20 September 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : असंसर्गजन्य रोगांवर मात

भारतातील ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे होतात.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

असंसर्गजन्य रोगांबाबत मागील तीन महिन्यांमध्ये महत्त्वाच्या तीन घडामोडी घडल्या. त्यातील दोन बाबी भारताबाबतच्या आहेत आणि परस्परविरोधी आहेत. तर तिसरी बाब आहे, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील ठराव, जो सार्वत्रिक आहे. या घटनांच्या आधारे भारतातील असंसर्गजन्य रोगांची स्थिती व तिचा सामना करण्यासाठीची भारताची तयारी याबाबत परीक्षोपयोगी चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

रोगप्रतिबंध आणि उपचार यांच्या माध्यमातून सन २०३०पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंच्या संख्येमध्ये एकतृतीयांश घट करणे हे शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी आरोग्य व कल्याण उद्दिष्टांचे एक साध्य आहे. या उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या भारताच्या प्रयत्नांची दखल घेऊन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात भारताच्या आरोग्य मंत्रालयाला ‘एनसीडी (असंसर्गजन्य रोग) संबंधित एसडीजी उद्दिष्ट वप्राप्तीमधील उल्लेखनीय योगदानासाठीचा ‘यूएन इंटरएजन्सी टास्क फोर्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच दरम्यान ‘एनसीडी काउंटडाउन २०३०’ च्या देखरेख गटाने लॅन्सेट पेपरमध्ये एनसीडीसंबंधित शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये भारताचे प्रयत्न कमी पडतील, असा विरोधाभासी दावा केला. संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेमध्ये ‘सध्याच्या आणि भविष्यातील पिढय़ांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी असंसर्गजन्य रोगांबाबत कारवाईचा वेग वाढविणे’ यासाठीचा ठराव पारित करण्यात आला.

या तिन्ही घटनांचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी असंसर्गजन्य रोगांची भारतातील स्थिती आणि या रोगांच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी भारतामध्ये होणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भारतातील ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे होतात. वर्ल्ड इकॉनोमिक फोरमच्या अहवालानुसार असंसर्गजन्य रोगांमुळे सन २०१२ ते २०३० दरम्यान भारताचे रु. ३१,१९४ दशलक्ष इतके आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

भारताचे प्रयत्न

* जागतिक आरोग्य संघटनेच्या असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठीच्या जागतिक संनियंत्रण आराखडा आणि कृती योजनेवर स्वाक्षरी करणारा भारत हा पहिला देश आहे.

* भारताच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये सन २०२५ पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंच्या संख्येमध्ये एकचतुर्थाश इतकी घट करणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

*    राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडून कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि स्ट्रोक यांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये या रोगांचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पातळीपर्यंत उपाययोजना करण्यात येत आहेत.

*    असंसर्गजन्य रोगांचे उपचार, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आणि धोरण निर्माते यांना एकच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एनसीडी आयटी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

लान्सेट आणि संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेच्या पाहणीत आढळलेली तफावत ही मुख्यत्वे सर्वेक्षणाच्या व्याप्तीमधील फरकामुळे आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये ३० ते ७० हा वयोगट विचारात घेण्यात आला आहे. त्यानुसार यूएन इंटरएजन्सी टास्क फोर्सने आपला अहवाल तयार केला आहे तर लान्सेट्च्या सर्वेक्षणामध्ये ३० पेक्षा कमी आणि ७० पेक्षा जास्त वयाच्या लोकांचीही पाहणी समाविष्ट आहे.

असंसर्गजन्य रोगाची व्याख्या

जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आनुवंशिक, शारीरिक, पर्यावरणीय आणि वर्तनात्मक अशा कारणांचा एकत्रित परिणाम असलेले दीर्घकालीन आजार / रोग म्हणजे असंसर्गजन्य रोग होत. यामध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह आणि श्वसनाशी संबंधित रोग यांचा समावेश होतो.

संभाव्य उपाययोजना

*    वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी अपायकारक पदार्थाचे सेवन कमी करणे, व्यायाम, जिम, योगा अशा प्रकारची शारीरिक कार्ये आणि आरोग्यपूर्ण आहार यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करणे.

*    तयार अन्न तसेच प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या उत्पादनासाठी कडक नियम ठरविणे.

*    प्रदूषणमुक्त वातावरण आणि मनोरंजनासाठी अवकाश मिळू शकेल अशा प्रकारे शहरांचे नियोजन करणे.

*    आरोग्य क्षेत्रामध्ये शासकीय खर्चाचे प्रमाण वाढविणे तसेच वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतील अशा प्रकारे सुविधांचा विस्तार करणे.

असंसर्गजन्य रोगांची कारणे

*    तंबाखू व अल्कोहोलचे सेवन, प्रक्रिया केलेल्या, साखर व मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नाचे जास्त प्रमाण, शारीरिक निष्क्रियता – आळस अशा सवयींमुळे असंसर्गजन्य रोगांची शक्यता वाढते. यांना वर्तनजन्य कारणे म्हणतात.

*    वाढलेला रक्तदाब, लठ्ठपणा, रक्तातील ग्लुकोजचे वाढलेले प्रमाण यांसारख्या चयापचयाशी संबंधित कारणांनीही असंसर्गजन्य रोगांची शक्यता वाढते.

*    बठी कार्यशैली, मोकळ्या जागेचा आणि मनोरंजनाचा अभाव, तणावपूर्ण कार्यालयीन वातावरण, प्रदूषण हे रचनात्मक घटकही असंसर्गजन्य रोगांची शक्यता वाढवतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:53 am

Web Title: preparation for mpsc exam 4
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : एथिक्स अँड इंटेग्रिटी एक आढावा
2 संशोधन संस्थायण : अंदाज हवामानाचा
3 यूपीएससीची तयारी : १९९१च्या आर्थिक सुधारणा
Just Now!
X