News Flash

करिअरनीती : हुन्नर

कॉलेजमध्ये अजिंक्यच्या वर्गात असलेल्या अनेक मुलांपैकी एक प्रथमेश. अभ्यासात बरा.

मॅनेजमेन्ट कॉलेजमध्ये सगळ्या परीक्षा आणि तोंडी परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवण्यात अजिंक्यच्या आसपासही कोणी फिरकू शकत नसे. तो सगळ्यात अव्वल असायचा. चुकून एखाद्यी विषयात कुणाला त्याच्यापेक्षा थोडे जरी जास्त गुण मिळाले तरी त्या विद्यार्थ्यांला जग जिंकल्यासारखे वाटे. अर्थात अशी संधी क्वचितच मिळायची कुणाला!

कॉलेजमध्ये अजिंक्यच्या वर्गात असलेल्या अनेक मुलांपैकी एक प्रथमेश. अभ्यासात बरा. मॅनेजमेन्टला जेमतेम शेवटची सीट मिळून गेली. त्याच्या प्रवेशासाठी झालेल्या मुलाखतीमध्येही त्याला काही उत्तरे आली नव्हती, ती उत्तरे न येण्याबाबतचा त्याचा सहजपणा मुलाखत मंडळातील अनेकांना भावला होता. काही प्रश्नांची उत्तरे प्रथमेशने चक्क त्यांनाच विचारली, ज्याची त्यांना मजाच वाटली होती. आणि त्यांना ती चक्क द्यावीशीही वाटली. काहीतरी लोभसवाणे असे होतेच त्याच्या व्यक्तिमत्त्वात. अनेक पोरांसारखे लेक्चर बंक मारणे, हॉस्टेलवर पत्ते खेळणे, जिमखान्यात कॅरम नाहीतर दुपारचा एखादा सिनेमा- हे सगळे प्रथमेशने केले. कॉलेजच्या दोन वर्षांत त्याचा मित्र-परिवार मोठ्ठाच होता. कॉलेज डे, वादविवाद स्पर्धा, खेळ सगळ्यातच प्रथमेशचा उत्साही सहभाग असायचा, बक्षीस असायचे. कॉलेज डेच्या आयोजन समितीचाही तो सदस्य होता. जी. एस. साठीच्या कॉलेज निवडणुकांमध्येही तो दुसऱ्या वर्षांला उभा राहिला; पण एका मताने हरला.

कॅम्पस सिलेक्शनला आलेल्या एका मल्टिनॅशनल कंपनीचा इंटरव्ह्य़ू झाला. स्वत:बद्दल सांगा वगैरे नेहमीचे प्रश्न झाल्यावर मुलाखत मंडळातील एका बाईनी त्याला विचारले, ‘‘तुला आम्ही का निवडावे?’’ हा पठ्ठय़ा म्हणाला, ‘‘तुम्ही ज्या कारणांसाठी इथे आला आहात त्याच कारणांसाठी निवडावे. पण तुझ्यात असे काय खास आहे ज्यासाठी आम्ही तुला ही नोकरी द्यावी?’’ त्यावर प्रथमेश अगदी सहजपणे म्हणाला, ‘‘मॅडम माझ्यात अनेक खास गोष्टी असतील, पण मला जास्त महत्त्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे त्यातील तुमच्या उपयोगाचे काही आहे का?’’

‘‘बरं तुझ्यातल्या कुठल्या गोष्टी आमच्या उपयोगाच्या असतील असे तुला वाटते?’’ विचारणाऱ्या बाईंनी मुद्दा सोडला नाही.

‘‘मॅडम माझ्याकडे प्रचंड चिकाटी आहे. मी सांगाल त्या माणसांबरोबर किंवा टीममध्ये काम करू शकतो. मी पडेल ते काम करू शकतो. शिवाय माझ्याकडे प्रचंड पेशन्स आहेत असे मला वाटते.’’

‘‘कुणी सांगितलं तुला या गोष्टी नोकरीत महत्त्वाच्या आहेत?’’

