माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

माहिती पुरवण्यापासून लोकांचं म्हणणं ‘ऐकून’ घेण्यापर्यंत अनेक गोष्टी करण्याचं काम ‘हेल्पलाइन्स’ करत असतात. आज समाजात अनेक समस्यांविषयी मदत वा मार्गदर्शन करणाऱ्या विविध ‘हेल्पलाइन्स’ कार्यरत आहेत. उदा. मुलांवरील वा स्त्रियांवरील अत्याचार, रॅगिंग, सायबर गुन्हे, खंडणी, हुंडा, मानसिकदृष्टय़ा अपंग, आत्महत्याप्रवण मानसिकतेचे लोक यासाठी. कोणकोणत्या ‘हेल्पलाइन्स’ आज कार्यरत आहेत, त्याचं नेमकं काम काय आहे, काय आहे त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव हे सांगणारं ‘हेल्पलाइनच्या अंतरंगात’ हे सदर दर पंधरवडय़ाने.

माधुरी ताम्हणे, आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म डिव्हिजन, मासिके-वृत्तपत्रे आणि रंगमंचीय कार्यक्रम या पाचही माध्यमांमध्ये गेली पंचेचाळीस वर्षे कार्यरत आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी ‘युवादर्शन’, ‘कामगारविश्व’, ‘ज्ञानदीप’ आणि ‘सुंदर माझं घर’, ‘हॅलो सखी’ या कार्यक्रमांचे त्यांनी संचालन केले आहे. सामाजिक प्रश्नांचे भान ठेवून त्यांनी जाणीवपूर्वक अंध, अपंग, मतिमंद मुलं, बारबाला, तृतीयपंथीय, मानसिक रुग्णालयातील लोक, कारागृहातील स्त्रिया, गॅम्बलर्स अ‍ॅनॉनिमस, वृद्धाश्रम या विषयांवर विपुल कार्यक्रम आणि लिखाण केले आहे. ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘माहेर’, ‘मेनका’ या मासिकांसाठी लेख तसेच कथाही लिहिल्या आहेत. ‘लोकसत्ता चतुरंग’मधून ‘मदतीचा हात’ आणि ‘भोगले जे दु:ख त्याला’ या सदरांसाठी कष्टकरी स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या आहेत, लेख लिहिले आहेत. पाच माध्यमांतील अनुभवांवर आधारित रोचक आणि रोमांचक ‘कल्पनेच्या पलीकडले’ हा कार्यक्रमसुद्धा त्या सादर करतात.

गतिशील काळात अनेकदा जुन्या संकल्पना नवीन रूप घेऊन समाजात प्रचलित होतात. ‘हेल्पलाइन’ ही संकल्पना अशीच ख्रिश्चन धर्मातील ‘कन्फेशन’च्या संकल्पनेची पुढील अवस्था मानली जाते. या संकल्पनेचा उगम पन्नासच्या दशकात लंडनमध्ये घडलेल्या एका घटनेतून झाला. एका किशोरवयीन मुलीला पाळी आली. तिने घाबरून आत्महत्या केली. लंडनच्या एका चर्चमधील फादर रेव्ह. चॅड वहराह (Chad Varah) या घटनेमुळे व्यथित झाले. या मुलीला तिची ‘अडचण’ सांगण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी कोणी भेटलं असतं तर? लोक अनेक गोष्टी मनात ठेवतात, झुरतात आणि असं टोकाचं पाऊल उचलतात हे जाणवून, १९५३ मध्ये त्यांनी ‘समॅरिटन्स’ या संस्थेची स्थापना ‘सक्रिय श्रवण’ हा हेतू मनात ठेवून केली. आणि त्यातूनच पुढे ‘हेल्पलाइन’ची संकल्पना उदयाला आली. ‘समॅरिटन्स मुंबई’ या संस्थेतील ‘हेल्पलाइन’च्या स्वयंसेविका मृणालिनी ओक सांगतात, ‘‘लंडनमधील ही संकल्पना सर जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सारा दस्तूर यांनी भारतात सर्वप्रथम प्रत्यक्षात आणली आणि साठच्या दशकात फादर चॅड यांच्या अनुमतीने त्याची शाखा मुंबईत सुरू केली. मात्र ‘समॅरिटन्स मुंबई’ ही हेल्पलाइन सुरू झाली ती १ मे १९९३ या दिवशी.’’

