आयोगाने दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नचे विश्लेषण केले तर आकलन आणि अभिव्यक्ती क्षमता तपासण्यासाठी भाषा विषयांच्या पेपरची रचना केलेली आहे हे लक्षात येते.
आकलन विषयक प्रश्नांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये पाहिले. या लेखामध्ये अभिव्यती म्हणजे लेखनाच्या प्रश्नांच्या तयारीबाबत पाहू.
निबंध लेखन
प्रत्येकी ५० गुणांसाठी ३०० शब्दांचे दोन किंवा दिलेल्या चार पैकी एका विषयावर ६०० शब्दांचा निबंध अशा वेगवेगळ्या पद्धतीने निबंध लिहायला सांगण्यात येऊ शकते. १०० गुणांसाठी ६०० शब्द हे प्रमाण मात्र निश्चित आहे. शब्दमर्यादेपेक्षा खूप कमी वा जास्त शब्द वापरल्यास निबंधाचे गुण कमी केले जाऊ शकतात.
निबंधासाठीच्या विषयामध्ये निवड करण्याची संधी असो किंवा नसो तुमचा कम्फर्ट झोन असो वा नसो, जे विषय देण्यात आले आहेत त्या विषयांवर ३०० किंवा ६०० शब्दांचा आखीव-राखीव, मुद्देसूद निबंध लिहिण्याची क्षमता तुमच्या मध्ये असायला हवी. यासाठी दिले जाणारे विषयसुद्धा पारंपरिकपणे ‘मराठी पेपरचे’ निबंधाचे विषय असण्याची शक्यता नाही. आयोगाच्या स्वतंत्र निबंध पेपरमध्ये शोभतील तशा प्रकारचे हे विषय असू शकतात.
याचा अर्थ एखादा मुद्दा/समस्या /संकल्पना /स्टेटमेंट मधील निहीतार्थ लक्षात घेऊन त्याबाबत तुम्हाला बहुस्पर्शी विचार करता व मांडता येतो का हे आयोगाला निबंधातून तपासायचे आहे.
वैचारिक घडामोडींवर आधारित, कल्पनात्मक, चिंतनपर अशा प्रकृतीचे विषय आयोग निबंधासाठी देऊ शकतो. विषयाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक व इतर काही संबंधित पैलू विचारात घ्यावेत व त्यांचे व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य, राष्ट्र असे स्तर पाहावेत. सरळ वा मुद्यांचा Table करून त्यात सुचणारे मुद्दे भरावेत. यानंतर योग्य व समर्पक मुद्दे (साधारणपणे १० ते १२) निवडून त्यांचा क्रम ठरवून घ्यावा.
परिणामकारक सुरुवात करण्यासाठी सुविचार, कविता इ. चा वापर करता येईल. सुरुवातीनंतर ठरलेल्या क्रमाने थोडक्यात मुद्दे मांडावेत व एका Conclusion ने शेवट करावा. ‘ओघ’ ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा.
निबंध लेखनास Direct सुरुवात करू नये. कच्च्या पानावर आधी १० मिनिटे सुचतील ते मुद्दे मांडत राहावे. त्यानंतर पुढची ५ मिनिटे त्याचा क्रम, सुरुवात व शेवट ठरवण्यासाठी वापरावीत व पुढच्या १५-२० मिनिटांत प्रत्यक्ष लेखन करावे.
शब्दमयदिचे पालन व्हायलाच हवे. दिलेल्या शब्दमर्यादेपेक्षा १०% कमी-जास्त शब्द लिहीले तर चालतील पण त्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य घेता य्णार नाही. नाही तर त्याचा गुणांवर परीणाम होऊ शकतो.
संवाद लेखन
यामध्ये दोन व्यक्तींमधील वैयक्तिक पातळीवरचा संवाद, मुलाखत, गटचर्चा, परीसंवाद, पत्रकार परीषद अशा प्रकारच्या संवादांचे लेखन समाविष्ट होते. या प्रश्नाचे गुण अणि दिलेली २० वाक्यांची मर्यादा पहाता गटचर्चा, पत्रकार परिषद किंवा परिसंवाद लेखनासाठी ही शब्दमर्यादा कमी पडेल.
नागरी सेवा मुख्य परिक्षेची प्रश्नपत्रिका पाहता यामध्ये केवळ ‘संवाद लिहा’ इतकेच प्रश्नामध्ये नमूद आहे आणि संवादासाठी दिलेले विषय सहजसोपे, सरळसोट असेच आहेत. त्यामुळे दोन वा तीन व्यक्तींमधील संवाद आणि दिलेल्या विषयाच्या जास्तीत जास्त मुद्यांचा या लेखनामध्ये समावेश झाला पाहिजे.
संवादाचा ओघ राहील अशा प्रकारे लेखन करणे आवश्यक आहे.
संवाद हा सगळ्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन गृहीत धरून रंगवलेल्या चर्चेच्या स्वरूपात असावा. चर्चेला ओघ देण्यासाठी एकाच्या मुद्यातून पुढच्याचा मुद्दा evolve करत जावा. ही चर्चा एका Conclusion वर यायला हवी.
प्रत्येकी सुमारे १२-१५ शब्दांची २० वाक्ये म्हणजे २०० ते २५० शब्दांच्या मर्यादेत हे लेखन झाले पाहिजे.
कल्पना विस्तार
नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पेपरमध्ये प्रत्येकी ५ गुणांसाठी १०-१० वाक्यांमध्ये दोन कल्पनांचा विस्तार करायचा असतो. राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्येही साधारणपणे अशाच प्रकारे प्रश्न असेल हे समजून घेऊन तयारी करायला हवी.
कल्पनाविस्तार म्हणजे निबंधानंतर अभिव्यक्तीसाठीची पुढची मोठी संधी असते. यामध्ये अलंकार, म्हणी यांचा वापर शक्य आहे. या लेखनामध्ये आपला शब्दसंग्रह सुरेखपणे प्रदर्शित करता येतो. त्या दृष्टीने या प्रश्नांची तयारी करायला हवी.
कल्पनाविस्तारासाठी सहजसोपे असे सुविचार दिलेले दिसतात. अशा प्रकारच्या सुविचारांचा संग्रह, म्हणी वाक्प्रचारांचा संग्रह कुठेही उपलब्ध होतात. रोज तीन चार सुविचारांचे कल्पनाविस्तार लेखन करायचा सराव करत राहिले तर त्याचा निबंध आणि इतर लेखनासाठीही फायदा होऊ शकतो.
याव्यतिरिक्त नागरी सेवा परिक्षेमध्ये परीपाठ आणि शब्दसंग्रहाच्या प्रश्नांत म्हणी व वाक्प्रचारांचा प्रश्नांमध्ये सहजपणे २० गुण मिळवता येतील. म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा प्रिंट आऊट सोबत बाळगावे. त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचुन त्यांचा अर्थ समजून घ्यावा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे सोपे होते. समानार्थी / विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या हस्व दिर्घ वेलांटी/ उकारांमधील बदलामुळे तसेच काना/मात्रा/वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा, पाणि(हात) पाणी(जल), इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे/स्पेलिंगचे पण वेगळे अर्थ असणारे शब्द ट्रिकी ठरतात. उदा. Expect आणि except या शब्दामध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