प्रथमेश थोडासा ओशाळून हलकं हसत म्हणाला ‘‘मला जी काही थोडी बहुत नोकरी-कामाची माहिती आहे, त्यानुसार या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं मॅडम.’’

त्याही मग हसल्या. त्यांनी मग पुढे विचारल, ‘‘आणखी काही?’’ त्यांची उत्सुकता आता जागृत झाली होती.

‘‘मॅडम कुठल्याही गोष्टीचा अनेक अंगानं विचार करायची मला सवय आहे.’’

‘‘बरं. म्हणजे कसं?’’

क्षणभर विचार करून प्रथमेश म्हणाला, ‘‘मॅडम समजा ग्राहकाला डिलिव्हर झालेला आपला प्रॉडक्ट डॅमेज्ड असेल, तर त्याला कारणं अनेक असू शकतात . आपल्याकडचं त्याचं पॅकिंग, त्याचं हँडलिंग, पॅकेजिंग, मटेरियलमध्ये काही त्रुटी, ट्रान्सपोर्टरचं हँडलिंग .. अशा खूप शक्यता असू शकतात. त्या सगळ्या तपासून पाहणं मग आवश्यक होतं.’’

पॅनलवरच्या दुसऱ्या एका गृहस्थानं त्याला मग विचारलं, ‘‘असं काही आहे जे तुझ्यात नाही, पण असलेलं तुला आवडलं असतं?’’

‘‘माहीत नाही, पण फार मूलभूत, काही नवं मला नाही सहज सुचत. काही लोकाना सॉलिड फंडू आयडियाज सुचतात.’’ प्रथमेशनं पटकन जीभ चावली ‘‘सॉरी, आय मीन फंडामेंटल आयडियाज.’’ मला अशा लोकांचा हेवा वाटतो.

तिसऱ्याच एका थोडय़ा वयस्कर गृहस्थानं प्रथमेशला विचारलं ‘‘तुला काही प्रश्न आहेत का?’’

तो मग म्हणाला, ‘‘सर, तुम्ही मला टेक्निकल असे काहीच प्रश्न विचारले नाहीत. मग तुम्ही योग्य उमेदवार कशाच्या बळावर निवडता?’’

त्यावर मुलाखत मंडळातील सगळेचजण हसले. प्रथमेश जरा संकोचून गेला. त्या वयस्कर गृहस्थानं मग म्हटलं, ‘‘आमच्या व्यवसायात तांत्रिक ज्ञानाची तेवढी गरज नाही. जी आहे ते ज्ञान आम्ही ट्रेनिंगद्वारे देऊही शकतो. पण इतर अनेक गुणांसाठी आमच्याकडं कसलंच ट्रेनिंग होत नाही. आम्ही उमेदवारामध्ये ते गुण तपासून पाहतो.’’

‘‘ते कुठले गुण?’’ प्रथमेशनं विचारलं.

‘‘ते गुण म्हणजे चिकाटी, दुसऱ्यांबरोबर काम करता येणं, प्रॉब्लेम सॉलव्हिंग अ‍ॅटिटय़ूड ..’’ असं म्हणत ते गृहस्थ हलकेच हसले. प्रथमेशही मग हसला, रिलॅक्स झाला. जाताना सगळ्यांना बाय म्हणत जवळ जवळ टुण्णदिशी उडी मारतच तो बाहेर पडला.

प्रथमेशच्या नावाशेजारी पॅनेलवरच्या अनेकांचा शॉर्टलिस्टचा टिक मार्क ऑलरेडी पडला होता. नोकरीवर प्रथमेश काय करतो, पाहू या पुढच्या लेखात.

palsule.milind@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:30 am

Web Title: most valuable career skills
Next Stories
1 नोकरीची संधी
2 का? कुठे? कसे? : बोन्सायची निर्मिती
3 वेगळय़ा वाटा : पेहराव खुलवण्याचे शास्त्र
Just Now!
X