‘हेल्पलाइन’ ही संकल्पना रुजण्यासाठी तब्बल तीन दशकांचा काळ उलटावा लागला. याचे कारण भारतभरात दूरध्वनीच्या प्रसारणाचा प्रसार ऐंशीच्या दशकांत झाला. तोवर टेलिफोन ही तथाकथित श्रीमंतांची मक्तेदारी होती. याचदरम्यान सामाजिक स्थित्यंतराची मोठी लाट आली. त्यामुळे जुनी संस्कारमूल्यं बदलली. नातेसंबंध दुरावले. कुटुंबव्यवस्था संकुचित झाली. वडीलधाऱ्यांचे सल्ले मिळणं, आधार मिळणं दुरापास्त झालं. कोरडय़ा व्यावहारिकतेने संवेदनशीलतेला नख लावलं. त्यातूनच सामाजिक ताणतणाव वाढत गेले. माणसामाणसांतला संवाद हरवला आणि संकेतांची एक अभेद्य चौकट व्यक्तीभोवती उभी राहिली. खासगीपणाचा अतिरेक होऊन पूर्वीचा ऐसपैस मोकळेपणा संपला. त्यामुळे साहजिकच दूरध्वनीवरून ‘हेल्पलाइन’ची मदत घेऊन कोणाशी तरी मनमोकळं बोलावं, याला समाजमान्यता मिळाली. त्यांतही ‘हेल्पलाइन’मध्ये अभिप्रेत असलेलं अनामिकतेचं तत्त्व त्याच्या वापरासाठी खूपच सोपं आणि सोयीचं ठरू लागलं.

सध्याच्या काळात मोबाइल क्रांतीने माणसामाणसांतील भौगोलिक अंतर साफ मिटून गेलं आणि राज्य, राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ‘हेल्पलाइन्स’चा विस्तार झाला. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक संस्था, कार्यालयांची रीतसर माहिती मिळवण्याचं विश्वसनीय स्थान ‘हेल्पलाइन’ या संकल्पनेला मिळालं. जगभरातील विषयांची, संस्थांची माहिती बसल्याजागी मिळू लागली. ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत मदत वा माहिती तात्काळ पोहोचू शकते. तसंच गरजेचं वाटल्यास त्या व्यक्तीचं समुपदेशन करणंही सहज शक्य होतं हे हळूहळू जाणवत गेलं. त्यामुळेच आज ‘हेल्पलाइन’ ही संकल्पना समाजमान्य आणि लोकप्रिय होऊ लागली आहे.

या सामाजिक स्थित्यंतराची नेमकी नोंद ‘हेल्पलाइनच्या अंतरंगात’ या सदरातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपत्कालीन ‘हेल्पलाइन्स’ उदा. १००- पोलीस, १०१- आग, सुधारित ‘पोलीस हेल्पलाइन’- ११२, अशांचा अंतर्भाव या सदरांत असेलच. तसंच सरकारी कार्यालये, नेत्रदान, आरोग्य, जल व्यवस्थापन, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, अशा सामाजिकदृष्टय़ा उपयुक्त माहितीपर ‘हेल्पलाइन्स’चाही या सदरात समावेश असेल.

समाजजीवनातील अनेक समस्यांविषयी मदत वा मार्गदर्शन करणाऱ्या विविध ‘हेल्पलाइन्स’ सध्या कार्यरत आहेत. उदा. मुलांवरील वा स्त्रियांवरील अत्याचार, रॅगिंग, सायबर गुन्हे, खंडणी, हुंडा, मानसिकदृष्टय़ा अपंग, आत्महत्याप्रवण मानसिकतेचे लोक अशी कितीतरी उदाहरणे आहेत. त्यासाठी काम करणाऱ्या ‘हेल्पलाइन्स’ना या सदरात अग्रक्रम देण्यात येईल. एकूण आरोग्य, कुटुंबकल्याण, शैक्षणिक, सामाजिक समस्या अशा सर्वसमावेशक ‘हेल्पलाइन्स’चा या सदरात अंतर्भाव केला जाईल.

माहिती पुरवणे वा तात्काळ मदत देणे याखेरीज ‘हेल्पलाइन’चा दुसरा महत्त्वपूर्ण उपयोग ‘केवळ मन मोकळं करणे’ हासुद्धा असू शकतो. त्यासाठी सक्रिय श्रवण कौशल्यावर आधारित ‘समॅरिटन्स बॉम्बे’ अथवा समुपदेशकाची समर्थ भूमिका निभावणाऱ्या टाटा आय कॉल, आयपीएच या संस्थेच्या ‘मैत्र’, ‘हितगूज’ यांसारख्या ‘हेल्पलाइन्स’ची माहिती या सदरातून दिली जाईल.

