कर्जवसुली प्रतिनिधीसारख्या एरवी पुरुषी वर्चस्वाच्या क्षेत्रात पाय रोवत, आणि वसुलीसाठी फक्त स्त्रीची नेमणूक करणारी देशातली पहिली व एकमेव कंपनी नावारूपाला आणणाऱ्या आणि चालू आर्थिक वर्षांत ५०० कोटीं रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवणाऱ्या इंदौरच्या मंजू भाटियाविषयी.
कर्जवसुली करायची असेल तर ती वसूल करायला कोण जातं? सर्वसाधारण अंदाज म्हणजे ‘मसल पॉवर’ असलेला, विशिष्ट प्रकारची जरब असलेला भारदस्त, करारी आवाज आणि पाहताक्षणीच समोरच्याच्या उरात धडकी भरेल अशी बलदंड शरीरयष्टी असलेला पुरुष. पण बदलत्या ‘शक्तिस्थाना’त तेही स्थान स्त्रियांकडे जाऊ पाहात आहे.. नव्हे त्याची सुरुवातही झाली आहे आणि तेही या ‘मसल पॉवर’शिवाय. इंदौरच्या २८ वर्षीय नाजूकशा मंजू भाटियाने कर्जवसुली प्रतिनिधीसारख्या एरवी पुरुषी वर्चस्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात पाय रोवत, फक्त स्त्री वसुली प्रतिनिधी नेमणारी देशातली पहिली व एकमेव कंपनी नावारूपाला आणली आहे.
तिच्या या कर्जवसुली क्षेत्रातील नामांकित कंपनीचे नावच ‘वसुली’ असून व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार ती सांभाळते आहे. एवढेच नव्हे तर या क्षेत्रात अधिकाधिक मुलींनी यावे यासाठीच्या तिच्या प्रयत्नांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जाते आहे. आणि ‘फोब्र्ज इंडिया’च्या ‘३० वर्षांखालील उत्साही तरुणाई’ विशेषांकात तिचा कार्यकर्तृत्वाला सलाम केला गेला आहे.
मंजूचा या क्षेत्रात प्रवेश काहीशा योगायोगाने झाला. घरची व्यावसायिक पाश्र्वभूमी होती, तरी व्यवहारज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळते यावर तिचा विश्वास. म्हणून बारावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर संपला त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका फार्मास्युटिकल कंपनीत ‘रिसेप्शनिस्ट’ची तिने नोकरी पत्करली, शिक्षणासह व्यावहारिक ज्ञानही मिळेल, असा विचार करून. फक्त ५०० रुपये महिना एवढय़ा पगारावर. ते साल होते २००३. पुढील दोन वर्षे आपल्या कायद्याच्या पदवीच्या अभ्यासासोबतच तिने नोकरीही सुरूच ठेवली. औषधांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या ट्रेडिंग व अकाऊंट्स इ. विभागांत तिने लवकरच शिरकाव केला आणि त्यात नैपुण्य मिळवले. ‘एक्स्पोर्ट’ परवाना कसा मिळवायचा, ‘क्लाएंट बेस’ कसा वाढवायचा, अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी तिने प्रयत्नपूर्वक आत्मसात केल्या.
तिचा कामातील उरक आणि सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आणि धडपड बघून तिचे कंपनीतील वरिष्ठ आणि कौटुंबिक मित्र पराग शहा यांनी तिला त्यांच्याच दुसऱ्या कंपनीसाठी विचारले. बँकांच्या कर्जवसुलीसाठी प्रतिनिधी पुरवणारी ही ‘वसुली’ नावाची कंपनी होती. मंजूने उत्साहाने होकार दिला आणि रुजूही झाली.
‘या वेळेस आमच्या कंपनीकडे एकच ग्राहक होता तो म्हणजे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’. त्यांनी डिफॉल्टर्स – कर्जवसुली न झालेल्यांची भली मोठी यादी आमच्याकडे दिली. त्यात एक उच्चपदस्थ व्यक्ती होते जे एका राज्याच्या सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यांच्याकडे वसुलीसाठी जायचे तर कसे, असा प्रश्न होता. मनात भीती होती. ते कुणालाच सहजासहजी भेटत नसत. मी सहज त्यांच्या सचिवांना भेटीसाठी फोन केला आणि मला लगेचच बोलावण्यात आले. मी जेव्हा मंत्री महोदयांना कर्जवसुलीसाठी आल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांच्या अकाऊंट बघणाऱ्याला बोलावून घेतले आणि सर्व कर्जाची परतफेड करून टाकण्याचा आदेश दिला,’ मंजूची पहिल्याच कामाची वसुली इतकी सहज झाली.
