News Flash

यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ आर्थिक विकास

आर्थिक वृद्धी जर सर्वसमावेशक असेल तरच अधिक प्रमाणात आर्थिक संधी प्राप्त करता येतील.

आजच्या लेखामध्ये आपण सर्वसमावेशक वाढ आणि संबंधित मुद्दे यांची चर्चा करूयात तसेच यावर गतवर्षी झालेल्या मुख्य परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि यासाठी कोणते संदर्भग्रंथ वापरावेत याचाही आढावा घेऊयात..
सर्वसमावेशक वाढ ही संकल्पना नेमकी काय आहे हे लक्षात घेऊयात. ११व्या पंचवार्षकि योजनेनुसार सर्वसमावेशक वाढीची व्याख्या ‘वृद्धीची प्रक्रिया जी व्यापक तत्त्वावर आधारित लाभाची आणि समान संधीची सुनिश्चितता समाजातील सर्व घटकांसाठी करेल. थोडक्यात ही वाढीची प्रक्रिया विस्तृत प्रकारची सर्वामध्ये विभागली जाणारी आणि गरिबीसन्मुख असणारी असेल.’ अशी करण्यात आलेली आहे. सरकारने आर्थिक वृद्धी आणि विकासाची प्रक्रिया समन्यायी करण्यासाठी विविध प्रकारच्या विकासात्मक योजना सुरू केलेल्या आहेत, ज्यामध्ये MGNREGA, PMJDY, NRHM, SSA, MDM, ICDS, आदींचा समावेश आहे आणि या योजना प्रामुख्याने दारिद्रय़निर्मूलन, गटामधील समानता, प्रादेशिक समानता, पर्यावरण शाश्वतता, शिक्षण व आरोग्य, शाश्वत पद्धतीने शेतीची वाढ, आर्थिक समावेशकता, पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्राशी संबंधित आहेत. ज्यामुळे होणारी वृद्धीची प्रक्रिया सर्वसमावेशकतेच्या दिशेने होणारी असेल.
भारताने १९९१ नंतर आर्थिक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केल्यानंतर आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळालेली आहे. आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यापासून देशात मध्यमवर्गाची वाढ वेगाने झाल्याचे दिसत असली, तरी जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था अजून कनिष्ठ मध्यमवर्ग या गटातच मोडते. देशाच्या विकासाचा विचार करत असताना आजवर दरडोई उत्पन्नाचा वाढणारा दर, अर्थव्यवस्था वाढीचा दर, उत्पादनवाढीचा दर, आयात-निर्यात व्यापारातील तूट, वित्तीय तूट अशा मुद्दय़ांचाच प्रामुख्याने विचार केला जात होता आणि अशा आर्थिक प्रगतीचे लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतात की नाही याकडे विशेष लक्ष दिले गेलेले नव्हते; पण सद्य:स्थितीमध्ये समाजाच्या सर्व स्तरापर्यंत एकसमान पद्धतीने आर्थिक विकास करता यावा आणि जे लोक या आर्थिक विकासात्मक प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना या विकासात्मक प्रक्रियेत सामावून घेऊन देशाच्या आर्थिक विकासात्मक प्रक्रियेला सर्वसमावेशक बनविण्यासाठी सरकारमार्फत विविध धोरणांची व योजनांची आखणी करण्यात आलेली आहे आणि हे सर्व सर्वसमावेशक वाढ साध्य करण्याच्या धोरणाचा भाग आहे. अलीकडच्या काळात सर्वसमावेशक वाढ हा आर्थिक विकास प्रक्रियेतील धोरणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आर्थिक वृद्धी जर सर्वसमावेशक असेल तरच अधिक प्रमाणात आर्थिक संधी प्राप्त करता येतील. तसेच याच्या जोडीला सर्वाना समान स्वरूपात संधी सुनिश्चित करता येतील ज्याद्वारे शाश्वत वाढ साध्य करता येईल, हा मुख्य उद्देश सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या धोरणात्मक नीतीचा भाग आहे. सरकारमार्फत अकराव्या आणि बाराव्या पंचवार्षकि योजनांमध्ये सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी विशेष भर देण्यात आलेला आहे, ज्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरणाचे ध्येय साध्य करता येऊन आर्थिक विकासाची प्रक्रिया अधिक प्रमाणात उत्पादनक्षम बनवता येईल. हा अंतिम उद्देश ठेवून सर्वसमावेशक वाढीच्या धोरणाची रणनीती सरकारमार्फत आखण्यात आलेली आहे.
