Dance Forms In India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) राजस्थानात सापडलेली हडप्पाकालीन औद्योगिक वसाहत

सिंधू संस्कृतीचा व्यापार आणि त्या अनुषंगाने येणारी आर्थिक सुबत्ता याची साक्ष देणारे पुरावे पुरातत्त्वीय उत्खननादरम्यान राजस्थानच्या बिंजोर या ठिकाणी सापडले आहेत.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती या घटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या उत्खननात नेमकं काय उघडकीस आले आहे. याविषयी माहिती असणे आवश्यक आहे

तुमच्या माहितीसाठी :

आज भारतात सिंधू संस्कृतीच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकणारी अनेक पुरातत्वीय स्थळं आहेत. परंतु उत्पादन आणि कारागिरीला वाहिलेली पूर्ण वसाहत दुर्मीळ आहे. हडप्पा, मोहेंजोदारो, राखीगढी, धोलावीरा या स्थळांवर असलेल्या हस्तकला केंद्रांच्या मदतीने ‘ट्रेड मॅट्रिक्स’चा कणा समजून घेण्यात मदत झाली आहे. तर बिंजोरसारख्या पुरातत्त्वीय स्थळांवर झालेल्या उत्खननामुळे तत्कालीन औद्योगिक उत्पादनाविषयी जाणून घेण्यास मदत होते. तरखानवाला डेरा आणि बरोरच्या अगदी जवळ बिंजोर या स्थळावर कारागिरांचे गाव सापडले आहे. या गावाने धातूशास्त्रज्ञ आणि कारागीर यांच्या तत्कालीन जीवनाचे दर्शनच घडविण्याचे काम केले आहे.

बिंजोर हे ठिकाण राजस्थानमध्ये असून श्री गंगानगर जिल्ह्यातील अनुपगढ तालुक्यातील घग्गर- हाकरा नदीला विभाजित करणाऱ्या भारत-पाकिस्तान सीमेपासून सुमारे ४ किमी अंतरावर वसलेले आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याचे संचालक (१९५३-६८) आणि प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक ए. घोष यांनी १९५०-५२ साली राजस्थानमध्ये झालेल्या सर्वेक्षणात या स्थळाचा शोध लावला होता. त्यांनी त्यांच्या नोंदीत एकूण चार पुरातत्त्वीय टेकाडांचा उल्लेख केला होता. घोष यांच्यानंतर केटी दलाल यांनी बिंजोर ३ येथे प्राथमिक सर्वेक्षणासाठी ‘ट्रायल ट्रेंच’चे खणकाम केले होते. १९७० च्या दशकात १.७५ मीटर खोलवर हडप्पापूर्व संस्कृतीच्या अवशेषांची नोंदणी करण्यात आली होती.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) भारतीय नृत्यकलेचे बदललेले स्वरूप

दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जात असून नुकताच हा दिवस साजरा करण्यात आला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील समान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारतातील नृत्य प्रकार भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत गेले? भारतात कोणकोणते प्रमुख नृत्यप्रकार आहेत. याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

ब्रिटिशांच्या शासनकाळात भारतीय संस्कृतीतील नृत्यकलेसह अनेक पारंपरिक कलांचा ओढा असणाऱ्यांकडे असंस्कृत म्हणून पाहिले जायचे. त्यामुळे पारंपरिक कलाकारांचा दर्जा कमी होऊ लागला होता. १९४७ नंतर भारतीय पारंपरिक कला प्रकाशझोतात येऊ लागल्या. प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना रुक्मिणी देवी अरुंडेल यांनी शास्त्रीय नृत्याला पुनरुज्जीवित केले.

२०व्या शतकाच्या सुरुवातीस आधुनिक नृत्याचे जनक उदय शंकर यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याला पाश्चात्त्य नृत्यनाट्यासह इतर जागतिक कलांशी जोडले. त्यांनी भारतीय नृत्यपरंपरेत आधुनिक बॅले नृत्याचा समावेश केला. भारतीय नृत्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच आज ‘कंटेम्पररी’सारख्या नृत्यप्रकाराला ओळख मिळाली.

या शतकाच्या मध्यात बॉलीवूड नृत्याच्या उदयाने नृत्यकलेला मुख्य प्रवाहात आणले. बॉलीवूड नृत्यामध्ये पाश्चात्त्य नृत्यशैलींसह शास्त्रीय आणि लोकपरंपरेतील नृत्यांचादेखील समावेश होतो. बॉलीवूड नृत्याने चित्रपट, नृत्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवली. बॉलीवूड नृत्य जगभरात एक मान्यताप्राप्त आणि प्रसिद्ध नृत्यप्रकार झाला आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लीक करा…