01 October 2020

News Flash

कलेचा करिअररंग : लुक डिझायनर

चित्रकार हा निरीक्षण करायला शिकत असतो. हे निरीक्षण तो अनेक अंगांनी करायला शिकत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

फाइन आर्टचे शिक्षण हे अष्टपैलू गुणवत्ता देणारे असते. या शिक्षणाचा वापर करून अनेक प्रकारच्या आणि अनेक पद्धतीची कारकीर्द विकसित करता येऊ शकते. अशाच पद्धतीचे आणखी एक करिअर म्हणजे लुक डिझायनर.

चित्रकार हा निरीक्षण करायला शिकत असतो. हे निरीक्षण तो अनेक अंगांनी करायला शिकत असतो. वस्तू, निसर्गातील घटक म्हणता येतील अशा वस्तू, माणसं, प्राणी, पक्षी, त्यांचे समूह, त्यांची घरे, कपडे, हालचाली, हावभाव, त्यातील सूक्ष्म बदल अशा अनेक घटनांनी भरलेलं दृश्य अशा अनेक गोष्टींचे तो निरीक्षण करत असतो. हे करताना त्याला माणसांच्या जगण्याचे पैलू कळू लागतात. तो ते चित्रातून पकडू पाहतो. या चित्र, निरीक्षणांतून त्या माणसांची व्यक्तिमत्त्व, खुबी त्याच्या मनात स्पष्ट होऊ शकतात. आपण अनेकदा म्हणतो की, लेखक त्यांच्या शब्दातून आपल्यासमोर माणसं जिवंत करतात हेच चित्रकारही करू शकतो आणि करतही असतो.

चित्रकार त्याच्या शिक्षणाच्या कालखंडात जशा पाहण्याच्या अनेक पद्धती शिकत असतो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे चित्र काढण्यासही शिकत असतो. त्यात स्केचिंग असते. एखादा फोटो क्लिक करावा तसे, खूप कमी वेळात, तीव्रतेने पाहून केलेले चित्र असते, खूप वेळ देऊन केलेले चित्र असते, छायाप्रकाश आणि रंगाचा आभास निर्माण करून केलेले चित्र असते. निसर्गचित्रामध्ये वातावरण, त्यातील प्रकाश, संपूर्ण परिसरावर त्याचा होणारा परिणाम, त्यातून जाणवणारा भाव याचा विचार असतो. स्थिर चित्रामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, त्याचा पोत अशा अनेक गोष्टी असतात. एकूणच एचडी अर्थात हाय डेफिनेशन चलतचित्राप्रमाणे चित्रकाराची दृश्य स्मृती विकसित होत जाते. कल्पनाशक्तीही फार सुंदरपणे विकसित होत असते. असेच सगळे निरीक्षण एखादा नकलाकार, नट, लेखक हेसुद्धा करत असतात. फाइन आर्टमधील व्यक्तिचित्रण या प्रकारात या सगळ्या अनुभवांचा चित्रकाराला उत्तम वापर करून घेता येतो.

सिनेमाच्या नामावलीत कास्टिंग डिरेक्टरबरोबर लुक डिझायनर, कॅरॅक्टर स्टायलिस्टचेही नाव कधी कधी आढळते. तोच आपल्या आजच्या लेखाचा विषय आहे. सिनेमाची कथा एका कालखंडात, प्रदेशात घडत असते. मग ते काल्पनिक असेल किंवा इतिहासावर आधारित किंवा वास्तवावर आधारित. ही कथा प्रत्यक्ष उतरवताना नटांना मेकअप, कपडे, दागिने आणि वस्तू यांनी ते घडवावे लागते. हे काम रंगभूषाकार म्हणजे मेकअप करणारा करतो. पण त्यासाठीची कल्पना कोणीतरी तयार करावी लागते. ती दृश्यकल्पना असावी लागते. त्यावेळी खूप तपशिलात विचार करावा लागतो. जी व्यक्ती ती भूमिका करत असेल त्याची शरीरयष्टी, चेहऱ्याची ठेवण, केसांचे वळण अशा अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. हे दृश्यकल्पना चित्र जेवढं अचूक बनेल तेवढं ते व्यक्तिमत्त्व घडणे, घडवणे याला मदत होते. आजकाल विशेषत्वाने हॉलीवूडमध्ये मेकअप, कपडेपट या विभागात लक्षणीय तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे निर्माण होणारी व्यक्तिमत्त्वेही लोकांच्या लक्षात राहतात.

तर अशाच प्रकारचे कल्पनाचित्र, दृश्य संकल्पनाचित्र साकारणारे म्हणजेच कलाकार म्हणजे आशीष पाडलेकर. त्यांनी स्वत: याच्याशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम केलेला नाही, कारण तसा तो विकसितच झालेला नाही. पण त्यांनी कलाशिक्षण मात्र जरूर घेतले आहे. जाहिरात क्षेत्र, अ‍ॅनिमेशन, कॉमिक बुक, ग्राफिक्स कादंबऱ्या आदी सर्व क्षेत्रात त्यांनी काम केले. मग विक्रम गायकवाड हे मेकअपतज्ज्ञ त्यांना भेटले आणि त्या कामाकडे पाडलेकर आकर्षित झाले. बालगंधर्व चित्रपटाकरिता त्यांनी प्रथम दृश्य संकल्पनाचित्र तयार केले आहे. अभिनेता सुबोध भावे आणि बालगंधर्व यांच्या चेहऱ्यातील साम्यस्थळे आणि वेगळेपण याचा अभ्यास करून त्यात योग्य ते बदल घडवून त्यांनी हे कल्पनाचित्र तयार केले. बालगंधर्वाच्या पात्राचा लुक डिझाइन केला. टप्प्याटप्प्याने सुबोधच्या चेहऱ्यात झालेले बदल इथे चित्रातून दिसू शकतील. मेकअप, चित्रकला, माणसांचे निरीक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींचे एकत्रित ज्ञान आणि जाण यातूनच हे साकारले आहे. पाडलेकरांनी गरू, तनू वेड्स मनू, कटय़ार काळजात घुसली अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी काम केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना व्यक्तिचित्रण करण्यास आवडते. त्यांनी याकडे नक्कीच एक करिअर संधी म्हणून पाहायला हवे. आगामी लुक डिझायनर म्हणून हे क्षेत्र तुमची वाट पाहात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2018 2:08 am

Web Title: designing career in design
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : विविध व्यक्तिगट आणि मानवी हक्क
2 यूपीएससीची तयारी : भारतीय चित्रकला, साहित्य आणि उत्सव
3 संशोधन संस्थायण : सूक्ष्मजीव आणि शास्त्र
Just Now!
X