मी नुकतीच सूक्ष्मजीवशास्त्र या विषयामधून बीएस्सीची पदवी मिळवली आहे. मला ७० टक्के गुण मिळाले होते. परंतु यंदा मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्याने प्रवेश प्रक्रियांना उशीर झाला आहे. त्यामुळे मला इतरत्र कुठे प्रवेश मिळत नाही. एमएस्सीशिवाय मी सध्या काय करू शकते?  मधुरा जोगळेकर

* तुला यंदा एमएस्सीला प्रवेश मिळू शकला नाही, ही दु:खद बाब आहे. तथापी आता या नैराश्यातून बाहेर पडून तू जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी या परीक्षेची तयारी करावीस असे सुचवावेसे वाटते. या परीक्षेद्वारे आयआयटी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बेंगळुरू येथे पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रम करण्यासाठी प्रवेश मिळू शकतो. ही परीक्षा तू उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यास तुला मुंबई, इंदौर किंवा रुरकी आयआयटीमधील एमएस्सी इन बायोटेक्नॉलाजी या विषयात प्रवेश मिळू शकतो.

जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी ही संगणक आधारित वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा आहे. २०१८ च्या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशासाठीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०१८ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येईल. यामध्ये एक केंद्र मुंबईसुद्धा आहे.

* परदेशात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी तू या कालावधील जीआरई/टॉफेल या परीक्षा देऊ  शकतेस. या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळाल्यास अमेरिका किंवा इंग्लंडमधील उत्कृष्ट संस्थेत तुला सहज प्रवेश मिळू शकेल.

* एमबीए करणे हासुद्धा एक पर्याय आहे. त्यासाठी तू एमएच-सीईटी-एमएएमएस/एमबीए किंवा कॉमन मॅनजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट-सीमॅट या परीक्षा देऊ  शकतेस.

* स्वत:चे इंग्रजी लेखन कौशल्य, संवाद कौशल्य, संगणकीय ज्ञान कौशल्य वृिद्धगत करण्यासाठी सध्याच्या कालावधीचा उपयोग करणे शक्य आहे.

* पुढील काही दिवसांमध्ये बँकांच्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या जागांसाठी भरती प्रकिया जाहीर केली जाईल. बँकेत करिअर करावे अशी इच्छा असल्यास या परीक्षेची तयारी या कालावधीमध्ये तू करू शकतेस.

* केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी किमान अर्हता ही कोणत्याही विषयातील पदवी आहे. ती तू प्राप्त केल्याने या परीक्षांची तयारी सुद्धा तू आता करू शकतेस.

मी सध्या केमिकल अभियांत्रिकीचा अभ्यास करत आहे. मला पुढे नौदल किंवा वायुदलात जायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
प्रणाली जोशी

महिलांना सैन्य दलात जाण्याची संधी मिळवण्यासाठी तुला संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेसची परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे तुला ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथे शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन-अतांत्रिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रेटेजिक स्टडीज ही पदविका प्रदान केली जाते. त्यानंतर लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते.

माझा भाऊ  दहावीमध्ये आहे. त्याला कृषी क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यासाठी काही पदविका अभ्यासक्रम आहेत का?
संकेत भोगे

राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉ.बाळासाहेब सावंत कृषी कोकण विद्यापीठ, दापोली येथे कृषी तंत्र पदविका (मराठी माध्यम, अभ्यासक्रम कालावधी दोन वर्षे), कृषी तंत्रज्ञान पदविका (इंग्रजी अभ्यासक्रम,कालावधी तीन वर्षे ) हे दोन अभ्यासक्रम करता येतात. १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

संपर्क – http://www.maha-agriadmission.in  किंवा  http://www.mcaer.org