मंगला जोगळेकर – mangal.joglekar@gmail.com

वृद्धत्व येतं तसे मेंदूमध्ये काही बदल होत असतात, उतारवयातले ताणतणावही वेगळे असतात. नवसमृद्धीमुळे एका कॉलवर सगळं घरी मिळू लागलंय, परंतु सगळं ऑनलाइन करता येतं म्हणून घराबाहेरच न पडणं वा मेंदू कार्यरत राहील, अशा गोष्टीच न करणं यामुळे उलट स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ‘काय करणार, वय झालं, असं होणारच,’ या गृहीतकामागे न अडकता शरीराला आणि मनाला चालना मिळेल, अशा गोष्टींचा दिनक्रमात सहभाग करून घेतला की शरीर आणि मेंदूही तजेलदार राहाणार यात शंका नाही.

मागील लेखात आपण विस्मरणाचे अनुभव हे नैसर्गिक आहेत आणि ते प्रत्येकाला येतच राहाणार आहेत हे बघितलं. त्यामागची कारणंही बघितली. ज्येष्ठांबरोबरच्या आरोग्यचर्चेत ‘विस्मरण’ हा महत्त्वाचा प्रश्न आहे असे दिसून येते. प्रत्येकाच्या ओळखीपाळखीत विस्मरणाचा आजार- डिमेन्शिया/ अल्झायमर्स झालेल्या एखाद्दोन व्यक्ती असतातच. त्यांच्याबाबत आपण जे बघतो, ऐकतो, त्यामुळे या आजाराबाबत भीतीयुक्त काळजी प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. तीच काळजी कमी व्हावी यासाठी ज्येष्ठांमधील विस्मरणाच्या संदर्भात संक्षिप्त, पण योग्य माहिती मिळावी, असा या लेखाचा उद्देश आहे.

ज्येष्ठांबरोबर काम करत असल्यानं विस्मरणाचे अनुभव मी रोजच ऐकते. माझी एक जवळची मैत्रीण माझा वाढदिवस कधीच विसरत नाही. या वेळी मात्र तिनं मला शुभेच्छा द्यायला आठवडाभर उशिरा फोन केला. वयपरत्वे विस्मरण वाढतं हे खरंच आहे, कारण वयानुसार मेंदूमध्ये अदृश्य स्वरूपात बदल घडत असतात. त्या बदलांचे काही परिणामही असतात. ते आपण बघणार आहोतच, परंतु त्याबरोबरच आपली वयाकडे बघण्याची दृष्टीही तितकीच जबाबदार आहे का? दोन्ही बाजूंनी चर्चा करूया.

वाढतं वय आणि विस्मरण

कानिटकर काकू काल दुपारी गाण्याच्या क्लाससाठी निघाल्या खऱ्या, पण त्यांना किल्ली काही केल्या सापडेना. किल्ली ठेवायच्या नेहमीच्या जागी बघून झालं. दाराच्या पाठीमागे, हॉलमधल्या टेबलावर, लक्षात असलेल्या सगळ्या जागा बघितल्या. अर्धा तास शोधाशोध केल्यावर शेवटी किल्ली कपाटात मिळाली, पण क्लासची वेळ चुकली. परवा आमच्या बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर राहाणाऱ्या सातपुत्यांच्या अमेरिकेत चाललेल्या मुलाला निरोप देताना त्याचं नाव काही त्यांना आठवेना. अलीकडेच बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या पावत्या शोधताना झालेली दमछाकही त्यांना आठवली. आपल्या स्मरणशक्तीचं काही खरं नाही, असं वाटून काकू धास्तावल्या. अशा घटना ज्येष्ठांना नवीन नाहीत.