 या अनुभवाने तिचा उत्साह दुणावला. मग तिने अशा प्रकरणांचा सखोल अभ्यास सुरू केला. वसुली प्रक्रियेतील अरेरावीची वागणूक आधीपासूनच तिला खटकत होती. ही प्रथा मोडीत काढण्याचा तिने निश्चय केला. बरेचदा बँका आणि ग्राहक यांच्यात पुरेशा संवादाचा अभाव असतो आणि त्यामुळे कर्जवसुली करणे बँकांना कठीण होते हे तिचे निरीक्षण होते. तिने पराग शहा यांनाही हे लक्षात आणून दिले. तसेच हा संवादाचा पूल स्त्रिया अधिक चांगल्या प्रकारे बांधू शकतील हेही पटवून दिले. स्त्रिया जात्याच पाठपुरावा करण्यात वाकबगार असतात आणि पुरुषांच्या मानाने अधिक विश्वासार्ह असतात, असेही मंजूचे म्हणणे होते. मग तिने स्वत:ला कामात झोकून दिले आणि स्त्री महिला वसुली प्रतिनिधींची एक संपूर्ण टीम उभी केली.
खरे तर सुयोग्य पुरुष प्रतिनिधी वसुलीसाठी नेमणे हेच अतिशय कठीण काम होते, कारण हे काम केवळ तगडय़ा, गुंड प्रवृत्तीच्या पुरुषांचे आहे हीच मानसिकता प्रबळ होती. पण मंजू तर स्त्रियांनी या क्षेत्रात यावे यासाठी आग्रही होती. त्यामुळे त्या मानसिकतेतच बदल घडवण्याचे आव्हान मंजूने पेलले.
 स्त्रीची पात्रता जरी पटली असली तरी ते काम करू इच्छिणाऱ्या स्त्रियांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि समाजाला हे पटवून देणे हे एक मोठे दिव्य होते. मग स्त्रियांसाठी हे काम सुरक्षितही आहे, हे पटवून देण्यावर तिने भर दिला. लेडीज होस्टेल, कॉलेजेस यांसारख्या ठिकाणी तिने आपल्या कंपनीसाठी महिला एजंट्स नेमायचे आहेत अशा जाहिराती लावल्या. प्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर या कंपनीतील इतर जॉब प्रोफाइल्ससाठीही जसे लायसेन्सिंग व इतर कायदेशीर प्रक्रिया इ.साठी विविध वयोगटांतल्या स्त्रियांची नेमणूक केली.
इतर मोठय़ा बँकांची कार्यालये मुंबईत असल्याने, व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीने २००७ साली ‘वसुली’चे कार्यालय मुंबईला हलवण्यात आले. कंपनीचा पसारा हळूहळू वाढत चालला होता. भारतातील बहुतेक मोठय़ा शहरांतून ‘वसुली’ची कार्यालये आहेत, देशभरात एकूण २६ शाखा आहेत. देशातील अग्रणीच्या २० राष्ट्रीय बँकांची कामे हातात आहेत. चालू आर्थिक वर्षांत ५०० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य आहे.
वसुली प्रक्रियेत विश्वासार्हता आणण्यावर तिने भर दिला. अनेकदा समज, जाणीव करून दिल्यावर ग्राहकाला अधिक वेळ हवा असतो. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवत बँकेकडून हा कालावधी मंजूर करून घेण्याची जबाबदारी     घ्यावी लागते. हा मध्यममार्ग आम्ही काढू शकल्याने अधिक महत्त्वाची प्रकरणे निकाली निघाली, असे मंजू भाटिया सांगते. खरं म्हणजे, एखाद्या स्त्रीसमोर आपली पत घसरलेली बघणे पुरुषी प्रवृत्तींना फारसे रुचत नाही. त्यामुळे महिला प्रतिनिधी या ‘वसुली’ करून आणतातच, असे मंजूचे निरीक्षण आहे.
अर्थात वाईट अनुभवही आलेच! ती सांगते, ‘‘आमची एक टीम औरंगाबादच्या एका कारखानदाराकडे वसुलीसाठी गेली असताना त्यांच्या गुंडांनी या महिलांना चक्क कोंडून ठेवले आणि धमकावले. तर दुसऱ्या एका घटनेत त्यांच्या टीमवर अॅसिड फेकले गेले. त्यात चार-पाच महिलांना गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून पोलीस संरक्षण, सोबत एक प्रोटेक्शन ऑफिसर आणि व्हिडीओग्राफर प्रत्येक टीमसोबत जातोच!’’ लहान-सहान बँक खाती, शेतकी अवजारे आदींसाठीच्या कर्जवसुली पासून सुरू झालेला ‘वसुली’चा हा प्रवास आता संपत्ती लिलावामध्येही उतरला आहे. आजघडीला ‘वसुली’मध्ये ५०० हून अधिक स्त्री कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत.  
  स्त्रियांनी स्वत:हूनच स्वत:भोवती कुंपणे घालून घेतली आहेत. त्यांची इच्छा असेल तर त्या यातून सहज बाहेर पडू शकतात. आपल्या क्षमतांचा अंदाज या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडल्याशिवाय कसा येईल? दांडगाई, कटू शब्द, शिवीगाळ, धमक्या अशी गुंडागर्दी न करताही कर्जवसुलीचे कठीण काम केवळ संवादाच्या आधारे उत्तम प्रकारे पार पाडले जाऊ  शकते हेच मंजू व तिच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. स्त्रियांसाठी कुठलीही कार्यक्षेत्रे वज्र्य असू शकत नाहीत, फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करून स्वत:तल्या अदृश्य क्षमतांचा नवाच आविष्कार या निमित्ताने या स्त्रियांना आणि पर्यायाने समाजालाही बघायला मिळतो आहे.