scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : भारतातील स्थलांतराचे स्वरूप आणि प्रकार कोणते?

या लेखातून आपण भारतातील स्थलांतराचे स्वरूप आणि त्याच्या प्रकरांविषयी जाणून घेऊया.

Migration In India
भारतातील स्थलांतराचे स्वरूप आणि प्रकार कोणते? ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारतातील लोकसंख्येबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील स्थलांतराचे स्वरूप आणि त्याच्या प्रकरांविषयी जाणून घेऊया. स्थलांतर हा लोकसंख्येच्या स्थानिक गतिशीलतेचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये एक भौगोलिक एकक आणि कायमस्वरूपी निवास बदल समाविष्ट असतो. स्थलांतर हे सांस्कृतिक प्रसार आणि सामाजिक एकीकरणाचे साधन आहे, ज्यामुळे लोकसंख्येचे अधिक अर्थपूर्ण पुनर्वितरण होते.

loksatta analysis ai based system to reduce human wildlife conflict in tadoba andhari tiger reserve
विश्लेषण : ताडोबातील वन्यजीवमानव संघर्षात ‘एआय’ नेमके काय करणार?
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..
farming types
UPSC-MPSC : भारतात कोणत्या आधारावर शेतीचे प्रकार पाडण्यात आले?
Loksatta kutuhal State of Artificial Intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवस्था

भारतातील जनगणनेद्वारे जन्मस्थान किंवा निवासस्थानानुसार स्थलांतर निश्चित केले जाते. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म गणनेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी झाला असेल, तर त्याला स्थलांतरित मानले जाते. लोकसंख्येतील बदलाच्या तीन घटकांपैकी स्थलांतराला जास्त महत्त्व आहे. इतर दोन घटक म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर हे आहेत. लोकसंख्या बदलाच्या तीन घटकांपैकी स्थलांतराचे मोजमाप करणे सर्वात कठीण आहे, कारण यात उत्पत्तीच्या ठिकाणापासून गंतव्यस्थानापर्यंतचा बदल समाविष्ट असतो.

भारताचे स्थलांतर आणि जनगणना

जनगणनेच्या डेटामध्ये स्थलांतराची माहितीदेखील असते. खरेतर १८८१ मध्ये पहिल्या भारतीय जनगणनेच्या वेळी स्थलांतर डेटाची नोंद करण्यात आली होती. ती जन्मस्थानावर आधारित होती. १९६१ मध्ये जन्मस्थान आणि राहण्याचा कालावधी (अन्यत्र जन्माला आल्यास) समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली. १९७१ मध्ये अंतिम निवासस्थानाची अतिरिक्त माहिती आणि गणनेच्या ठिकाणी राहण्याचा कालावधी समाविष्ट करण्यात आला. स्थलांतराच्या कारणांची माहिती १९८१ च्या जनगणनेमध्ये समाविष्ट करण्यात आली.

स्थलांतराचे प्रकार :

स्थलांतराचे आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत वर्गीकरण केले जाऊ शकते. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि अंतर्गत स्थलांतर या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला आहे.

१) आंतरराष्ट्रीय स्थलांतर (International Migration) : आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून एका देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्या लोकांच्या हालचालींना आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणतात. आंतरराष्ट्रीय स्थलांतर दोन प्रकारचे असते. उदा. इतर देशांत भारतीयांचे स्थलांतर आणि इतर देशांतून परकीयांचे भारतात स्थलांतर.

१) बाहेर देशात होणारे स्थलांतर (Out-migration) : भारतीयांच्या इतर देशांमध्ये स्थलांतराचा इतिहास मोठा आहे. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत, बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि भारतीय कला आणि संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी अनेक धर्मोपदेशकांनी आग्नेय आशियाई (South-east Asian countries) देशांमध्ये प्रवास केला. १९ व्या शतकात अनेक भारतीयांनी मॉरिशस, बर्मा (म्यानमार), श्रीलंका, मलेशिया, फिजी, गयाना, सुरीनाम, त्रिनिदाद, दक्षिण आफ्रिका आणि पूर्व आफ्रिका येथे मजूर म्हणून स्थलांतर केले आणि तेथे कायमचे स्थायिक झाले.

भारतीय मजुरांचा पहिला गट १८१५ मध्ये ऊसाच्या शेतात काम करण्यासाठी कोलकाता (कलकत्ता) येथून नेण्यात आला. १९३४ नंतर मॉरिशसच्या सौम्य सागरी हवामानामुळे मोठ्या संख्येने कामगार आकर्षित झाले. सध्या मॉरिशसच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे तीन-चतुर्थांश लोकसंख्या भारतीय लोकांची आहे. मॉरिशसजवळील रियुनियन बेटे येथे सुमारे ८,००० भारतीयांची मोठी वसाहत आहे.

भारतीयांनी मोठ्या संख्येने वेस्ट इंडिजमध्येही स्थलांतर केले. १९४७ मध्ये भारतीय उपखंडाच्या विभाजनामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे भारतातून पाकिस्तान आणि बांगलादेशात स्थलांतर झाले. जगाच्या इतिहासातील मानवाच्या सर्वात मोठ्या हालचालींपैकी एक म्हणून हे स्थलांतर ओळखले जाते. यावेळी सुमारे १४.५ दशलक्ष लोक स्थलांतरित झाले. जगातील २०८ वेगवेगळ्या देशांमध्ये सुमारे ३० दशलक्ष भारतीय स्थलांतरित झालेले आहेत. या लोकसंख्येपैकी ३० टक्के उत्तर अमेरिका आणि युरोपमधील प्रगत देशांमध्ये राहतात.