आपल्या स्मरणशक्तीत बदल होत असल्याचं लहानमोठय़ा उदाहरणांतून प्रत्येक ज्येष्ठाला दिसत असतं. ‘मायक्रोवेव्ह’ घरात आणल्यावर तो वापरायचा कसा हे शिकायला किती तरी वेळ लागला होता. मोबाइलचे किती उपयोग तर मुळी आपल्यासाठी नाहीतच असं बहुतेकांना वाटतं. एका वेळी एकापेक्षा जास्त कामं केली तर काही तरी गडबड उडाल्याशिवाय राहात नाही. स्वयंपाकघरात कुठे काय ठेवलं आहे ते सापडायला वेळ लागतो. जिभेवरचे शब्द ओठांवर येत नाहीत. अलीकडे घडलेल्या गोष्टींमधले बारकावे लक्षात राहात नाहीत. नवीन माहिती अर्धवट समजते, अर्धवट लक्षात राहाते. बाहेर पडताना कामांच्या यादीचा आधार वाटतो. व्यक्तींचा चेहरा आणि नाव एकाच वेळी आठवेल याची खात्री नसते. बोलताना चपखल शब्द सहज आठवत नाहीत. मात्र कोणी केलेला अपमान, नकारात्मक अनुभव, आयुष्यातील आव्हानात्मक काळ, या आठवणींना मनात कायम जागा असते. अर्थातच प्रत्येकाच्या विस्मरणाचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती मात्र वेगळी असते.

वयाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. त्याला मेंदूचाही अपवाद नाही. वयपरत्वे मेंदूमध्ये अनेक बदल होत असतात. मेंदूमध्ये होत असलेल्या बदलांचे परिणाम आपल्याला जाणवल्याशिवाय राहात नाहीत. हे बदल आणि परिणाम याची थोडी माहिती पाहू या.

मेंदूमध्ये घडणारे बदल

मेंदूमधल्या पेशींची संख्या कमी होत जाते. संवाद घडण्यासाठी पेशींमधील जी रसायनं (न्यूरोट्रान्समीटर्स) आवश्यक असतात त्यांचं उत्पादन कमी होतं. सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटचं ‘डायल-अप कनेक्शन’ जसं काम करेल, तशी मेंदूची संवादयंत्रणा धिम्या गतीनं चालते. माहितीच्या ‘प्रोसेसिंग’ला वेळ लागतो.

मेंदूमधील ‘हिप्पोकँ पस’ हा भाग स्मरणसाखळ्या तयार करण्यासाठी, त्या सांभाळून ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. वयपरत्वे त्याचं काम पहिल्यासारखं होत नाही.

संप्रेरकं  आणि प्रथिनांच्या सहाय्यानं मेंदूतील पेशी अथक काम करतात. त्यांची झीज भरून काढण्याचं आणि कार्यक्षमता राखण्याचं काम आपोआप होत असतं, पण वयानुसार त्यातही अडथळे येऊ लागतात.

मेंदूच्या पेशींना सुरळीत रक्तपुरवठा झाला नाही तर विस्मरण वाढताना दिसतं.

या बदलांमुळे –

नवीन शिकायला वेळ लागतो.

नवीन माहिती पूर्वीसारखी लक्षात राहात नाही.

शिकताना लहान मुलं जशी चटकन गोष्टी आत्मसात करतात तसं सहज आकलनही होत नाही. त्यासाठी प्रयत्न करायला लागतात. नियोजन करणं सोपं वाटत नाही. काही समस्या उभ्या राहिल्या तर कोणी मदतीला यावं असं वाटतं.

निरीक्षणक्षमता, एकाग्रचित्तता कमी झाल्यासारखी वाटते.

एका वेळी एकापेक्षा जास्त गोष्टी करणं जमत नाही.

मेंदूमधील बदलाबरोबर ज्येष्ठांमधला ताण हेसुद्धा विस्मरणाचं एक महत्त्वाचं कारण आहे. जीवनाच्या या कालखंडातसुद्धा ताण असतो. या वयात नात्यातील भूमिका बदलतात, नवीन नाती निर्माण होतात. या बदलांशी जुळवून घेणं सोपं नसतं. जोडीनं आर्थिक विवंचना, मुलांच्या चिंता, शारीरिक तक्रारी, वास्तव्याच्या ठिकाणात बदल झाल्यानं नवीन ठिकाणी, नवीन वातावरणात सामावून जाणं, अशा विविध समस्या असतातच.

