रोहिणी शहा

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील आर्थिक भूगोल, अवकाशीय तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन हे मुद्दे त्यांचे आर्थिक महत्त्व समजून घेऊन अभ्यासणे आयोगाला अपेक्षित असल्याचे दिसून येते. त्यामुळे या लेखामध्ये या घटकांच्या तयारीबाबत एकत्रित चर्चा करण्यात येत आहे.

आर्थिक भूगोल

या घटकातील आर्थिक व्यवसाय म्हणून शेती आणि मत्स्य व्यवसाय या मुद्दय़ांचा अभ्यास कृषी घटकाच्या तयारीमध्ये करणे व्यवहार्य ठरेल. त्याबाबत कृषी घटकाच्या लेखामध्ये पाहू. उर्वरीत मुद्दय़ांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल –
खनिजे व ऊर्जा साधने – यामध्ये महाराष्ट्रातील साधनसंपत्तीचाच समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात उत्पादन होणारी प्रमुख खनिजे व ऊर्जा साधने माहीत करून घ्यायला हवीत. खनिज/ ऊर्जा साधन, त्याचा महाराष्ट्रातील साठा, त्याचे देशातील एकूण साठय़ातील प्रमाण व क्रमांक, उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा आणि क्रमांक, त्याचे आर्थिक महत्त्व, त्यांचा विविध उपयोगातील वापर आणि आवश्यकता या मुद्दय़ांच्या आधारे तयारी करायला हवी.
खनिजांचे उत्खनन म्हणजे खाणींचे प्रकार, त्यांच्या पर्यावरणीय समस्या, त्यांतील कामगारांच्या समस्या, उत्पादकता हे मुद्देही बारकाईने अभ्यासायला हवेत.
वाहतूक : महाराष्ट्राच्या बाबतीत रस्ते, रेल्वे, सागरी व हवाई वाहतूक हे वाहतुकीचे प्रकार महत्त्वाचे आहेत. पण त्याच बरोबर देशातील अंतर्गत जलवाहतुकीचा आढावा घेणेही आवश्यक आहे.

या वाहतूक प्रकारांचा ब्रिटिश काळापासूनचा विकास समजून घ्यावा. या वाहतुकीच्या साधनांसाठी आवश्यक पायाभूत/ मूलभूत बाबी, अभ्यासायला हव्यात. वाहतूक प्रकारांचे उपप्रकार, त्यांचा विस्तार, त्यांचा वापर/ उपयोजन, विविध उद्योगांसाठीचे त्यांचे महत्त्व, प्रवासी वाहतुकीतील महत्त्व, त्यांच्या विकासासाठीचे केंद्र व राज्य स्तरावरील प्रकल्प/ योजना, संबंधित शासकीय अभिकरणे/ विभाग अशी विस्तृत माहिती असायला हवी. या मुद्यांच्या अद्ययावत आकडेवारीसाठी त्या त्या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालांचा संदर्भ घेता येईल.

पर्यटन

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा अभ्यास स्थान, वैशिष्टे, आर्थिक महत्त्व, वर्गीकरण, पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय आणि चालू घडामोडी या मुद्यांच्या आधारे करावा.
महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्यस्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती असावी. किल्लेही त्यांच्या ठळक इतिहासासह स्थान, प्रकार, वैशिष्टय़ अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने पाहावेत.
धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन, राखीव उद्याने इत्यादी संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.
पर्यटन क्षेत्रातील नव्या संकल्पना माहीत करून घ्यायला हव्यात.
केंद्र व राज्याच्या पर्यटनविषयक धोरणे व योजनांची अद्ययावत माहिती असायला हवी.
ज्ञानाधिष्ठीत आर्थिक व्यवसाय
या घटकाचा अभ्यास करताना इंग्रजी अभ्यासक्रमच बघायला हवा. इंग्रजी अभ्यासक्रमाचा मराठी अनुवाद करताना महाराष्ट्रातील आय टी पार्क्‍स हा समाविष्ट करायचा राहून गेला आहे.
इलेक्ट्रानिक व्यवसायांचे सर्वच प्रकार ज्ञानाधिष्ठीत नसले तरी त्यांचा विस्तृत अभ्यास करणे व्यवहार्य ठरेल. अभ्यास करताना त्यांचे प्रकार, या व्यवसायामध्ये समाविष्ट उत्पादने व सेवांचा आढावा घ्यावा. इलेक्ट्रानिक वस्तूंचे भारतातील उत्पादन, कच्च्या मालासाठी आयातीवरील अवलंबित्व, त्यांचा जीडीपी मधील व निर्यातीमधील वाटा, उत्पादनामध्ये अग्रेसर राज्ये, समस्या, कारणे, परिणाम व उपाय असे मुद्दे लक्षात घ्यावेत. या व्यवसायातील सेवांमध्ये बी.पी.ओ उद्योग, काही ज्ञानाधारीत स्टार्ट अप्स, त्यांची वैशिष्टय़े, भारतातील विस्तार, भारतातील तसेच देशातील वैशिष्टय़पूर्ण स्टार्ट अप्सची थोडक्यात माहिती असे मुद्दे विचारात घ्यावेत.

