राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेतील पर्यावरण घटकावर यापूर्वी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहून त्या आधारे या घटकाची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.
पर्यावरणीय पारिस्थितिकी (Environmental Ecology) या मुद्द्याच्या तयारीसाठी वैज्ञानिक तसेच भौगोलिक समज असणे आवश्यक आहे. परिसंस्थेचे जैविक व अजैविक घटक व त्यांची भूमिका, प्राणवायू, नायट्रोजन आणि कार्बन यांची जैव-भू-रासायनिक चक्रे, जल चक्र, अन्न साखळी, अन्न जाळे इत्यादीबाबत वैज्ञानिक समज पक्की करून घ्यावी लागेल.
अन्नसाखळीमधील प्रत्येक टप्प्यावरील सजीवांची वैशिष्ट्ये, प्रत्येक टप्प्यावर होणारे ऊर्जेचे हस्तांतरण, जैव विशालन या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. अन्न जाळे व त्याचे प्रकार आणि त्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील सजीव यांचा आढावा घ्यायला हवा. अन्नसाखळी आणि अन्न जाळे यात फरक करणारी उदाहरणे लक्षात घ्यायला हवी.
परिसंस्थेला असलेले धोके व त्यांच्या निवारणासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत.
जैवविविधता ही संकल्पना समजून घेऊन तिचे घटक, स्वरुप, वैशिष्ट्ये, महत्व समजून घ्यायला हवे. जैवविविधतेचे जतन व संवर्धनासाठी करण्यात येणारे प्रयत्ने व त्यासाठी कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था तसेच जैवविविधता संवर्धनासाठीच्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पध्दती यांची माहिती असायला हवी.
हवामान बदलाचा अभ्यास करताना जागतिक तापमान वाढ, जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणीय असंतुलन या महत्त्वाच्या मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करायला हवा.
जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे करावा.
जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्या. त्यांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषतः CO, CO2, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना
जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद्भवलेल्या समस्यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, आवश्यक उपाय योजना या मुद्यांच्या आधारे करावा. यामध्ये पर्यावरणीय आघाताचे मूल्यमपन (EIA) व कार्बन क्रेडिटस या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे. भारतातील नैसर्गिक आपत्तींचा कालानुक्रमे आढावा घेतल्यास फायद्याचे ठरेल.
पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
वायू, ध्वनी, पाणी, मृदा इत्यादी प्रकारची प्रदूषणे समजून घ्यावीत. या प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठीचे निकष, प्रदूषकांची मान्य मर्यादा/प्रमाण, धोकादायक पातळ्या यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करता येईल.
सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचे स्रोत आणि त्यांचे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी होणारे प्रयत्न यांचा आढावा घ्यायला हवा.
वायू प्रदूषणामध्ये हवेतील घटक वायूंचे, वाफेचे व सॉलिड पार्टिकल्सचे प्रमाण, त्यातील वाढ, त्यांचे स्रोत, त्यांच्या धोकादायक पातळ्या व त्यांबाबतचे निर्देशांक, अशा पातळ्या ओलांडलेली भारतातील प्रदूषित शहरे हे मुद्दे पहावेत.
जल प्रदूषणामध्ये प्रदूषकांचे प्रकार, त्यांच्यामुळे होणारे तोटे/परिणाम, त्यांचे स्रोत, औद्योगिक व कृषि क्षेत्रामुळे होणारे जल प्रदूषण, त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाय योजना हे मुद्दे पहावेत. यामध्ये युट्रोफिकेशन सारख्या संकल्पना समजून घ्यायला हव्यात.
मृदा प्रदूषणामध्ये शेतीची आदाने, औद्योगिक कचरा/सांडपाणी, मृदेची धूप अशा कारकांमुळे होणारे प्रदूषण व त्याच पिकांवर होणारे परीणाम समजून घ्यायला हवेत.
पर्यावरण संरक्षणाबाबत कायद्यांचा आढावा आघ्यायला हवा. यामध्ये महत्त्वाच्या व्याख्या, तांत्रिक मुद्दे, ठळक तरतूदी, शिक्षेच्या तरतूदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/ राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संस्था/ संघटना यांचा अभ्यास कार्यक्षेत्र, स्थापनेचे वर्ष, उद्देश, मुख्यालय, ब्रीदवाक्य, ठळक कार्ये, मिळालेले पुरस्कार, संघटनेकडून देण्यात येणारे पुरस्कार, सध्याचे अध्यक्ष, भारत सदस्य आहे किंवा कसे, असल्यास भारताची भूमिका या मुद्द्यांच्या आधारे करावा.
शाश्वत विकास ही संकल्पना समजून घेऊन त्यातील समाविष्ट घटक माहित करुन घ्यावेत.
वसुंधरा परिषदा आणि अजेंडा २१ यांचा थोडक्यात आढावा घ्यावा.
पर्यावरणाशी संबंधित शाश्वत विकास लक्ष्ये समजून घ्यावीत व त्याबाबत भारताकडून विहीत उद्दिष्टे समजून घ्यावीत. शक्यतो याबाबत सहस्रक विकास लक्ष्यांचाही तुलनात्मक आढावा घ्यावा.
भारताची शाश्वत विकास उद्दिष्टांबाबतची निर्धारित उद्दिष्टे व त्यातील कामगिरी माहीत असायला हवी.
हरित आणि नील अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि त्यांच्या विकासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत.
चालू घडामोडींमध्ये चर्चेतील प्रकल्पांना पर्यावरणाच्या आधारे होणारे विरोध, त्यातील मुद्दे यांची माहिती करून घ्यावी. पर्यावरणीय चळवळींच्या वाटचालीतील ठळक टप्पे माहीत असतील तर याबाबतच्या विश्लेषणात्मक प्रश्नांची चांगली तयारी होईल.