News Flash

पुढची पायरी : ऑफिसप्रवेशाची उत्कंठा

आपल्या आयुष्यातील सगळ्याच पहिल्या गोष्टींना एक वेगळेच महत्त्व असते.

पदवी किंवा शिक्षण पूर्ण केल्यानंतर येणारी करिअरची पुढची पायरी म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय. कार्यालयातल्या दैनंदिन घडामोडींचे करिअरच्या मार्गातले महत्त्व अधोरेखित करणारा हे सदर. व्यावसायिक आयुष्यात मुख्यत्वेकरून कार्यालयात कसे वागावे आणि का, याचा परिपाठ यातून नक्कीच मिळेल.

आपल्या आयुष्यातील सगळ्याच पहिल्या गोष्टींना एक वेगळेच महत्त्व असते. मग ऑफिसातला पहिला दिवस तर आणखीनच खास असतो. पदवीपर्यंतची २०-२२ वर्षे कशीमजेत, सुखेनैव गेलेली असतात. पण आता तसे करता येणार नाही. आपली पदवी, कौशल्ये आणि गुणवत्ता पारखून या कंपनीने एक विशिष्ट कामासाठी आपली या पदावर नेमणूक केलेली असते. या ऑफिसप्रवेशाचे काही नियम आपण पाळले तर  काहीच अवघड नाही.

  • व्यक्तिमत्त्वाचा पहिला ठसा हा नेहमीच करिअरवर दूरगामी परिणाम करणारा असतो. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्यायची ती पोषाखाची. नीट इस्त्री केलेला, स्वच्छ, योग्य मापाचा आणि अनुरूप रंगसंगतीचा पोषाख, पादत्राणे आणि संयत केशरचना महत्त्वाची. यानंतर नंबर लागतो तो हसतमुख चेहरा आणि शिष्टाचारांचा.
  • मनात सकारात्मक विचार आणा. माझे कसे होईल? या प्रश्नाऐवजी माझे मस्तच होईल! असा विचार करा. सहकाऱ्यांबद्दल मनात सकारात्मक विचार आणा. उत्साहाने कामाची सुरुवात करा.
  • वक्तशीरपणा तर हवाच. पहिल्या दिवशी तर वेळेच्या १५ मिनिटे आधीच हजर राहा. शिवाय आपण आल्याची योग्य पद्धतीने वर्दीही द्या.
  • पहिल्या दिवशी एचआर अर्थात ह्य़ुमन रिसोर्स विभागामध्ये जाऊन काही औपचारिकता पूर्ण करायच्या असतात. त्यात रुजू झाल्याचा रिपोर्ट, सर्व प्रमाणपत्रांच्या प्रती आदी कागदपत्रे जमा करायची असतात. त्या विभागातील संबंधित अधिकारी तुम्हाला तुमची बसायची जागा, कंपनीचे नियम, वरिष्ठांचे नाव, हुद्दा, कंपनीविषयीची अधिकृत माहिती देऊ शकतात ती नाही सांगितल्यास विचारताही येतील. त्याचप्रमाणे कमीत कमी एका सहकाऱ्याची ओळख करून देण्याची विनंती करा.
  • स्वत:ची ओळख करून द्या आणि सहकाऱ्यांची ओळख आपणहून करून घ्या. पण स्वत:ची ओळख करून देताना फक्त तुमचे नाव, पद, इतकेच सांगा. बाकी तपशील सांगायची गरज नाही. सहकाऱ्यांची ओळख करून घेताना त्यांचे नाव व पद व अंदाजे वय हे नीट लक्षात ठेवा. तसेच ते वरिष्ठ आहेत की कनिष्ठ हेसुद्धा मनात नोंदवून घ्या. भविष्यात त्यांच्या बरोबर काम करताना योग्य तो मान देणे आवश्यक आहे. हस्तांदोलन हा आता सामान्य शिष्टाचार झाला आहे; परंतु आपल्याला ते नीट येते की नाही, याचा अंदाज घ्या. नाहीतर सरळ हात जोडून नमस्कार करा. विशेषत: विरुद्धलिंगी सहकाऱ्याच्या बाबतीत हे लक्षात ठेवा.
  • जेवणाच्या वेळी तुम्ही डबा नेला असल्यास आणि सहकारी एकत्र जेवत असल्यास तुम्ही त्यांच्या गटात सामील होऊन जेऊ शकता का, असे विचारा मगच सामील व्हा. डबा नेला नसल्यास कँटीन किंवा जवळच्या हॉटेलात जेऊन वेळेपूर्वीच परत या. जेवताना तोंडाला वास राहील असे पदार्थ खाऊ  नका. आल्यावर लोकांशी बोलताना आवाज करून ढेकर देऊ  नका. तोंडाशी रूमाल धरा.
  • एचआरकडून आपल्या कामाचे स्वरूप समजावून घ्या. अनेक मोठय़ा कंपन्यांमधून तर ते लिखित स्वरूपातच मिळते. त्याबद्दल काही शंका असल्यास लगेचच त्याचे निरसन करून घ्या. कामाच्या बाबतीत संदिग्धता नको.
  • ऑफिसच्या वेळेत व नंतरही निर्थक बडबड टाळा. प्रत्येक ऑफिसमध्ये राजकारण करणारा एक गट असतोच. उगाच आपल्या निर्थक बडबडीमुळे आपण त्यात ओढले तर जाणार नाही ना, याची काळजी असते.
  • ऑफिसची वेळ संपल्यावर पहिल्या दिवशी तरी घरी जाण्याची घाई करू नका. आपले इतर सहकारी कधी आणि कसे निघतात त्याप्रमाणे वागा.

वर दिलेल्या प्रत्येक मुद्दय़ाबद्दल तपशिलात लिहिता येईल. पण तूर्तास इतकेच पुरे!

लेखक गेली अनेक वर्षे व्यवस्थापन शास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2017 12:30 am

Web Title: office access eagerness
Next Stories
1 वेगळय़ा वाटा : नवरी नटली!
2 आदर्श शाळा
3 नोकरीची संधी
Just Now!
X