संगणक व जैव तंत्रज्ञान : CBT (Computer Technology and Bio Technilogy) हा मुद्दा त्याचे ज्ञानाधारीत स्वरूप लक्षात घेऊन अभ्यासायला हवा. यामध्ये या तंत्रज्ञानाच्या विकासाचा थोडक्यात आढावा, त्यांचे स्वरूप आणि प्रकार, त्यांचे विविध क्षेत्रामधील उपयोजन असे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.
इंग्रजी अभ्यासक्रमामध्ये संशोधन व विकास आणि राज्यातील अशा संस्था असे दोन वेगळे मुद्दे आहेत. मराठीमध्ये भारतातील संशोधन व विकास संस्थेची भूमिका असा वेगळाच मुद्दा समाविष्ट आहे. तशी या तिन्ही मुद्यांमध्ये linkआहेच व तयारीही सलगपणे करता येऊ शकते त्यामुळे तिन्ही मुद्दे अभ्यासणे व्यवहार्य ठरेल. संशोधन व विकासामध्ये कार्यरत भारतातील संस्थांचा आढावा नाव, बोधवाक्य, उद्देश, कार्यक्षेत्र, वाटचालीतील ठळक उपलब्धी, नियंत्रक/ नियामक यंत्रणा अशा मुद्यांच्या आधारे घ्यावा.
भूगोल व आकाश-अवकाशीय/ अंतराळ तंत्रज्ञान
आकाश व अवकाश संज्ञा, GIS, GPS आणि दूरसंवेदन यंत्रणा यांमधील तांत्रिक व संकल्पनात्मक मुद्दे समजून घ्यायला हवेत.
संरक्षण, बँकिंग व वाहतूक नियोजन, आरोग्य व शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये व अवकाश तंत्रज्ञान आणि टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचे महत्त्व समजून घ्यायला हवे.

अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेल्या व यापुढे होणाऱ्या अवकाश तंत्रज्ञानाधारीत प्रकल्प व मोहिमांचा तसेच विकसित अवकाशीय उपग्रह संपत्तीचा आढावा उद्देश, कालावधी, उपयोजन, उल्लेखनीय वैशिष्टय़े, विकास करणारी यंत्रणा, खर्च, यशापयश अशा मुद्दय़ांच्या आधारे घ्यावा.
करफड, ऊफऊड यांची संशोधन व विकासातील भूमिका समजून घेण्यासाठी त्यांचे स्थापनेपासूनचे ठळक कार्य, आव्हाने, यशापयश समजून घ्यावे.
अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा अभ्यासताना स्वरूप, कारणे, परिणाम व प्रतिबंधात्मक उपाय असे मुद्दे पहावेत. यामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूमिका समजून घ्यावी व याबाबतच्या चालू घडामोडींची माहिती असायला हवी.

रिमोट सेन्सिंग

रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे/ संकल्पना, डेटा व माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग फायदे व मर्यादा हे मुद्दे ढोबळ वाटत असले तरी त्यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
रिमोट सेन्सिंग व एरियल फोटोग्राफीमधील प्रक्रिया आणि त्यामध्ये समाविष्ट तांत्रिक मुद्दे व संकल्पना यांचा अभ्यास करताना संकल्पनेचे मूलभूत तत्व/ तंत्रज्ञान, त्यांमधील घटक, त्यांचे प्रकार व त्यांमधील तुलना, त्यांचा अपेक्षित प्रभाव/ परिणाम अणि त्यांचे उपयोजन/ अनुप्रयोग/ वापर असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग हा मुद्दा अभ्यासताना त्यामधील समाविष्ट सर्व तांत्रिक घटकांमागील मूलभूत तंत्रज्ञान, संबंधित घटकाचे असल्यास प्रकार, त्यामधील संज्ञा व संकल्पना, त्यांचे उपयोजन आणि दैनंदीन जीवनातील वापर असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएसचे कार्य अभ्यासताना त्या त्या क्षेत्रातील गरजा समजून घेऊन मग त्यांच्यासाठी जीआयएसच्या वापर कशा प्रकारे करण्यात येतो हे समजून घ्यावे.