एकीकडे विस्मरणाचे अनुभव येत असले तरी ज्येष्ठ व्यक्ती त्यांना ज्यामध्ये रुची आहे, विशेष कौशल्य आहे, रोज ज्याची सवय आहे, ती कामं पहिल्याप्रमाणेच समर्थपणे करू शकते. आपल्या जीवनातील घटना त्यांच्या ठळकपणानं स्मरणात असतात. भाषेचं ज्ञान, भाषा समजणं यावर परिणाम होताना दिसत नाही. जीवनानं जे शिकवलं ते व्यवहारज्ञान, पोक्तपणाचे विचार, व्यवहारचातुर्य ते कधीच विसरत नाहीत. व्यवहारानं, विचारांच्या आधारानं योग्य निर्णय घेणं, बरं-वाईट ठरवणं, यातून त्यांचं रोजचं मार्गक्रमण सुरळीत चालू असतं.

सगळा परिणाम वयाचाच? 

परवाचीच गोष्ट.. माझ्याकडे एक युवती आली होती. गप्पा चालल्या होत्या. बोलता बोलता तिच्या म्हणण्यात दोन-तीन वेळा, ‘‘मला आता माझ्या जुन्या मैत्रिणीचं नाव आठवत नाही, मी गेल्या महिन्यात एक चित्रपट बघितला, त्याचं नाव आठवत नाही, गेल्या वर्षी मी शिकले आहे तेही नीट लक्षात नाही..’’ अशी वाक्यं आली आणि काही घडलंच नाही अशा पद्धतीनं ती पुढच्या वाक्यांवर, पुढच्या विचारांवर आलीसुद्धा, परंतु जेव्हा ज्येष्ठ वयाच्या कुणाशी तरी बोलताना असाच प्रसंग घडतो, तेव्हा ‘हल्ली हे असंच होतं,’ या वाक्याची फोडणी त्या प्रसंगाला असतेच.

तात्पर्य काय, की वाढत्या वयाचा परिणाम आणि विस्मरण याची सांगड आपण आपोआपच घालतो. विस्मरणाचे प्रसंग डोक्यात घोळवत बसतो. वय वाढलं म्हणजे विस्मरणाचे प्रसंग घडणार, आपल्या मेंदूकडून अपेक्षा कमीच ठेवायच्या, हे वर्षांनुर्वष ‘कन्डिशनिंग’ झालेलंच असतं. एकदा मी एका आजींना भेटायला गेले होते. वय र्वष नव्वद. त्यांची स्मरणशक्ती अगदी तल्लख होती. घरामध्ये महत्त्वाचे निरोप देण्याचं काम त्या चोख करत. मात्र त्यांचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्या स्मरणशक्तीचा विषाद इतरांना वाटत होता, अशी माझी भावना त्यांच्याशी बोलताना झाली.

मोठय़ा वयात ‘पीएच.डी.’ मिळवली की वयाचा मुद्दा का काढला जातो? त्या व्यक्तीला ते झेपणारं, रिझवणारं असतं म्हणूनच तर हे आव्हान ती स्वीकारते ना? मोठय़ा कंपन्यांचं नेतृत्व करणारे, देशाचं सारथ्य करणारे, महत्त्वाच्या संस्थांचे उच्चपदस्थ, ही सर्व मंडळी काय तरुण असतात? मोठय़ा वयात स्मरणशक्ती तजेलदार राहाणारच नाही हे गृहीतक मला न पटणारं वाटतं.

