success story of Deepesh Kumari : यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्यामुळे या परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी आणि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगले गुण मिळवण्यासाठी सुद्धा मनाची तयारी करावी लागते. तर आज आपण अशाच एका तरुणीचा प्रवास जाणून घेणार आहोत.

राजस्थानच्या भरतपूर येथील रहिवासी दीपेश कुमारी ही गोविंद नावाच्या एका चाट विक्रेत्याची मुलगी आहे. तिचे वडील गोविंद गेल्या २६ वर्षांपासून चाटचे दुकान चालवत आहेत. गोविंद पत्नी, तीन मुले आणि दोन मुलींसह एका छोट्या घरात राहतात. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी असणाऱ्या दीपेश कुमारीने अनेक अडचणींना तोंड देत तिचे शिक्षण पूर्ण केले. दीपेश कुमारीने भरतपूरमध्ये बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर जोधपूरच्या एमबीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिलमध्ये बॅचलर पदवी मिळवली, त्यानंतर आयआयटी एम. मधून एम.टेक पदवी मिळवली.

त्यानंतर, दीपेश कुमारीने एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम केले आणि नंतर सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले. तसेच तिच्या भावंडांनी सुद्धा तिच्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षणाचा मार्ग अवलंबला. धाकटी बहीण दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टर बनली तर दोन भावांनी लातूर आणि गुवाहाटी येथील एम्समधून एमबीबीएस केले.

२०१९ मध्ये दीपेश कुमारीने तिचा यूपीएससी प्रवास सुरू केला. सुरुवातीला ती एका कोचिंग सेंटरची मदत घेतली. पण करोना साथीच्या आजारामुळे तिला घरी घरी परत यावे लागले. २०२१ मध्ये तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले. कारण तिने प्रभावी ऑल इंडिया रँक (एआयआर) ९३ मिळवून परीक्षा उत्तीर्ण केली. दीपेश कुमारीने तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्याला विशेषतः तिच्या आईला दिले आहे; जिने तिला कठीण प्रवासात सांत्वन आणि प्रोत्साहन दिले.