आकाशात उडणारे ड्रोन हा मानवी कुतूहलाचा विषय. रिमोटने त्यांच्यावर जमिनीवरून एक ऑपरेटर नियंत्रण ठेवतो, असाच आपला समज असतो. पण निखिल राजपूत आणि निलेश पालकर या दोन नाशिककर मित्रांनी एका शहरात बसून दुसऱ्या कोणत्याही शहरात ड्रोन उडवण्याचे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदा आणले, ‘नेक्स्टक्यूब’ असे त्यांच्या स्टार्टअपचे नाव असून या ‘ड्रोन डॉकिंग स्टेशन’ विषयी कंपनीचे सहसंस्थापक आणि चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर निलेश पालकर यांनी दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत…
आम्ही दोघेही नाशिकच्या एनडीएमव्हीपी कॉलेजचे विद्यार्थी. आम्ही २०१८ मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना आम्ही रेसिंग कार बनवायचो. आमची दहा ते बारा जणांची टीम होती. तिथूनच याबद्दलची आवड निर्माण झाली. नंतर मी पीडीआरएल या ड्रोनआधारित स्टार्टअपमध्ये नोकरी करत होतो. त्यांच्यासोबत संस्थापक सदस्य म्हणूनच मी काम सुरू केलं. आम्ही तिथे ऑटोनॉमस एअर टॅक्सीवर काम करत होतो. दीड वर्षानंतर मी ती कंपनी सोडली. त्या कंपनीत काम करत असतानाच मला आमच्या स्टार्टअपची कल्पना सुचली. निखिलही तेव्हा एका युकेच्या कंपनीत प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून काम करत होता. त्याला कॉर्पोरेटचा अनुभव होता, मला स्टार्टअपचा अनुभव मिळाला. या दोहोंचा मेळ साधला आणि आमचे स्टार्टअप सुरू झाले.
ड्रोनच्या ‘मर्यादे’त संधी
ड्रोनने मानवी मर्यादांपलिकडील अनेक असाध्य गोष्टी साध्य होताना दिसत असल्या तरी एक पायलट आणि एक ड्रोन हीदेखील या तंत्रज्ञानाची मर्यादाच आहे. एका ड्रोनच्या मागे त्या ड्रोन पायलटचा वेळ जातो, त्याला प्रत्यक्ष साईटवर पाठवावे लागते. पर्यायाने सिस्टीमचा खर्चही वाढतो. शिवाय देखरेखीसाठी ड्रोन वापरायचा असेल तर २४ तास तेथे पायलट तैनात ठेवावा लागतो. ही समस्या आम्ही हेरली.
नाशिकमध्ये टीसीएस फाऊंडेशनचे ‘डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर’ हे इनक्युबेशन आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही आमचा पुढील प्रवास सुरू केला. संशोधन सुरू केले, अनेक ड्रोन ऑपरेटर्सशी, ड्रोन पायलटशी बोललो. एक ड्रोन, एक पायलट ही खरेच समस्या आहे का यावर आम्ही संशोधन केले. त्यानंतरच आम्ही आमच्या उत्पादनावर प्रत्यक्ष काम सुरू केले. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर काम केले. सुरुवातीला टीसीएसकडून नंतर बंगळुरूच्या सोशल अल्फा या इन्क्युबेटरकडून आम्हाला २० लाखांचा निधी मिळाला. त्यानंतर आयआयएससी बंगळुरूने देखील गुंतवणूक केली. २०१९ पासून आम्ही या संकल्पनेवर काम करत होतो. ती प्रत्यक्ष साकार करण्यासाठी २०२१ मध्ये आम्ही नोकऱ्या सोडल्या. सुरुवातीला आम्ही आमच्या बचतीच्या पैशातूनच खर्च केला.
डॉकिंग स्टेशनच्या माध्यमातून उपाय
या समस्येवर आम्ही डॉकिंग स्टेशनच्या माध्यमातून उपाय शोधला. ज्या ठिकाणी ड्रोन उडवायचे आहेत, त्या ठिकाणी आम्ही हे ड्रोन डॉकिंग स्टेशन उभारतो. तुम्ही तुमच्या कार्यालयात बसून मुंबई, पुणे, बंगळुरू जेथे हे डॉकिंग स्टेशन आहेत, तेथे ड्रोन ऑपरेट करू शकतात. तेथे प्रत्यक्ष कोणताही ऑपेरटर लागत नाही. आपल्याला हवा तिथे ड्रोन पाठवून सर्व डेटा लाइव्ह मॉनिटर करू शकतो. यासाठी केवळ आपल्याला दोन्ही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी हवी. डॉकिंग स्टेशन जिथे असेल तेथून साधारण पाच किलोमीटरच्या रेडिअसमध्ये कुठेही आपण ड्रोन उडवू शकतो.
