स्पर्धात्मक कार्यपद्धतीतकामाचा ताण हा अनिवार्यपणे येतोच. या ताणाशी सामना करत, स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून दिलेली कामे वेळेत आणि उत्तम प्रकारे पार पाडण्याचे कसब अंगी बाणवणे म्हणजेच कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करणे. कामाच्या ताणाचे स्वरूप हे प्रत्यक्ष काम किंवा कामाशी निगडित कार्यालयीन वातावरण आणि अन्य घटकांवरही अवलंबून असते. कामाच्या ताणाचे व्यवस्थापन कसे करता येईल, ते जाणून घेऊयात…कामाबद्दल अनभिज्ञता – प्रामुख्याने अननुभवी कर्मचाऱ्यांना, कामाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने कामाचा ताण जाणवू शकतो.

कार्यालयीन हुद्दा – कामाच्या ठिकाणी जोखमीच्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वपूर्ण निर्णय घ्याव्या लागणाऱ्या हुद्द्य़ांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या तणावाचा सामना करावा लागतो.

नोकरीची असुरक्षितता – वाढती स्पर्धा, बदलती आर्थिक धोरणे, राजकीय बदल, तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे नोकरीतील असुरक्षिततेचा तणाव कामाच्या ठिकाणी जाणवू शकतो.

क्षमतेपेक्षा अधिक काम – काही कारणांमुळे कर्मचाऱ्यावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक काम सोपवले तर त्याच्यावर कामाचा ताण येऊ शकतो.

कामाच्या ठिकाणी ताण आला तर,

● कामावर जाणे नकोसे वाटते किंवा कामावर जाण्याची अनामिक भीती वाटते.

● कामाच्या विचारांनी, घरात किंवा घराबाहेर चिडचिड होते, निराश वाटते, संताप अनावर होतो.

● कार्यालयात काम करताना मानसिक किंवा शारीरिक थकवा जाणवतो.

● डोकेदुखी, पचनाच्या, झोपेच्या तक्रारी जाणवतात.

● कार्यालयात काम करताना लक्ष एकाग्र होत नाही.

कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी, व्यक्तिमत्त्वात वैचारिक व इतर बदल होणे हिताचे असते..

क्षमता, कौशल्यांची वाढ – कमी वेळेत जास्त काम करण्याची क्षमता किंवा दिलेले काम जास्तीत जास्त अचूकतेने, वेळेत पूर्ण करण्याची क्षमता कर्मचाऱ्याने प्रयत्नपूर्वक जोपासली तर सरावाने कामाचा ताण कमी करणे शक्य होते.

संदर्भविषयांचा अभ्यास – कामाशी संदर्भात विषयातील वाचन, अभ्यास या गोष्टी कामातील रुची वाढवण्यास आणि कामाबद्दल आत्मविश्वास निर्माण करतात आणि पर्यायाने कामाचा ताण कमी होतो.

सकारात्मक विचार – सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीकडे प्रगतीची संधी या दृष्टिकोनातून पाहिल्यास कामाच्या ताणाशी सामना करणे सोपे होते.

छंदांची जोपासना – कामाव्यतिरिक्तच्या वेळात आपले वैयक्तिक छंद किंवा आवडीनिवडी जोपासाव्यात अथवा समवयस्क मित्रमैत्रिणी, कुटुंबीय यांच्यासोबत हा वेळ व्यतीत केल्याने मनाला विरंगुळा मिळतो.

व्यायाम – नियमित व्यायामाने शरीर आणि पर्यायाने मन:स्वास्थ्यही टिकून राहते. याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे कामाचा ताण सुस करण्यास, शरीराची आणि मनाचीही साथ मिळते. यासाठी खाण्यापिण्याच्या, झोपेच्या आरोग्यदायी सवयी जडवून घेणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळेचे व्यवस्थापन – स्वीकारलेल्या कामांना लागणारा वेळ आणि हातात असणारा वेळ याचे गणित मांडून कामाची आखणी केल्यास, कामाचा ताण कमी होऊ शकतो.