स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com

लातूर जिल्ह्य़ातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकी इथल्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल, त्यातले जिल्हे, तालुके, त्यांची भौगोलिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा या सगळ्या गोष्टी म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहेत. या प्रगतीचे कारण आहेत, त्यांचे अभ्यासू शिक्षक किरण साकोळे.

बीए आणि डीएडची पदवी घेतल्यावर १५ जून २००७ साली किरण साकोळे उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवर रुजू झाले. सुरुवातीला पाचवी ते सातवीला  ते इंग्रजी शिकवत असत. याच शाळेत असताना एका बाजूला त्यांनी एमए आणि बीएडही पूर्ण केले. खरे तर त्यांना व्हायचे होते डॉक्टर, पण काही कारणांमुळे ते हुकले आणि स्टेथोस्कोपच्या जागी खडू-फळा हाती आला. तो घेऊनच त्यांनी ‘अभ्यासाचा कंटाळा’ या आजारावर एकदम रामबाण उपचार केले आहेत. आणि ‘ऑपरेशन शाळा’ एकदम व्यवस्थित पार पाडत आहेत.

जून २०१६ला त्यांची बदली झाली लातूरजवळच्या ढोकी या गावात. या लहानशा गावात शाळा इयत्ता चौथीपर्यंत. तीही द्विशिक्षकी. शाळेचा पट होता १५. पहिलीला प्रवेशपात्र मुलांची संख्या होती ११, पण इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश शून्य. कारण लोकांना आसपासच्या ‘विंग्रजी’ शाळा अधिक विश्वासू वाटत होत्या. मग साकोळे सर आणि मुख्याध्यापक दोघेही गावात अक्षरश: फिरले, आमच्याकडे मुले द्या, आम्ही त्यांचे सोने करून दाखवू अशी पालकांना विनंती केली तेव्हा ११पैकी ४ मुलांचे प्रवेश झाले. त्यानंतर परगावाहून काही सालगडय़ांची मुले आणि दुष्काळामुळे गावात परत आलेले २ विद्यार्थी अशी मिळून पटसंख्या झाली २५. मग साकोळे सरांनी आणि मुख्याध्यापक पवार सरांनी ठरवले आपण याच मुलांना असे काही घडवू की पुढच्या वर्षी पालक स्वत:हून आपली मुले शाळेत घालतील. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले. शाळेमध्ये साऊंड सिस्टीम होती पण किरकोळ अडचणीअभावी ती बंद पडली होती. साकोळे सरांनी स्वखर्चाने ती पुन्हा सुरू करून घेतली. मग या माइकवरून मधल्या सुट्टीत संगीतमय पाढे सुरू झाले. राष्ट्रगीत, पसायदान, प्रार्थना, शाळेत दिल्या जाणाऱ्या सूचना सारे काही माइकवरून ऐकू जाऊ लागले. मुलांना त्याची गंमत वाटू लागली. शाळा जवळची वाटू लागली.

एकेदिवशी परिपाठात साकोळे सरांनी सहज म्हणून लातूर जिल्ह्य़ातल्या तालुक्यांची नावे विद्यार्थ्यांना विचारली. पण कुणालाच ती आली नाहीत. त्यावेळी पहिल्यांदा किरणसरांना जाणीव झाली की, आपल्याला आधी या विद्यार्थ्यांना भूगोल शिकवायला हवा. भूगोल शिकला की आपोआप भवताल समजतो. परिसराची समज येते. पण या विद्यार्थ्यांना शिकवायचे तरी कसे? नुसत्या पाठांतराने पुस्तकातला निरस भूगोल ना विद्यार्थ्यांना समजतो ना त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मग त्यांना एक छान खेळ सुचला.

प्रत्येक विद्यार्थ्यांला सरांनी एका तालुक्याचे नाव दिले. मैदानावर थोडय़ा अंतरावर गोल आखून त्या गोलात प्रत्येक मुलाला उभे केले. उदा. कुणी झाला लातूर तालुका कुणी रेणापूर कुणी उद्गिर इ. सर्वप्रथम प्रत्येकाने आपल्याला ज्या तालुक्याचे नाव दिले आहे, ते नाव टाळी वाजवून मोठय़ाने सांगायचे. असे प्रत्येकाचे नाव सांगून झाल्यावर प्रत्येक तालुक्याने बाकीच्या तालुक्यांकडे जाऊन त्यांना टाळी देऊन त्या त्या तालुक्याचे नाव मोठय़ाने म्हणायचे. अशा पद्धतीने प्रत्येकाला एक तालुका तर पाठ झाला शिवाय बाकीच्या मित्र-मैत्रिणींना कोणता आलाय ते समजून घेताना आणखी तालुके पाठ झाले. मग हळूहळू तालुक्याचे स्थान आणि नाव अशी संगत लावली गेली. लातूर जिल्ह्य़ाच्या आकारानुसार मुले उभी राहू लागली. हा नवा खेळ विद्यार्थ्यांना भलताच आवडला. हळूहळू तिसरी-चौथीच्या सर्वच मुलांना सर्व तालुक्यांची नावे येऊ लागली. परिपाठातला खेळ मस्त रंगू लागला. तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांचा खेळ रोज पाहून पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनाही तालुक्यांची नावे पाठ झाली. तालुके झाल्यावर नंबर होता लातूरमधल्या नद्यांचा. या जिल्ह्य़ात ७ नद्या. मग ७ मुली सात नद्या झाल्या. प्रत्येकीने एकेका नदीचं नाव, उगम, कुठे कुठे वाहते हे पाठ करायचे होते. मैदानावर आखलेल्या जिल्ह्य़ाच्या नकाशावरून प्रत्येक मुलगी आपण असलेल्या नदीचे नाव सांगत चालत जाई. वाटेत तालुके उभे असतच. ज्या ज्या तालुक्यांमधून किंवा तालुक्यांजवळून ती नदी वाहते त्याप्रमाणे मुलगी त्या त्या विद्यार्थ्यांजवळून जात जात आपली माहिती सांगत असे. हा खेळही विद्यार्थ्यांमध्ये भलता लोकप्रिय ठरला. विद्यार्थ्यांना रट्टा मारून जी तालुक्यांची, नद्यांची नावे पाठ झाली नसती ते या खेळाने अगदी लीलया जमवली.

