देहबोलीचा इंग्रजी अनुवाद आहे, Body Language. Language  म्हणजे भाषा. अर्थात देहाचीसुद्धा एक भाषा असते. हे यात अनुस्यूत आहे. म्हणजेच देह संवाद साधतो, आपला प्रभाव सोडतो, छाप पाडतो हे सिद्ध होते. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, असे मानले जाते. एका शब्दाचासुद्धा उच्चार करण्यापूर्वी कुठल्याही व्यक्तीचे फर्स्ट इम्प्रेशन समोरच्यांवर पडलेले असते. ही पहिली छाप, पहिला प्रभाव व्यक्ती/उमेदवाराच्या देहबोलीचा असतो. म्हणूनच स्पर्धा परीक्षांत मुलाखतीची तयारी करताना देहबोलीविषयी विशेष काळजी आणि नेटकी तयारी फारच महत्त्वाची ठरते.

 मौन मूल्यांकन

देहबोलीच्या अभाषिक संवादातून उमेदवाराचा आत्मविश्वास, त्याची मनस्थिती आणि व्यक्तिमत्त्वाशी निगडित असे अनेक पलू मुलाखत मंडळाला जाणवत असतात. उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची पहिली ओळख त्याच्या बाह्य़ व्यक्तिमत्त्वातून होत असते. अनेकदा उमेदवाराची बौद्धिक क्षमता उत्तम असूनही तो मुलाखत मंडळासमोर स्वतला योग्य आणि प्रभावी पद्धतीने सादर करू शकत नाही. काही उमेदवारांची मन:स्थिती आणि आत्मविश्वासाचा स्तर उंचावलेला असतो. मनस्थिती एकदम चांगली असते, पण चेहऱ्यावरील हावभाव आणि नसíगक देहबोली अशा प्रकारची असते की त्यातून मुलाखत मंडळावर नकारार्थी प्रभाव पडतो. म्हणून उमेदवारांनी देहबोलीविषयी सजगपणे तयारी करणे आवश्यक आहे.

मुलाखतीत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अभ्यास, ज्ञान, माहिती, तर्कशक्ती, निर्णयक्षमता या बाबी तपासल्या जातातच, पण या बरोबरच उमेदवाराच्या मौन मूल्यांकनात उमेदवाराचे मुलाखत कक्षात प्रवेश करणे, खुर्चीवर बसणे, चेहऱ्याचे हावभाव, केशरचना, मुलाखत मंडळाच्या प्रश्नांना सामोरे जातानाच्या शारीरिक हालचाली- हातवारे, चांगल्या उत्तरावर मुलाखत मंडळाने दिलेली शाबासकी किंवा चुकीच्या उत्तरावर केलेली टिप्पणी या प्रसंगांना सामोरे जातानाची उमेदवाराची अवस्था/प्रतिक्रिया, मुलाखत कक्षातून बाहेर पडतानाची स्थिती या व देहबोलीशी संबंधित अशा बाबींचे बारकाईने सूक्ष्म आणि मौन मूल्यांकन मुलाखतीच्या संपूर्ण वेळेत सुरू असते. या अवलोकनासाठी काही वेळेला देहबोली तज्ज्ञ (body language expert) मुलाखत मंडळाबरोबर पण एका बाजूला बसलेले असतात. असे तज्ज्ञ प्रत्येक वेळी मुलाखत मंडळामध्ये समाविष्ट नसले तरी सर्वच सदस्यांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तुमच्या देहबोलीचे ‘मौन मूल्यांकन’ होतच असते. मुलाखत मंडळाचे उमेदवाराविषयी एकूण मत तयार होण्यात या मौन मूल्यांकनाचे फार महत्त्व असते.

 मुलाखत कक्षाबाहेर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती धोलपूर हाऊस, दिल्ली येथे तर राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखती मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा विविध केंद्रांवर घेतल्या जातात. मुलाखतीच्या दिवशी केंद्रांवर आलेला प्रत्येकजण आपापल्या तयारीत असतो. पुस्तक, पेपर, मासिक वाचण्यात काही उमेदवार मग्न असतात. काही उमेदवार स्वतचा बायोडाटा तपासण्यात तर काहीजण दुसऱ्यांची लगबग बघण्यात व्यस्त असतात. मुलाखत कक्षाबाहेरील वातावरण थोडेसे तणावपूर्ण असे असते. मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारांकडून मुलाखत मंडळात किती सदस्य आहेत? कोण आहेत? कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाताहेत? याची माहिती बाहेर मिळत असते. ही माहिती काही उमेदवारांसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक प्रभाव पाडणारी ठरते. काहीजण हे ऐकून जरासे विसावतात, मोकळे होतात तर काहीजण विनाकारण ताण घेतात. तणावग्रस्त होतात! मुलाखत कक्षाबाहेरील या सर्व वातावरणाचा उमेदवाराच्या आत्मविश्वासावर व पर्यायाने त्याच्या देहबोलीवर परिणाम होत असतो.

तुमची तयारी समाधानकारक झाली असेल तर आपोआपच आत्मविश्वास जागृत झालेला असतो. सकारात्मक मनोवृत्ती व आत्मविश्वास असेल तर मुलाखत कक्षाबाहेरील वातावरण, घडामोडी तुम्हाला त्रासदायक ठरणार नाहीत. उलट आवश्यक तेवढा या वातावणाचा उपयोग मुलाखतीपूर्वीच्या ऐनवेळच्या तयारीसाठी करून घेता येईल.

तुमच्या मुलाखतीच्या पाच, सहा मिनिटे आधी तुम्हाला बोलावले जाते. वेटिंग रूममधील इतर उमेदवारांपेक्षा वेगळे म्हणजे मुलाखत कक्षाबाहेर बसण्याची  तुमची व्यवस्था केलेली असते. नवीन उमेदवाराला मुलाखतीसाठी आत बोलावण्यापूर्वी, मुलाखत संपन्न झालेल्या उमेदवाराच्या अंतिम मूल्यांकनाविषयी मंडळ चर्चा करत असते. या दरम्यानचा मुलाखत कक्षाबाहेरील चार-पाच मिनिटांचा काळ म्हणजे उमेदवाराला स्वतला व्यवस्थित सावरण्यासाठी, आत्मविश्वासाने प्रसन्न चेहऱ्याने व मनाने मुलाखत कक्षात प्रवेश करण्यासाठी सज्ज होण्याची वेळ असते.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, 

करिअर वृत्तांतचे हे नवे स्वरुप तुम्हाला कसे वाटले? या पानात तुम्हाला आणखी कोणते विषय हवे आहेत? कोणत्या करिअर्सविषयी वाचायला  आवडेल  हे आम्हाला नक्की कळवा. आम्ही वाट पाहतोय! career.vruttant@expressindia.com