२) परदेशातून भारतात होणारे स्थलांतर (In -migration) : भारताच्या आजच्या लोकसंख्येमध्ये जगाच्या विविध भागांतून स्थलांतरित झालेल्या लोकांच्या वंशजांचा समावेश आहे. यामध्ये द्रविड, आर्य, मुस्लीम, मुघल, युरोपियन इत्यादींचा समावेश आहे. भारतातील बहुतेक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित आशियाई देशांतील आहेत. त्यानंतर युरोपियन, आफ्रिकन, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन आहेत. भारतातील सर्वाधिक स्थलांतर पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या शेजारील देशांमधून झाले आहे. शेजारील देशांतून प्रामुख्याने बांगलादेश आणि नेपाळमधून भारतात आलेले बहुतेक स्थलांतरित आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्रित आहेत.

आसाममध्ये नेपाळी लोकांपेक्षा बांगलादेशी जास्त आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये अधिक नेपाळी आहेत. परदेशी नागरिक पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, गुजरात, गोवा आणि केरळमध्येसुद्धा स्थायिक झाले आहेत. २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार पाच दशलक्षाहून अधिक लोक इतर देशांमधून भारतात स्थलांतरित झाले आहेत. यापैकी ९६ टक्के शेजारील देशांमधून आले आहेत. बांगलादेश (३ दशलक्ष), त्यानंतर पाकिस्तान (०.९ दशलक्ष) आणि नेपाळ (०.५ दशलक्ष). यामध्ये तिबेट, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराण आणि म्यानमारमधील ०.१६ दशलक्ष निर्वासितांचा समावेश आहे.

भारतात निर्वासितांचा ऐतिहासिक ओघ :

भारताने १९५१ च्या निर्वासित करारावर स्वाक्षरी केलेली नसली तरीही गेल्या सहा दशकांपासून भारत हे निर्वासितांचे मुख्य ठिकाण आहे आणि तिबेट (चीन), अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश म्यानमार या शेजारील देशांमधून निर्वासितांची संख्या वाढली आहे. २०११ मध्ये भारतात तीन लाखांहून अधिक निर्वासित होते आणि भारत जगातील शीर्ष २५ निर्वासित प्राप्तकर्त्यांपैकी एक बनला आहे.

१) तिबेटी (Tibetans) : दलाई लामा यांना १९५९ मध्ये धर्मशाला (हिमाचल प्रदेश) येथे निर्वासित सरकार स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे तिबेटी निर्वासितांची लाट आली आणि सध्या भारतात सुमारे एक लाख १० हजार तिबेटी आहेत. त्यापैकी ८० हजार लोकांकडे रहिवासी परवाने आहेत आणि त्यांना भारत सरकारने कमी पगाराच्या सार्वजनिक कामाच्या नोकऱ्या दिल्या आहेत.

२) अफगाण (Afgans ) : १९७९ मध्ये सोव्हिएत युनियनने या अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यावर सुमारे ६० हजार अफगाण लोक भारतात पळून आले. १९९२ मध्ये आणि त्यानंतर, तालिबानने तिथे सत्ता काबीज केली, तेव्हा हजारो अफगाणिस्तानींनी भारतात आश्रय घेतला. २००७ मध्ये, UNHCR ने भारतात ९,२०० अफगाण आणि चार हजार आश्रय शोधणारे निर्वासित प्रमाणीकरण प्रक्रियेत असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

३) श्रीलंका (Shrilankan) : १९८३ मध्ये गृहयुद्धामुळे श्रीलंकेतील तामिळ निर्वासितांची पहिली लाट भारतात आली. १९९५ पर्यंत भारत आणि UNHCR ने युद्ध संपल्यानंतर एक लाख तमिळ श्रीलंकन लोकांना परत पाठवले. २००८ मध्ये ७३ हजार श्रीलंकन निर्वासित ११७ शिबिरांमध्ये मुख्यतः तामिळनाडूमध्ये राहत होते.

४) म्यानमार (Myanmar ) : लष्करी दडपशाहीमुळे २००४ मध्ये म्यानमारमधून ५० हजार लोकांनी मिझोराममध्ये पलायन केले. २०१७ मध्ये म्यानमारमधून सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लीम बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले.

५) बांगलादेशी : १९८८ मध्ये सुमारे ५० हजार चकमा निर्वासित बांगलादेशातून त्रिपुरामध्ये आले. डिसेंबर २००८ पर्यंत भारतीय धोरण निर्वासितांकडून निवास परवान्यासाठी “व्हिसा किंवा दंड शुल्क” आकारत नव्हते, म्हणून निर्वासित लाट येण्याचे हे एक प्रमुख कारण होते. सध्या भारतात निर्वासित लोक येतच आहेत. निर्वासितांची संख्या कमी करण्यासाठी भारत सरकार धोरणे राबवत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc indian geography what is migration its nature and types in india mpup spb

First published on: 09-12-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×