अशाच पद्धतीने मग लातूरनंतर महाराष्ट्रातले इतर जिल्हे, हळूहळू महाराष्ट्र आणि त्यातील तालुके, प्रत्येक ठिकाणाचे नाव, वैशिष्टय़े, भौगोलिक स्थान हेसुद्धा विद्यार्थ्यांच्या या खेळात समाविष्ट झाले. साकोळे सरांनी लोकसहभागातून शाळा रंगवून घेतली. शाळेच्या भिंतींवर मोठमोठे नकाशे काढले. मुलांना रेल्वेचे फार आकर्षण असते. याचा वापर करून सरांनी नवीन खेळ काढला. जिल्ह्य़ातील प्रमुख लोहमार्ग मैदानात आखले. मुलांच्या दोन झुकझुक गाडय़ा केल्या. त्या कुर्डूवाडी-लातूर रोड आणि परळी-हैद्राबाद या मार्गावरून कशा धावतात याचे प्रात्यक्षिक केले. आपल्या जिल्ह्य़ातले प्रमुख लोहमार्ग कुठले. तिथून गाडय़ा कशा जाता-येतात. त्यांचे अपघात का आणि कसे होत नाहीत, या सगळ्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची छान उत्तरे विद्यार्थ्यांना मिळाली. या उपक्रमांचे सादरीकरण वेळोवेळी गावापुढे केल्याने गावकऱ्यांनाही आता शाळेच्या प्रयत्नांविषयी खात्री वाटू लागली होती.  दुसरीतल्या सुनीलला अक्षर – अंकओळखही नव्हती. त्याचे पालक उसतोड कामगार. वाईट म्हणजे आपल्याला इतर पोरांच्या तुलनेत काही येत नाही, हे सुनीलला समजत असे त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन तो बोलेनासाच झाला. साकोळे सरांनी त्याच्याशी हळूहळू संवाद साधत त्याला अभ्यासाकडे वळवले. नोटा, काडय़ा, पानांच्या साहाय्याने गणित शिकवत, अक्षरं गिरवून घेतली. आता सुनील शाळेतला एक हुशार विद्यार्थी बनला आहे. त्याचे वाचन सुधारले. हस्ताक्षर तर सुंदरच आहे. अशीच गोष्ट अक्षयची. गावातल्या सालगडय़ांचा हा मुलगा फार शाळा बुडवायचा. कारण ‘मास्तरांच्या माराची भीती.’ सुरुवातीला रडणाऱ्या अक्षयला उचलून वर्गात आणावे लागे. पण ‘गुर्जी’ मारणार नाहीत, हे पटल्यावर तो हळूहळू नियमित झाला. त्याची आई सुया, पिना, बांगडय़ांचा व्यवसाय करत असल्याने अक्षयला व्यवहारज्ञान चांगले होते. त्यामुळे नोटांच्या मदतीने त्याचे गणित सुधारले. अक्षरवळणाचा वापर करून त्याचे अक्षर सुधारले. आता हा मुलगा संगणक चालवतो, परिपाठसभा धीटपणे घेतो. साडेचार वर्षांची धिटुकली शरयू इतर पोरांसोबत शाळेत येऊन बसू लागली. आणि आश्चर्य म्हणजे मुलांचा भूगोलाचा खेळ पाहून पाहून तिही तालुके, जिल्हे पटापट सांगू लागली आहे. ज्या गावात जेमतेम १०-११ हा शाळेचा पट होता तो आता चौपट म्हणजे ४१ झाला आहे. गावकरी स्वत: तिथे येऊन प्रवेशासाठी विचारणा करत आहेत. शिक्षक म्हणून किरण साकोळे सरांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे, अगदी त्यांच्या हुकलेल्या डॉक्टरकीपेक्षाही!