मागील लेखात आपण बॅडमिंटन,टेनिस आणि टेबल टेनिस या खेळांबद्द्ल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिलं. आज आपण भारतात अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट या खेळाबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहणार आहोत.
नागरी सेवा परीक्षा २०२५ च्या पूर्व परीक्षेचा निकाल अलीकडेच लागला. काही उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली असेल आणि बऱ्याच उमेदवारांच्या पदरी निराशा आली असेल. स्पर्धा परीक्षेचं स्वरूप हे असंच असतं . चढाओढीसारखं. थोडेच उमेदवार पुढे जाणार आणि बरेचसे मागेच राहणार. यावर्षी मुख्य परीक्षा ऑगस्ट महिन्यातच सुरू होत आहे. त्यामुळे उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी खूपच कमी वेळ मिळणार आहे. नागरी सेवा परीक्षा आव्हानात्मक असण्याची अनेक कारणं आहेत. यावर्षी मुख्य परीक्षा लवकर घेतली जाणार म्हणजे उमेदवारांनी आधीपासून अभ्यासाचं जे नियोजन केलं असेल ते त्यांना बदलावं लागणार. अचानक समोर आलेल्या बदलांचा सामना आपण किती प्रभावी पद्धतीने करू शकतो यावर आपलं यशही अवलंबून असतं. अशा आव्हानांचा सामना करत करतच उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व घडत जातं .
११ जून रोजी यूपीएससीने सीएपीएफ असिस्टंट कमांडंट या पदासाठीच्या २०२४ च्या परीक्षेचा निकाल घोषित केला. ४५९ यशवंत उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील ४० हून अधिक उमेदवार निवडून आले. त्या सर्वांचे अभिनंदन. १५० गुणांच्या मुलाखती साठी आम्ही मार्गदर्शन केलेल्या ६६ यशस्वी उमेदवारांमध्ये रँक २ श्याम यादव, रँक ५ श्रेयस , रँक १३ कुलदीप बिष्णोई आणि रँक २० धुळ्याचा अनिकेत त्रिभुवन यांचा पहिल्या २० च्या यादीत समावेश आहे. CRPF, BSF, CISF, ITBP, SSB या दलांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चांगलं काम करण्याची संधी मिळते आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक पदापर्यंत पदोन्नती अपेक्षित असते.
सध्या आपण डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीवर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहतो आहोत. मागील लेखात आपण बॅडमिंटन,टेनिस आणि टेबल टेनिस या खेळांबद्द्ल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिलं. आज आपण भारतात अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट या खेळाबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहणार आहोत. क्रिकेटबद्दल खूप उलटसुलट प्रश्न विचारले जाऊ शकतात . त्यामुळे जर उमेदवाराच्या डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये क्रिकेट खेळत असल्याचा किंवा क्रिकेट पाहण्याची आवड असल्याचा उल्लेख असेल तर उमेदवाराने क्रिकेट या विषयाची सर्वांगाने तयारी केली पाहिजे.
क्रिकेट हा खेळ भारतात इतका लोकप्रिय का आहे? जगभरातले फार थोड्या देशांमधले लोक क्रिकेट खेळतात तरी हा खेळ आपल्या देशात इतका लोकप्रिय का आहे? हॉकी आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ मग क्रिकेटला हॉकीच्या तुलनेत आपल्या देशात अवास्तव महत्त्व दिलं जात असं तुम्हाला वाटत का? क्रिकेटला महत्त्व असल्यामुळे आणि या खेळामध्ये खूप पैसे येत असल्यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष होतं असं तुम्हाला वाटतं का? क्रिकेटमध्ये सर्रास मॅच फिक्सिंग चालतं , आयपीएलमध्ये तर प्रत्येक बॉलवरचा खेळ ठरलेला असतो, क्रिकेट बेटिंग कायदेशीर करावे का, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमुळे टेस्ट मॅच किंवा एक दिवसीय मॅचचा जमाना संपला असं तुम्हाला वाटतं का? टेस्ट क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी कोणती पावले उचलावीत?
उमेदवार स्वतः क्रिकेट खेळणारा असेल तर त्याला तुम्ही गोलंदाज आहेत की फलंदाज आहात असा प्राथमिक प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाने संभाषणाची सुरुवात होऊ शकते. त्यानंतर जर गोलंदाज असेल तर फिरकी गोलंदाज आहात की जलदगती गोलंदाज आहात, गोलंदाजीमध्ये भारतात वेगवान गोलंदाजांची संख्या कमी आहे आणि ते लवकर या खेळातून बाहेर पडतात असे तुम्हाला वाटते का? गोलंदाजीमध्ये यॉर्कर म्हणजे काय? फिरकी गोलंदाजांनी भारताला आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये नाव लौकिक मिळवून दिले का? असे प्रश्न विचारतात. तुम्ही फलंदाज असाल तर कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायला जाता? फलंदाज किती प्रकारे बाद घोषित केला जातो? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादा उमेदवार जर विकेट किपर असेल तर त्याला विकेट किपींग मध्ये काय आव्हानं असतात हे विचारलं जाऊ शकतं. आवडता गोलंदाज, आवडता फलंदाज, आवडती टीम, आवडता कॅप्टन या बरोबरच क्रिकेट खेळात DRS आणि DLF म्हणजे काय? तिसऱ्या आणि चौथ्या अंपायरचे नेमके काम काय? तिसरा, चौथा अंपायर असताना क्रिकेट मैदानावर दोन अंपायरची गरज का आहे? Mankeding म्हणजे काय? महिला क्रिकेट तुम्ही पाहता का आणि ५ महिला क्रिकेट खेळाडूंची नावं सांगा? क्रिकेटचा बॉल आणि बॅट कशी तयार करतात? महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन कप्तानांच्या कामगिरीची तुलना करा? क्रिकेट च्या मैदानावर खेळाडूच्या पोझिशनबद्दल माहिती द्या? आयपीएलच्या सामन्यामुळे भारतात दुर्लक्षित क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली का? आयपीएल सामन्यात क्रिकेटचे कोणते नवीन नियम लागू केले आहेत? इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे काय? या बद्दलही प्रश्न विचारले जाऊ शकतात.
क्रिकेट आणि क्रीडा धोरण यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ क्रिकेट व्यतिरिक्तच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल? क्रिकेटमध्ये जे गैरप्रकार होत असतात ते रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्ही धोरणकर्ते म्हणून कसा विचार करू शकता हे आजमावण्यासाठी विचारले जाऊ शकतात.
इतर काही खेळांबद्दलच्या प्रश्नांबद्दल पुढच्या लेखात सविस्तर माहिती घेऊ.