठात निवास व भोजनाच्या सोयींसह प्रवेश मिळणे. नेमक्या या बाबीमुळेच संपूर्ण शिष्यवृत्तीसाठी प्रचंड स्पर्धा असते. इथे एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते म्हणजे जगभरातील येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अर्जांच्या एकूण संख्येमुळे आणि विद्यापीठांकडे असलेल्या निधीच्या मर्यादेमुळे सर्वच भारतीय विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मग विद्यार्थ्यांना ट्युशन वेव्हर किंवा अर्धशिष्यवृत्तीवर अवलंबून राहावे लागते.
● भारतीय शिष्यवृत्ती : परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संस्थाही शिष्यवृत्त्या देत असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येतो. त्यामध्ये टाटा इंडोमेंट शिष्यवृत्ती, इनलॅक्स शिष्यवृत्ती, केसी महिंद्रा शिष्यवृत्ती, आगा खान इंटरनॅशनल शिष्यवृत्ती, ब्रिटीश कॉन्सील, रोटरी शिष्यवृत्ती, आरडी सेठनाआणि लोटस ट्रस्ट सारख्या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मदत मिळते.
● अर्ध-शिष्यवृत्ती : परदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थी जेव्हा अर्ज करतात तेव्हा त्याच्या अर्ज व इतर संबंधित कागदपत्रांवरून विद्यापीठाच्या प्रवेश समितीला विद्यार्थ्याच्या क्षमता-अक्षमतांचा अंदाज येतो. त्यावरून बऱ्याचदा जवळपास प्रत्येक परदेशी विद्यापीठाकडून काही विद्यार्थ्यांना किमान आर्थिक मदत मिळावी यासाठी अर्ध-शिष्यवृत्ती (पार्शियल स्कॉलरशिप) बहाल केली जाते. ही शिष्यवृत्तीशिक्षण शुल्काच्या ठराविक टक्केवारीमध्ये दिली जाते. उदाहरणार्थ,काही विद्यापीठे विद्यार्थ्याला पन्नास किंवा साठ टक्के शिष्यवृत्ती बहाल करतात. विद्यार्थ्यांच्या एकूण शिक्षणशुल्कापैकी मग तेवढी फी कमी होते. राहिलेली रक्कम विद्यार्थ्याला स्वत:ला द्यावी लागते. विद्यार्थ्यांना पन्नास किंवा साठ टक्के शिष्यवृत्ती जरी मिळाली तरी त्या विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क किती आहे हे विद्यार्थ्याने तपासावे.
● ट्युशन वेव्हर : काही विद्यापीठे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना थेट आर्थिक मदत न देता त्यांच्या शिक्षणशुल्कामध्ये कपात करतात. यालाच ट्यूशन वेव्हर असे म्हटले जाते. अमेरिकेतल्या टेक्साससारख्या काही राज्यांमधून सर्वच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शिक्षणशुल्कामध्ये सवलत मिळते. टेक्सासमधील कोणत्याही विद्यापीठाला एखाद्या विद्यार्थ्याने जर अर्ज केला असेल तर त्या विद्यार्थ्याला ‘इन स्टेट’ विद्यार्थी म्हणून गृहीत धरले जाते, म्हणजे त्याला स्थानिक विद्यार्थ्यांएवढी फी लागू होते आणि त्यामुळे ट्युशन वेव्हर (फी सवलत) मिळून फी बरीचशी कमी होते. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अर्ध्याहुनही अधिक शुल्कामध्ये कपात मिळते/मिळू शकते.
दैनंदिन खर्च भागविण्यासाठी कोणते पर्याय?
● ऑन-कॅम्पस जॉब्स : F1 व्हिसा असलेले विद्यार्थी आठवड्याला वीस तास काम करू शकतात. अर्थात त्यातून मिळणाऱ्या वेतनातून विद्यार्थी त्यांचा दैनंदिन खर्च भागवू शकतात. ऑन-कॅम्पस जॉब्स म्हणजे थोडक्यात भारतातील अनेक विद्यापीठे/महाविद्यालयांमधील ‘कमवा आणि शिका’ सारखं असलेले परदेशी मॉडेल. यामध्ये विद्यापीठाच्या आवारातील विविध कामे विद्यार्थ्यांकडून केली जातात. उदाहरणार्थ, एखाद्या प्राध्यापकाच्या संशोधनासाठी आवश्यक संगणकीय मदत करणे, विद्यापीठास आवश्यक असलेल्या विषयातील कनिष्ठ स्तरावरील विद्यार्थ्यांचे वर्ग घेणे, ग्रंथालयात किंवा वसतीगृहामध्ये प्रशासनास मदत करणे इत्यादी. विद्यार्थी आपले शिक्षण घेत असतानाच विद्यापीठासाठी आठवड्यातील वीस किंवा त्यापेक्षाही कमी तास काम करू शकतात व विद्यापीठ त्यासाठी त्यांना ताशी ठराविक मानधन देत असते.
● असिस्टंटशिप : असिस्टंटशिप म्हणजे सहाय्यवृत्ती. ही कामे विद्यार्थ्याच्या कौशल्यवाढीसाठी पूरक असतात. रिसर्च असिस्टंट हे संशोधनात मदत करतात तर टीचिंग असिस्टंट हे किरकोळ शैक्षणिक कामांमध्ये प्राध्यापकवर्ग वा विद्यापीठास मदत करतात. जे विद्यार्थी संशोधन किंवा शैक्षणिक क्षेत्रात आपल्या भावी करिअरची योजना आखत आहेत त्यांना अशा असिस्टंटशिपच्या माध्यमातून उत्तम अनुभव मिळू शकेल. शिवाय, संशोधक-प्राध्यापकांशी संबंध विकसित करुन भविष्यामध्ये त्यांना शिफारसपत्रांची आवश्यकता असल्यास असिस्टंटशिपची पुढे मदत देखील होऊ शकते.
theusscholar@gmail. com