‘नेक्स्टक्यूब’ ही कंपनी सुरू करून दोन वर्षे झाली. निखिल राजपूत कंपनीचे संस्थापक आणि सीईओ तर मी सहसंस्थापक आणि सीटीओ आहे. सुरुवातीला आम्ही दोघेच टीममध्ये होतो. आता ३० जण आमच्यासोबत काम करतात. आमचे एक वेब अॅप्लिकेशन आहे. त्या वेब अॅप्लिकेशन वर जाऊन तुम्ही ड्रोन निवडून तो उडवू शकता. डॉकिंग स्टेशनमुळे एक पायलट ऑफिसमध्ये बसून १०० ड्रोन उडवू शकतो. पूर्वी एक पायलट फिल्डवर ड्रोनमार्फत मिळणारा डेटा एकत्र करून ऑफलाइन पद्धतीने देत होता. त्याऐवजी आता ऑफिसमधला पायलट बसल्या जागी, त्या शेकडो किलोमीटर दूर डॉकिंग स्टेशनजवळच्या ड्रोनने मिळवलेला डेटा एकत्र करून देऊ शकतो. त्यात मानवी चुकाही कमी होतात.
दहा मोठ्या उद्याोग समूहांना सेवा
आम्ही सुरुवात केली तेव्हा जगभरात दोन ते तीन कंपन्या या संकल्पनेवर काम करत होत्या. आता भारतात तरी नेक्स्टक्यूब ही या पद्धतीचं काम करणारी एकमेव कंपनी आहे. खाणकामांच्या ठिकाणी, सौर ऊर्जा प्रकल्पांना, बांधकामांच्या ठिकाणी अशा दहा मोठ्या उद्याोग समूहांना आमची कंपनी सेवा देते. आता जगभरात साधारण १७ कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. यापैकी ७ ते ८ कंपनीकंडे हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापराच्या पातळीवर तयार आहे, त्यापैकी एक आमची कंपनी आहे. एरिअल रोबोटिक्स, आयओटी आणि एआय ऑन एज या तीन तंत्रज्ञानाच्या आधारे आम्ही हे डॉकिंग स्टेशनचे काम करतो. देशभरात १० ठिकाणी आमचे डॉकिंग स्टेशन्स आहेत. या दूरवरच्या डॉकिंग स्टेशन्सवर एखादी तांत्रकि समस्या उद्भवली तर तीही रिमोटने दूर करता येते. या रिमोट डायग्नॉस्टिक्ससारख्या (एखादी समस्या रिमोटली दूर करणे) तंत्राच्या पेटंटसाठी आम्ही अर्ज केला आहे. त्याची प्रक्रयिा सुरू आहे.
किंमत, वेळ आणि सुरक्षितता
मोठमोठ्या गोदामांमध्ये अनेक मीटर उंच रॅक्समध्ये वस्तू ठेवलेल्या असतात. कर्मचाऱ्यांना तितक्या उंचावर जाऊन वस्तू हाताळाव्या लागतात. यासाठी आम्ही ड्रोन फ्लाय करून उंचावरील छायाचित्रे काढून देतो. आमच्या ऑपरेटरला रिमोटली हे करण्यासाठी केवळ अर्धा तास लागतो. ती छायाचित्रे आम्ही सॉफ्टवेअरवर अपलोड करतो, त्यावरून कुठे काय ठेवलं ते दिसतं आणि ग्राहकांचा वेळ वाचतो. स्पेशल पर्पज व्हेइकलचं महिन्याचं भाडं ९० हजार रुपये असतं. ड्रोनमुळे तुम्ही महिना २० हजार रुपयांत तेच काम करून घेऊ शकता. किंमत, वेळ आणि सुरक्षितता या तिन्ही गोष्टी यामुळे साध्य होतात.
खाणकामातही अशा पद्धतीने सुरक्षितपणे ड्रोन काम करतो. उदाहरणार्थ, खाणीत स्फोट घडवायचा असेल तर तिथे आसपास कोणीही व्यक्ती नाही याची खातरजमा करावी लागते. ते काम ड्रोनमार्फत आम्ही रिमोटली करून देऊ शकतो. माणूस, गाडी कोणतीही हालचाल दिसल्यास एआय ऑन एज तंत्रतज्ञानाद्वारे ते ड्रोन अचूक हेरतो.
गोदामांमध्ये सुरक्षिततेसाठी, डिलिव्हरीसाठी येत्या किमान पाच-सात वर्षांतच ड्रोन सुविधा पाहायला मिळू शकते. आता जसे चार्जिंग नेटवर्क आहे ईव्ही गाड्यांसाठी तसे ड्रोन डॉकिंग स्टेशन मिळू शकतील.
संरक्षण क्षेत्रातील सज्जता
अलिकडेच भारत-पाकिस्तान संघर्षात आपण ड्रोन हल्ल्यांचे शत्रू देशाकडून झालेले प्रयत्न पाहिले. त्यांच्या सुमारे एक लाखाच्या ड्रोनला इंटरसेप्ट करण्यासाठी आपण ७-८ लाखांचे क्षेपणास्त्र वापरले. ही ग्राऊंड टू एअर ऑटोमेटेड सिस्टीम महागडी आहे. भविष्यात त्यातही बदल होतील. विशेष म्हणजे आम्हीही हवाई दलाला देखील आमच्या कंपनीचे सादरीकरण केले आहे.
(शब्दांकन : मनीषा देवणे)