आता आपण उपरोक्त चíचलेल्या घटकासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे तसेच यावर आत्तापर्यंत झालेल्या तीन मुख्य (२०१३-२०१५) परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा थोडक्यात परामर्श घेऊ. सर्वसमावेशक वाढ यावर २०१३ मध्ये सर्वसमावेशक वाढीच्या रणनीतीला ध्यानात घेऊन नवीन कंपनी बिल-२०१३ मध्ये सामूहिक सामाजिक उत्तरदायित्व हे अप्रत्यक्षपणे अनिवार्य करण्यात आले आहे. याला गांभीर्याने राबविण्यासाठी येणाऱ्या समस्यांची चर्चा करा तसेच या बिलामधील इतर तरतुदींची व त्यांच्या परिणामांची चर्चा करा.
अशा स्वरूपाचे थेट प्रश्न विचारण्यात आलेले होते. अर्थात हे प्रश्न वस्तुनिष्ठ माहिती आणि त्याचे विवेचनात्मक पलू या बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले होते आणि अशा प्रश्नांचे नेमके उत्तर लिहिण्यासाठी या घटकाच्या मूलभूत माहितीबरोबरच चालू घडामोडींचाही अभ्यास करणे अपरिहार्य ठरते. याव्यतिरिक्त या घटकावर विचारण्यात आलेले बहुतांश प्रश्न हे अप्रत्यक्षपणे विचारण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये गरिबी निर्मूलन, पोषण आणि आरोग्य, जनसांख्यिकीय लाभांश, ग्रामीण भागाचा विकास, कृषी क्षेत्र, रोजगार, पायाभूत सुविधा यामध्ये असणाऱ्या समस्या आणि यामध्ये अधिक प्रमाणात विकास घडवून आणण्यासाठी सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कायदे यांसारख्या बाबींचा एकत्रितपणे विचार करून प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि हे सर्व घटक सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.
या घटकांचा परीक्षेच्या दृष्टीने मूलभूत अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम ‘एनसीईआरटी’चे अकरावी आणि बारावीच्या भारतीय आर्थिक विकास (indian economic development) आणि macro economics या पुस्तकांचा वापर करावा, ज्यामुळे या घटकांची मूलभूत माहिती अभ्यासता येते. याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरील मिश्रा आणि पुरी दत्त आणि सुंदरम यापकी कोणत्याही एका संदर्भग्रंथाचा या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापर करावा. तसेच याच्या जोडीला उमा कपिला लिखित Indian Economy- Performance and Policies या संदर्भग्रंथामधील सर्वसमावेशक वाढीशी संबंधित प्रकरणे अभ्यासावीत, कारण या संदर्भग्रंथामध्ये संबंधित विषयाची चिकित्सक पद्धतीने चर्चा केलेली आहे. या घटकांवर चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न विचारण्यावर अधिक भर दिला जातो, ज्यासाठी द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे, योजना व कुरूक्षेत्र ही मासिके, केंद्र सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या योजना, केंद्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल, केंद्रीय अर्थसंकल्प, तसेच ‘इंडिया इयर बुक’मधील आर्थिक घडामोडीशी संबंधित प्रकरणे इत्यादी संदर्भ या विषयाची परीक्षाभिमुख र्सवकष तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकासामधील कृषी क्षेत्र व कृषीसंचय क्षेत्रे या घटकाचा आढावा घेणार आहोत आणि या घटकाची तयारी कशी करावी, तसेच गतवर्र्षीच्या मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रितपणे चर्चा करणार आहोत.
श्रीकांत जाधव
(भाग दुसरा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 2:30 am

Web Title: preparation for upsc 2
टॅग : Upsc
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : भूगोल : संज्ञा, संकल्पनांचा अभ्यास
2 करिअरमंत्र
3 फुलब्राईट नेहरू मास्टर्स फेलोशिप
Just Now!
X