आता आणखी एक वेगळी बाजू बघू या. माझ्या संपर्कात येणाऱ्या नुकत्याच निवृत्त झालेल्या आणि पाच-सहा वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या व्यक्तींमधला फरक मला नियमित जाणवतो. नातवंडांना शाळेतून आणणं, घरचं सामान आणणं, बँकेचे व्यवहार, दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघणं, वामकुक्षी घेणं आणि कधी तरी सहलीला जाणं या चौकटीत अनेकांचं आयुष्य बंद होतं. निवृत्तीमध्ये विश्रांती घ्यावी, पण मेंदूला विश्रांती द्या, असं कुठलं शास्त्र सांगतं?

हल्ली घरोघरी पुढील संवाद ऐकू येतात, ‘‘बाबा, कशाला जाताय औषधांच्या दुकानात? मी फोन करून मागवून घेतो.’’ ‘‘ऑनलाइन सगळं मिळतं. काही जायला नकोय दुकानात.’’ ‘‘बिल भरायला जायला नको. मी दोन मिनिटांत ‘पे’ करते.’’ ‘‘तुमच्या सखी मंडळात पार्टी आहे तर घरून काही करून न्यायची गरज नाही. जाताना त्या कोपऱ्यावरच्या दुकानातून ढोकळा घेऊन जा. सगळ्यांना खायलासुद्धा सोपा.’’ आपल्या आई-वडिलांच्या काळजीपोटीच मुलं असं सांगत असतात, परंतु यातील प्रत्येक गोष्ट केल्यानं आई-बाबांच्या मेंदूला चालना मिळणार असते, कोणाशी तरी संवाद घडणार असतो, हे मुलांच्या लक्षातच येत नाही.

आपल्या नवसमृद्धीमुळे आपल्या बौद्धिक क्षमतांवर परिणाम होत आहे का, असाही प्रश्न अलीकडे मला पडू लागला आहे. पैसा आपल्या हातात जरा जास्तच खुळखुळतो आहे. आपण जरी तो कमावला असला आणि निवृत्तीनंतर त्याचा उपभोग घेण्याचा आपला हक्क असला, तरी सभोवतीच्या सुखसोयींमुळे तसंच घरी करण्याऐवजी ‘आऊटसोर्सिग’ करण्याच्या नादात आपलं नुसतं शरीरच नाही, तर मेंदूही सुस्तावतो आहे. याचा अर्थ आपल्या पैशांचा आनंद घेऊ नये असं मुळीच नाही, पण आपल्याला याकडे सजगतेनं पाहायला मात्र हवं. मेंदूच्या क्षमता शेवटपर्यंत टिकवायलाच हव्यात.

सध्याच्या बदलत्या सामाजिक, कौटुंबिक स्थितीमध्ये आपला भरवसा आपल्यावरच असतो. नवीन आणि जुन्या दोन्ही पिढय़ांसाठी परिस्थितीनं नवी आव्हानं उभी केली आहेत. ज्येष्ठांबद्दल बोलायचं तर सध्या पुण्यासारख्या शहरांमध्ये कित्येक कुटुंबांमध्ये नवरा आणि बायको असे दोनच घटक दिसतात. आयुर्मान वाढत चालल्यानं आपल्या पती/ पत्नीची काळजी घेण्याची जबाबदारी मोठय़ा वयात एकटय़ानं पार पाडावी लागत आहे. आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात अनेक वयस्कर व्यक्ती एकटेपणाशी सामना करताना आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. अशा वेळी मेंदूच्या क्षमता टिकवणं फारच महत्त्वाचं झालं आहे. आपलं स्वावलंबन जपायचं तर मेंदूची साथ हवीच.

वयानुसार आपलं विस्मरण थोडंफार वाढणार आहे हे ध्यानात ठेवून मेंदू आपलं जीवन खंबीरपणे चालवता येईल इतका कार्यक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, याची खूणगाठ प्रत्येकानं बाळगली पाहिजे. गंभीर विस्मरणाचा उंबरठा आपण चढत नाही ना, याची खात्री करून घ्यायला पाहिजे, किंबहुना त्याच्या जवळपासही आपण जाणार नाही यासाठी निवृत्तीचं आयुष्य मेंदूसाठी आव्हानात्मक आणि आनंददायी असेल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.