प्रत्येक ‘हेल्पलाइन’मध्ये दोन घटकांचा अंतर्भाव असतो. प्रश्नकर्ता समस्याग्रस्त आणि उत्तर देणारा संवादक. समस्याग्रस्ताला मुळांत हे कळायला हवं, की त्याची नेमकी समस्या काय आहे आणि त्यासाठी त्याने कोणत्या ‘हेल्पलाइन’ची मदत घ्यावी. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. शुभा थत्ते सांगतात, ‘हेल्पलाइन’मध्ये संवादकाचं संवादकौशल्य खूप महत्त्वाचं. कारण समस्याग्रस्त व्यक्ती अनेकदा नैराश्याच्या गर्तेत खोल बुडालेली असते. तिची निराशा, हताशा ओळखून केवळ आवाजातून या व्यक्तीपर्यंत भावनिक ओलावा पोहोचवून तिला तात्काळ दिलासा देणं हे संवादकाचं खरं कौशल्य.. त्यासाठी संवादकाच्या ठायी तरल संवेदनशीलता असावी लागते. अनेकवेळा केवळ माहिती मिळवण्यासाठीसुद्धा ‘हेल्पलाइन’चा वापर केला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त संस्था, व्यक्ती यांची माहिती संवादकाच्या गाठीशी असावी लागते.’’

‘आहान फाऊंडेशन’ या नेटस्नेही संस्थेचे संस्थापक सदस्य उन्मेष जोशी म्हणतात, ‘‘सामान्य माणूस पोलीस अथवा शासकीय संस्थांशी संपर्क साधण्यास अनेकदा कचरतात. ‘हेल्पलाइन’ हे त्यासाठी संपर्काचं एक प्रभावी माध्यम ठरू शकतं. तसंच ‘हेल्पलाइन’द्वारे एखाद्या प्रकरणाची छाननी करणं, तिचा ‘फॉलोअप’ घेणं सोयीचं होतं. काही यंत्रणा प्रकरण नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असल्यास ‘हेल्पलाइन’च्या दबावामुळे पीडित व्यक्तीला न्याय मिळू शकतो. ‘हेल्पलाइन’मुळे विशेषत: आर्थिक अथवा सायबर गुन्ह्य़ांच्या बाबतीत तात्काळ मार्गदर्शन मिळू शकतं.’’

‘हेल्पलाइन’ची तीन प्रमुख उद्दिष्टं असतात. मन मोकळं करणं, समस्या निवारण, मार्गदर्शन. संवादकाला या तीनपैकी कोणत्या उद्दिष्टाला प्राधान्य द्यायचं हे ठरवावं लागतं. त्यासाठी संवादकालाही प्रशिक्षणाची गरज असते. या प्रशिक्षणातून त्याच्या ठायी सहृदयता, अंगभूत अनुकंपा, आत्मियता, आस्था, सहसंवेदना हे गुण वाढीस लागतात आणि त्याला आत्मविश्वास येतो. अनेकवेळा संवादकाची खासगी मतं, पूर्वग्रह वा नीतिमूल्य असतात. त्यांना मुरड घालून ‘स्वीकारार्ह भावनेपासून अस्वीकारार्ह भावनेपर्यंत’ पोहोचण्याची लवचीकता संवादकाजवळ असणे अभिप्रेत असते. ‘हेल्पलाइन’वर संवादक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला समस्यांबद्दलच्या मूलभूत सम्यक ज्ञानासह कायद्याचंही माफक ज्ञान असणं अत्यंत गरजेचं असतं. उदा. बालकांसाठी ‘हेल्पलाइन’ चालवणाऱ्या संवादकांना ‘पॉक्सो’ कायदा काय आहे, याची किमान माहिती असणे आवश्यक असते. मदत देताना चुकीची माहिती वा मदत दिली जाऊ नये याचे भान संवादकाला ठेवावं लागतं.

समाजमाध्यमांमुळे संपर्क यंत्रणा वेगवान आणि सजग झाली आहे. त्यामुळे ‘हेल्पलाइन’ची संकल्पनाही अत्यंत प्रभावी होत चालली आहे. आधुनिक काळाला अनुरूप असलेली ही संकल्पना आता काळाची अपरिहार्य गरज होऊ लागली आहे. ‘हेल्पलाइन’च्या सर्वसमावेशक, सर्वव्यापी स्वरूपामुळे आणि उपयुक्ततेमुळे आज त्यांची माहिती घेणं, ती संग्रही ठेवणं, योग्यवेळी तिचा वापर करणं समाजातील सर्वच घटकांना अनिवार्य ठरते आहे. बदलत्या काळासह आणि सामाजिक स्थित्यंतरानुसार सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अनेक समस्यांची दखल आणि सोडवणूक करण्याचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे.

‘हेल्पलाइनच्या अंतरंगात’ या सदरातून वाचक म्हणून तुमचे प्रबोधन होईलच शिवाय समाजाच्या अनेकविध अंतरंगात काय घडतंय, याचा मागोवाही घेता येईल.